Tuesday, April 1, 2025

 वृत्त क्रमांक 338

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन नांदेड दि. 1 एप्रिल :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. या दिवशी महसूल, गृह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे. 00000

वृत्त क्रमांक 337

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत 7 एप्रिलपर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड दि. 1 एप्रिल :-  मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉनटेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबलटेनिस, वेटलिफटींग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अश्या संस्थाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

इच्छुक संस्थानी अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे क्रीडा अधिकारी विपुल दापके यांचा मो.क्र. 9511724095, 9860521534 यांचेशी संपर्क साधावा. हा अर्ज 7 एप्रिल, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रासह परीपुर्ण भरुन द्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्यावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वेधकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूसाठी करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी प्रशिक्षक व संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र शासनाने “मिशन लक्ष्यवेध” या महत्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने सबंधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, 51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग व 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. क वर्ग अकादमींना वार्षिक रु 10 लक्ष, ब वर्ग अकादमींना वार्षिक 20 लक्ष रुपये व अ वर्ग अकादमींना वार्षिक 30 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य, पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ. बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे. तरी नांदेड जिल्हयातील इच्छुकांनी या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 336

जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता 

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी 

नांदेड दि. 1 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 2 व 3 एप्रिल 2025 हे दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. 

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

Sunday, March 30, 2025

#मराठी #नववर्ष #गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

#नांदेड


Friday, March 28, 2025

वृत्त क्रमांक 335

100 दिवसांच्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी

मुदखेड तहसिल कार्यालयास दिली भेट

विविध कामाचा घेतला आढावा

                                                                                                                                                                         नांदेड, दि. 28 मार्च :- राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेटी देत असून नुकतीच त्यांनी तहसिल कार्यालय, मुदखेड येथे भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. 

                                                                                                                                                                        यावेळी तहसील कार्यालय मुदखेड अंतर्गत सातबारा वरील नावाची दुरुस्ती करून दुरुस्त केलेले सातबारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या संकल्पनेतून गोबरा तांडा, तोरणा तांडा आणि वरदडा तांडा येथील नागरिकांना जातीचे दाखले आणि ऑनलाईन राशन कार्ड यांचे त्यांच्या यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

                                                                                                                                                                        मिशन 100 डेज अंतर्गत विविध उपक्रमाची माहिती यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली तसेच तहसील कार्यालय मुदखेड येथे करण्यात आलेल्या विविध कार्यालयीन सुधारणांचा आढावा त्यांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी पठाण यांनी केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी भोकर प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार आनंद देऊळगावकर, नायब तहसीलदार विजयकुमार पाटे तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी , मंडळ अधिकारी  आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000




Thursday, March 27, 2025

  वृत्त क्रमांक 334

गिग, प्लॅटफार्म वर्कर व ॲग्रिगेटर यांनी

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. 27 मार्च :- केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. तरी सर्व गिग कामगारांनी 1 एप्रिल 2025 पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच सर्व ॲग्रिगेटर यांनी 31 मार्च 2025 पर्यत या register.esharm.gov.in/#/iser/platform-worker-registration संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाने गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रिगेटर यांची नोंदणी करण्यास सुरवात केलेली आहे. साधारणत: गिग व प्लॅटफॉर्म वर्कर शेरिंग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार इ. मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार, फ्रोफेशनल सर्विस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार, ट्रॅव्हल्स व आदरातिथ्य करणारे कामगार, मिडीया सर्विसेस इ. सर्व प्लॅटफार्म गिग वर्करच्या व्याखेत येतात. ॲमेझोन, फ्लीपकार्ट, मिंत्रा, स्नॅपडिल, अजिओ, मिशो, स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे सर्व ई-श्रम esharm.gov.in वर नोंदीत होवू शकतील. केंद्र सरकारकडे डेटा तयार होईल म्हणून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

 वृत्त क्रमांक 333

जमिनीच्या सुपिकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक -जिल्हाधिकारी

100 दिवसांच्या आराखड्यानुसार भोकर येथील उपविभागीय व तहसिल कार्यालयास भेट
नारवट येथील वनविभागाच्या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ
नांदेड, दि. 27 मार्च :- गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत सुधा प्रकल्पातील गाळ काढण्यात येत आहे. हा गाळ काढल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा साठा वाढून सभोवतलाच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी काढण्यात आलेला गाळ विनामुल्य उपलब्ध होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
आज गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत भोकर येथे सुधा प्रकल्पातील गाळ काढण्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसिलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व इतर विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह सेवा समर्पण परिवारातील सदस्य, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती.
याकामा सोबत नारवट येथील वन विभागाच्या तळयातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा गाळ वन विभाग, सेवा समर्पण परिवार व नारवट येथील ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून काढण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याचे काम आज सुरु करण्यात आले आहे.

या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथे भेट देवून 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमातंर्गत होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेवून उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
00000







वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...