Friday, July 20, 2018


मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेचे
प्रस्ताव 31 ऑगस्ट पूर्वी सादर करावीत   
नांदेड, दि. 20 :- प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत "मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेस" मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व इच्छुकांनी प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांचेकडे मंगळवार 31 ऑगस्ट 2018  पुर्वी सादर करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर. बी. चलवदे यांनी केले आहे.          
शेतीमालाचे मूल्यवर्धन, उत्पादन अन्न पदार्थांच्या गुणवत्तेत वाढ, शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, बाजारपेठेची निर्मिती यासह ऊर्जा बचतीसाठीच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची निर्यात आणि ग्रामीण भागातील लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ही प्रक्रिया कर्ज निगडीत असुन यासाठी पूर्वी शासकीय / अशासकीय संस्थेकडून अनुदान घेतले असल्यास त्याचा तपशील अर्जासोबत देणे अनिवार्य आहे.
या योजनेत कृषि व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृध्दी व आधुनिकीकरण, शीतसाखळी योजना, मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना तसेच राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानेंतर्गत मंजूर, भौतिकदृष्टया उत्पादन सुरु व प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देय  राहील.
शासकीय / सार्वजनिक उद्योग, सक्ष्म शेतकरी उत्पादक कंपनी / गट महिला स्वयंसाहाय्यता गट, खाजगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था या अन्न प्रक्रिया प्रकल्पांपैकी फळे व भाजीपाला सारख्या नाशवंत शेतमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच अनुदान मर्यादा, सयंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्प बांधकामाच्या खर्चाच्या 30 टक्के अनुदान, कमाल मर्यादा  50 लाख रुपये असेल. ज्या प्रस्तावांना राष्ट्रीयकृत, व्यापारी व शेडयुल्ड बँकेकडील कर्ज मंजूर आहे असे प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे मंगळवार 31 ऑगस्ट 2018  पुर्वी सादर करावीत. सर्व शेतकरी व इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नवा मोंढा नांदेड (दूरध्वनी क्र. 02462- 284252) येथे संपर्क साधवा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर. बी. चलवदे यांनी केले आहे.     
00000




भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
शेतकऱ्यांनी 7 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावीत  
नांदेड, दि. 20 :- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यास 490.00 लक्ष रुपयाचे आर्थिक लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मंगळवार 7 ऑगस्ट 2018 पर्यंत संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
या योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सोडतीनंतर दोन दिवसात सात-बारा व आठ-अ चा उतारा, संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र, हमीपत्र, आधार कार्ड प्रत, जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती) आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकातील प्रथम पानाची प्रत (फोटो सहीत) इ. कागदपत्रे तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावीत.
या योजनेंतर्गत फळबाग आंबा कलमे, आंबा कलमे (सधन लागवड), काजु कलमे, पेरु कलमे, पेरु कलमे (सधन लागवड), दाळींब कलमे, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबु कलमे, संत्रा कलमे (इंडो इस्त्राईल तंत्रज्ञान), नारळ रोपे बानावली, नारळ रोपे टी/डी, सिताफळ कलमे, आवळा कलमे, चिंच कलमे, जांभुळ कलमे, पोकम कलमे, फनस कलमे, अंजीर कलमे, चिकु कलमे इ. तसेच या योजने अंतर्गत कलमांच्या लागवडीला (नारळ वगळता) अनुदान देय राहील. योजनेअंतर्गत फळबागेसाठी ठिबक सिंचन बंधनकारक राहील. फळपिकांचे कलमे / रोपे प्राधान्याने शासकीय, कृषि विद्यापीठ, राष्ट्रीय संशोधन संस्था व राष्ट्रीय बागबानी मंडळ, मानांकीत रोपवाटीकेतुनच घेणे बंधनकारक राहील.
प्रत्येक तालुक्यात प्राप्त होणाऱ्या आर्थिक लक्षांकाच्या मर्यादित योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. फळबाग लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे 50, 30 व 20 टक्के प्रमाणे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अदा करण्यात येईल.
या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज भरुन घ्यावा. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा. योजनेच्या अटी व शर्तींचा भंग झाल्यास लाभार्थी वसुली व दंडात्मक कारवाईस प्राप्त राहील. या योजनेचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
000000


‘महाराष्ट्र माझा 2018’ छायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन
छायाचित्रांचे भरणार राज्यभर प्रदर्शन
नांदेड, दि. 18 :- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा 2018’ छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा आज जाहीर केली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 25 हजार रूपये, 20 हजार रूपये, 15 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत.
            ‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्,माझीकन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maharashtramaza2018@gmail.com या ईमेलवर दि. 31 जुलै 2018 पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र 18X30 इंचएचडी (हायरिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यातयेणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000


संप कालावधीत सर्व प्रकारच्या
वाहनातून माल वाहतुकीस परवानगी  
नांदेड, दि. 20 :- विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉग्रेस यांनी शुक्रवार 20 जुलै पासून माल वाहतूकदराचे बेमुदत चक्का जामआंदोलन करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाने 19 जुलै 2018 रोजी अधिसुचनेद्वारे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांतून, खाजगी वाहनांतून त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या कंत्राटी व टप्पा वाहतुक करणाऱ्या बसेस मधून माल वाहतुकीस अंदोलन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी परवानगी दिली आहे, असे नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी कळविले आहे.    
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...