Monday, September 5, 2022

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या केलेल्या गौरवाने आम्हा शिक्षकांना प्रेरणा 

  · शिक्षक दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादात  जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सहभाग        

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- ज्या कोरोनाने जग थांबले होते त्या काळात विद्यार्थ्यांपासून आमची झालेली ताटातूट ही आम्हाला शब्दात आजही मांडता येत नाही. शासनाने सोशल मिडियाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले, त्यातून आम्हा सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दूरदृश्य प्रणालीतून नवे बळ घेता आले. विविध आव्हानांवर काम करतांना आज शिक्षक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी संवाद साधून शिक्षक म्हणून आम्ही हाती घेतलेल्या सर्व उपक्रमांना नवी प्रेरणा दिल्याची भावना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आनंद रेनगुंटवार यांनी व्यक्त केली.  

 

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त प्रातिनिधीक शिक्षक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवादासाठी एकत्र झाले होते. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार माळोदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, प्रविण पाटील, संभाजी कालेवाड, जयवंत काळे, पंडीत पवळे, आनंद रेनगुंटवार, स्मिता कुंडलवाडीकर, मुमताज बेगम, त्रिवेणी झाडे आदी शिक्षक उपस्थित होते.

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षक दिनानिमित्त आमच्याशी संवाद साधून खऱ्या अर्थाने गौरव केला आहे. त्यांनी आमच्याशी केवळ संवादच साधला नाही तर अडी-अडचणीही समजून घेतल्या आहेत. आम्हाला प्रश्न मांडण्याची संधी दिली. शासनस्तरावर योग्य ती दखल घेतली जाईल व शिक्षकांसोबत मिळून अधिक चांगले जे काही असेल ते शिक्षण क्षेत्रासाठी आपण करू ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भुमिका आम्हा सर्व शिक्षकांचे मनोबल उंचावणारी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी दिली.

 

यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार माळोदे यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

000000







No comments:

Post a Comment