Thursday, September 20, 2018


आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय
उद्घाटन शुभारंभ 23 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवनात होणार
नांदेड दि. 20 :- प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते रविवार 23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन रांची (झारखंड) येथून देशभरात होणार आहे. या योजनेचा नांदेड जिल्हास्तरावरील उद्घाटन शुभारंभ रविवार 23 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे दुपारी 12 ते 2.30 यावेळेत करण्यात येणार आहे. त्याबाबत पूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात आज घेण्यात आली. 
या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करुन जिल्ह्यात नोंद झालेल्या लाभार्थ्यांपैकी काही निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात या योजनेच्या ई-कार्डचे वाटप करण्यात येणार आहेत. या योजनेत पात्र लाभार्थी कुटुंबासाठी 5 लाख रुपये वर्षातून एकवेळा उपचारासाठी मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेचे 2 लाख 30 हजार लाभार्थी आहेत. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड व मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचा या योजनेसाठी अंतर्भाव करण्यात आला आहे. यावेळी  जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने  संबधितांना निर्देश दिले.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सहस्त्रबुद्धे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, करमणूक कर शाखा नायब तहसिलदार श्रीमती उषा इज्जपवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. वाय. एस. चव्हाण, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे, डॉ. अन्सारी, डॉ. दुर्गादास रोडे यांची उपस्थिती होती. 
यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कदम यांनी तर योजनेची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. सर्जे यांनी दिली. शेवटी आभार डॉ. गुंटूरकर यांनी मानले.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...