Wednesday, September 7, 2022

 आणीबाणी कालावधीत लढा देणाऱ्या व्यक्तींची सन्मान योजना नव्याने सुरू


·  पात्रताधारकांनी परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- आणीबाणीच्‍या कालावधीत (सन 1975 ते 1977) मधील लढा देणाऱ्या व्‍यक्‍तींना सन्‍मान / यथोचित गौरव करण्‍यासाठी योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेत शासनाद्वारे मानधन दिले जाणार आहे. पात्रताधारक लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

ही योजना नव्‍याने सुरु करण्‍यास 28 जुलै 2022 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. या योजनेअंतर्गत आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 10 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 5 हजार रुपये मानधन देण्यात येईल. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 2 हजार पाचशे रुपये मानधन अनुज्ञेय राहील. आणिबाणीच्‍या लढयामध्‍ये सहभाग घेतलेल्‍या व्‍यक्‍ती ज्‍यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्‍यांनी अर्जाचा नमुना परिशिष्‍ट अ व शपथपत्राचा मसुदा परिशिष्‍ट ब मध्‍ये माहिती व आवश्‍यक पुरावा कागदपत्रांच्‍या प्रमाणित प्रतीसह अर्ज सादर करावेत, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


0000

6.9.2022

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

 नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  91 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1, मुखेड 1 असे एकूण 4 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 434 एवढी झाली असून यातील 1 लाख 729  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 1  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 9,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 4 असे एकूण 13 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 618
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 96 हजार 758
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 434
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 729
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-
 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 

Tuesday, September 6, 2022

दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या

विद्यार्थ्यांना विलंब, अतिविलंब शुल्काने अर्ज करण्याची सुविधा 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यानुसार 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 29 जुलै ते 24 ऑगस्ट 2022 निश्चित करण्यात आला होता. जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत नावनोंदणी करु शकले नाही अशा विद्यार्थ्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने विलंब व अतिविलंब शुल्काने सादर करावयाची सुविधा मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.   

इयत्ता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज विलंब व अति विलंब निर्धारित मुदतीत स्विकारण्याच्या कालावधी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी प्रति विद्यार्थी 100 रुपये स्विकारुन नाव नोंदणी अर्ज गुरुवार 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत व इयत्ता बारावीसाठी प्रती विद्यार्थी 25 रुपये स्विकारुन नाव नोंदणी अर्ज गुरुवार 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत तसेच अतिविलंब शुल्क इयत्ता दहावी व बारावीसाठी प्रती विद्यार्थी प्रतीदिन 20 रुपये स्विकारुन नावनोंदणी अर्ज शनिवार 1 ऑक्टोंबर ते सोमवार 31 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत भरावयाचा आहे.   

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे. 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क +विलंब शुल्क/अतिविलंब शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क/ अतिविलंब शुल्क राहिल.(विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरण्यात यावे. ) 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.  

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.  

इयत्ता दहावी व बारावी- 2023 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह निर्धारित माध्यमिक शाहा अथवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थी नावनोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही  यांवी सर्व संबंधितानी नोंद  घ्यावी असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

 तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत  

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  उमरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोपा, हेल्थ सॅनेटरी इन्सपेक्टर, एम्प्लॉयबीटी स्किल, हॉस्पिटल हाऊसकिपींग, फिजीओथेरपी टेक्नीशियन या व्यवसायासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावरील शिल्प निदेशक पदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक संबंधित व्यवसायासाठी पात्र उमेदवारांनी सोमवार 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वय व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.   

00000

Monday, September 5, 2022

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या केलेल्या गौरवाने आम्हा शिक्षकांना प्रेरणा 

  · शिक्षक दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादात  जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सहभाग        

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- ज्या कोरोनाने जग थांबले होते त्या काळात विद्यार्थ्यांपासून आमची झालेली ताटातूट ही आम्हाला शब्दात आजही मांडता येत नाही. शासनाने सोशल मिडियाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले, त्यातून आम्हा सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दूरदृश्य प्रणालीतून नवे बळ घेता आले. विविध आव्हानांवर काम करतांना आज शिक्षक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी संवाद साधून शिक्षक म्हणून आम्ही हाती घेतलेल्या सर्व उपक्रमांना नवी प्रेरणा दिल्याची भावना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आनंद रेनगुंटवार यांनी व्यक्त केली.  

 

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त प्रातिनिधीक शिक्षक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवादासाठी एकत्र झाले होते. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार माळोदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, प्रविण पाटील, संभाजी कालेवाड, जयवंत काळे, पंडीत पवळे, आनंद रेनगुंटवार, स्मिता कुंडलवाडीकर, मुमताज बेगम, त्रिवेणी झाडे आदी शिक्षक उपस्थित होते.

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षक दिनानिमित्त आमच्याशी संवाद साधून खऱ्या अर्थाने गौरव केला आहे. त्यांनी आमच्याशी केवळ संवादच साधला नाही तर अडी-अडचणीही समजून घेतल्या आहेत. आम्हाला प्रश्न मांडण्याची संधी दिली. शासनस्तरावर योग्य ती दखल घेतली जाईल व शिक्षकांसोबत मिळून अधिक चांगले जे काही असेल ते शिक्षण क्षेत्रासाठी आपण करू ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भुमिका आम्हा सर्व शिक्षकांचे मनोबल उंचावणारी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी दिली.

 

यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार माळोदे यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

000000







Saturday, September 3, 2022

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 109 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, बिलोली तालुक्याअंतर्गत 1 असे एकुण 2 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 424 एवढी झाली असून यातील 1 लाख 723  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 5,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 4 असे एकुण 9 व्यक्ती उपचार घेत आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 282
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 96 हजार 438
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 424
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 723
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- निरंक

00000

  

 पीएम किसान योजनेच्या लाभासाठी 

7 सप्‍टेबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक 

· नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 628 लाभार्थ्‍यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया करणे बाकी 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील लाभार्थ्‍यांनी सोमवार 12 सप्‍टेबर 2022 रोजी वितरीत होणारा 14 वा हप्‍ता मिळण्‍याकरीता पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी बुधवार 7 सप्‍टेबर 2022 पर्यंत पुर्ण करण्‍याबाबत शासनाने कळविले आहे.  

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्‍यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्‍या लाभार्थ्‍यांनी ई-केवायसी केली नाही, अशा लाभार्थ्‍यांचा पुढील लाभ थांबविला जाणार आहे.   

ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी असून ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्‍यासाठी खालील दोन पध्‍दतीने ई-केवायसी करता येईल. लाभार्भी स्‍वतः https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा PMKisan अँपद्वारे ओटीपीद्वारे मोफत करता येईल. (पुढील लिंकद्वारे Direct e-KYC टॅब ओपन होईल - https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx ) ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) येथे प्रति लाभार्थी 15 रुपये दराने ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. 

नांदेड जिल्‍हयातील 1 लाख 43 हजार 628 लाभार्थ्‍यांनी अद्याप  ई-केवायसी न केल्‍याने योजनेचा पुढील कालावधीचा लाभ थांबविला जाणार आहे.  ई-केवायसी न केलेल्‍यांचा तालुका निहाय  तपशील पुढील प्रमाणे आहे. नांदेड 6 हजार 165, अर्धापूर 4 हजार 464, कंधार 13 हजार 656, लोहा 14 हजार 637, बिलोली 7 हजार 17, नायगाव 9 हजार 422, देगलूर 9 हजार 717, मुखेड 12 हजार 867, भोकर 8 हजार 567, मुदखेड 5 हजार 257, हदगाव 14 हजार 101, हिमायतनगर 6 हजार 243, धर्माबाद 4 हजार 784, उमरी 5 हजार 477, किनवट 15 हजार 723 तर माहूर 5 हजार 521 एवढ्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील ज्‍या लाभार्थ्‍यांनी ई-केवायसी अद्याप केलेली नाही, त्‍यांनी  बुधवार 7 सप्‍टेबर 2022 पुर्वी वरील दोन पद्धतीपैकी एका पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करून योजनेचा पुढील लाभ सुरळीत करून घेण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आवाहन केले आहे.

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...