Monday, November 23, 2026

 

विधान परषिदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा नांदेड दौरा

 

नांदेड, दि. 23 : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पुणे विमानतळ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 8.15 वाजता गुरु गोविंदसिंह विमानतळ, नांदेड येथे आगमन. सकाळी 8.30 वाजता शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील.

सकाळी 11 वाजता हिंगोली येथून नांदेड प्रयाण आणि दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव राहील. दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून गुरु गोविंदसिंह विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 3.30 वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

******

 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा


नांदेड, दि. 23 : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पुणे विमानतळ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 8.15 वाजता गुरु गोविंदसिंह विमानतळ, नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 8.30 वाजता शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील.

सकाळी 11 वाजता हिंगोली येथून नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करून राखीव राहील. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून गुरु गोविंदसिंह विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 3.30 वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

******

 

संविधान दिनानिमित्त नांदेडमध्ये 26 नोव्हेंबरला भव्य संविधान रॅली

 

  • महात्मा फुले पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सामूहिक प्रस्तावना वाचन

नांदेड, दि. 23 : भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड येथे भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, नांदेड यांच्या वतीने सकाळी ८ वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

या रॅलीचा प्रारंभ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचेल. तेथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.

संविधानातील मूल्ये, लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा जागर करण्यासाठी आयोजित या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

*******

 

देगलूर येथे 30 नोव्हेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 23 : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड आणि अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देगलूर जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2026 रोजी अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देगलूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात विविध खासगी आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार व नोकरीच्या संधींसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक-युवतींना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी सोमवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देगलूर येथे उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. आर. एस. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड. ई-मेल : nandedrojgar01@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 02462-251674 येथे संपर्क साधावा.

******

 

नांदेडमध्ये २६ नोव्हेंबरला रोजगार मेळावा; युवकांना नोकरीची संधी

शासकीय तंत्रनिकेतन व जिल्हा कौशल्य विकास केंद्राचा संयुक्त पुढाकार

 

नांदेड, दि. 23 : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह’ (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात विविध नामांकित खासगी आस्थापनांमधील रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश एल. जानराव यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. राहुल गेडेकर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड येथे संपर्क साधावा.

******

 

नांदेडमध्ये 28 नोव्हेंबरपासून जिल्हास्तरीय युवा महोत्सव

 

  • युवकांना कलागुण सादरीकरणाची संधी
  • लोकनृत्य, लोकगीत, पथनाट्य, चित्रकला व कविता लेखन स्पर्धा; 27 नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणीचे आवाहन


नांदेड, दि. 23 : युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देतानाच व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी ‘नशामुक्त युवा–विकसित भारतासाठी’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2026-27 चे आयोजन दि. 28 व 29 नोव्हेंबर 2026 रोजी अंबिका मंगल कार्यालय, छत्रपती चौक, नांदेड येथे करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत नेतृत्व संवाद (VBYLD) 2027 अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे.

पाच सांस्कृतिक स्पर्धांतून व्यसनमुक्तीचा जागर

महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा पाच स्पर्धा घेण्यात येणार आहेत. लोकनृत्य व लोकगीतांतून लोकसंस्कृतीचे दर्शन, पथनाट्यातून सामाजिक प्रबोधन, तर चित्रकला व कविता लेखनातून युवकांच्या सर्जनशील विचारांना व्यासपीठ मिळणार आहे. व्यसनमुक्ती, सामाजिक जागृती आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचे योगदान हे स्पर्धांचे प्रमुख विषय असतील.

15 ते 29 वर्षे वयोगटातील युवकांना सहभागाची संधी

दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी युवकांचे वय 15 ते 29 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सहभागी युवक संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावा किंवा त्या जिल्ह्यात शिक्षण घेत असावा. एका युवकाला केवळ एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. विकसित भारत नेतृत्व संवाद 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवक या स्पर्धांसाठी पात्र नसतील. सर्व सहभागी युवक-युवतींनी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. चित्रकला व कविता लेखनातील कलाकृती मौलिक असाव्यात. कोणत्याही जाती किंवा धर्माच्या भावना दुखावणारा मजकूर अथवा वेशभूषा मान्य केली जाणार नाही.

विजेत्यांसाठी रोख पारितोषिके

समूह लोकनृत्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 7 हजार, 5 हजार आणि 3 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. समूह लोकगीत व पथनाट्य स्पर्धेत प्रत्येकी 5 हजार, 3 हजार आणि 2 हजार 500 रुपये, तर चित्रकला व कविता लेखन स्पर्धेत प्रत्येकी 3 हजार, 2 हजार आणि 1 हजार 500 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणारे संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सव दि. 10 ते 12 जानेवारी 2027 या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार आहे.

ऑनलाइन व प्रत्यक्ष नोंदणीचे आवाहन

इच्छुक स्पर्धकांनी गुगल फॉर्म आणि माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी. स्पर्धानिहाय विहित नमुन्यातील अर्जासह नावनोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडियम परिसर, गोकूळनगर, नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावी किंवा गुगल फॉर्म : https://forms.gle/IdEVMwRqZDPhDe4GS

माय भारत पोर्टल : https://mybharat.gov.in/vo/orgeventmanagement/event_detail_nyf/MjM0MDg3

वर नोंदणी करावी किंवा dsonanded@rediffmail.com या ई-मेलवर दि. 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत पाठवावीत.

स्पर्धेच्या अटी, नोंदणी प्रक्रिया व अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर (मो. 7517536227) यांच्याशी संपर्क साधावा. युवकांनी कला, साहित्य आणि सर्जनशील विचारांच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा आणि जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवक-युवतींनी महोत्सवात सहभागी होऊन विभागीय व राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे.

******

 

नशामुक्त युवा, विकसित भारताचा संकल्प; धर्माबादमध्ये युवा संसद उत्साहात

 

  • माय भारत केंद्राचा पुढाकार; व्यसनमुक्ती, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश

 

नांदेड, दि. 23 : युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्यात सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव जागृत करण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत केंद्र, नांदेड यांच्या वतीने ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित युवा संसद कार्यक्रम धर्माबाद येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात युवकांनी सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्ञानेश्वर बोंडवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कैलास गायकवाड व माहेश्वरी गायकवाड, तर प्रमुख वक्ते म्हणून वरिष्ठ संपादक शिवराज गाडीवान, वरिष्ठ संपादक हानमंतु देसाई आणि सोनकांबळे उपस्थित होते. मान्यवरांनी तंबाखू, गुटखा, मद्य आणि अमली पदार्थांच्या व्यसनामुळे युवकांचे आरोग्य, शिक्षण व भविष्य धोक्यात येत असल्याचे सांगितले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

युवा संसदेत विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांवर विचार मांडण्याची, चर्चेत सहभागी होण्याची आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळाली. युवकांनी सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घेऊन देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ‘नशामुक्त युवा म्हणजेच सशक्त भारताचा पाया’ या विचारातून युवकांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि राष्ट्राप्रती कर्तव्यभावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुज मुंडकर यांनी केले, तर जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.

******* 




  नांदेड जिल्ह्यातील 5 लाख 68 हजार शेतकऱ्यांना दुष्काळी अग्रीम अनुदान वितरित 8 लाख 73 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर ; उ...