Tuesday, June 13, 2017

बालकामगार विरोधी दिन
विविध उपक्रमांनी साजरा
नांदेड, दि. 13 :-  जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जनजागृती रॅलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले. या रॅलीस उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प सचिव अनुराधा ढालकरी यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.  
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 9 विशेष प्रशिक्षण केंद्र चालविले जातात. त्यामध्ये एकूण 443 बालकामगारांना शिक्षण दिले जाते. नांदेड शहरांतर्गत एकूण 6 विशेष प्रशिक्षण केंद्र असून त्यामध्ये 300 बालकामगारांना शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांपैकी 120 जणांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला आहे.
यावेळी नायब तहसिलदार तथा प्रभारी प्रकल्प संचालक डी. एन. पोटे, सहाय्यक कामगार आयुक्त श्री. मोरुडे, कामगार अधिकारी अविनाश पेरके, कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती रुक्मीणी पवळे, तसेच शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. रॅलीचा समारोप बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झाला. तसेच अर्धापूर, भोकर, मुदखेड याठिकाणी बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला.

000000

Monday, June 12, 2017

जिल्हा रुग्णालयातील समुपदेशकाच्या
प्रसंगावधानाने अपघातग्रस्ताचे वाचले प्राण  
नांदेड, दि. 12 :-  छत्रपती चौक ते मोर चौक या रस्त्यावर रविवारी 11 जुन रोजी रात्री 9.30 वा. दरम्यान  दुचाकीस्वार विजय राम वाघमारे, एकतानगर यांचा वाहन घसरुन अपघात झाला. या अपघातात प्रसंगावधान राखून जिल्हा रुग्णालय येथील समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांनी मदतीचा हात पुढे केला. यामुळे दुचाकीस्वाराचा प्राण वाचला.
छत्रपती चौक ते मोर चौक या रस्त्यावर दुचाकीस्वाराचा वाहन घसरुन अपघात झाल्याचे श्री सुवर्णकार यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता 108 या रुग्णवाहिकेमार्फत संबंधीत जखमी श्री. वाघमारे यांना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यामुळे वाघमारे यांना प्रथपोचार तात्काळ मिळाल्याने त्यांचा प्राण वाचला. सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. अपघाताच्या घटनेत प्रसंगावधान राखून मदत करणाऱ्या सुवर्णकार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांने कौतूक केले. जखमी वाघमारे यांच्या वरील उपचारासाठी रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी, तसेच ईएमएस समन्वयक सचिन कोताकोंडावर यांनी सहकार्य केले.

000000
दहावीचा निकाल आज जाहीर होणार
नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार 13 जून 2017 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, असे जाहीर प्रकटन शिक्षण मंडळाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.  
या प्रकटनात म्हटले आहे की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी मार्च 2017 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.knowyourresult.com, www.rediff.com/exams, www.jagranjosh.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. या परीक्षेचा निकाला एसएमएस सेवेद्वारे मोबाईल फोनवरुन देखील उपलब्ध होणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

000000
जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 12 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 13 जून 2017 रोजी पेन्‍शन अदालत आयोजीत करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्‍त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अडचणी निवारण्‍यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्‍यात आले आहे.

000000
जिल्ह्यात गत 24 तासात
 एकूण 64.26 मि.मी. पाऊस
          नांदेड, दि. 12 - जिल्ह्यात सोमवार 12 जून 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकुण 64.26 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 4.02  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 70.36 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 12 जून 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 0.13 (46.52), मुदखेड- 4.50 (56.95), अर्धापूर- 7.33 (66.32) , भोकर- 12.50  (111.25) , उमरी- निरंक (27.00), कंधार-2.00 (55.50), लोहा-2.00 (72.66), किनवट-3.86 (139.28), माहूर-0.50 (36.50), हदगाव-0.57 (218.32), हिमायतनगर-1.33 (63.49), देगलूर- निरंक  (43.47), बिलोली- 4.60 (32.60), धर्माबाद- निरंक (53.00), नायगाव-5.80  (34.00), मुखेड-19.14 (68.88) आज  अखेर  पावसाची सरासरी 70.36 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1125.74) मिलीमीटर आहे.
00000000


Saturday, June 10, 2017

कौशल्य वृद्धी योजनांद्वारे युवकांनी
विकासाची संधी साधावी - जिल्हाधिकारी डोंगरे
तीन दिवसीय "मोदी फेस्ट"ला मल्टी पर्पज मैदानावर प्रारंभ

नांदेड दि. 10 :- केंद्र सरकारच्यावतीने युवकांच्या कौशल्य वृद्धी आणि स्वयंरोजगाराच्या संधीबाबत जास्तीतजास्त योजनांमधून भर देण्यात येत आहे. या कौशल्य विकास योजनांद्वारे संधीचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे केले.
केंद्र सरकारच्या तीन वर्षे यशस्वी वाटचाली निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोदी फेस्ट (MODI Fest Making of Devloped India) "मोदी महोत्सव" या कार्यक्रमाचे आज जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. वजिराबाद येथील मल्टी पर्पज मैदानावर या तीन दिवसीय "मोदी फेस्ट"चे आयोजन करण्यात आले आहे.
या उद्घाटन प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रदर्शनाचे संयोजक तथा एनएफडीसी-मुंबईचे समन्वय अधिकारी अंकुश अग्रवाल, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, नगरसेविका गुरप्रीतकौर सोडी, भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिलीपसिंघ सोडी, विनायकराव नांदेडकर, रामराव केंद्रे, विजय गंभीरे, शीतल खांडील, दिलीपसिंह ठाकूर, डॉ शीतल भालके, प्रमोद टेहरे, उभानलाल यादव, धीरज स्वामी, कोषाध्यक्ष बालाजी गिरगावकर, जिल्हा परिषद हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. कच्छवे आदींची उपस्थिती होती.
केंद्र शासनाच्या तीन वर्षेपुर्तीच्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने देशातील तीनशे जिल्ह्यांची या वैशिष्ट्यपुर्ण कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. विविध योजनांची माहिती या प्रदर्शनात दृकश्राव्य माध्यमांद्वारे व प्रदर्शनाद्वारे देण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3.30 यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात भारतीय स्टेट बँकेच्यावतीने विविध योजनांची माहिती देणारे सहा दालने उभारण्यात आली आहे. दिवसभरात या प्रदर्शनात केंद्र सरकारच्या कृषि कल्याण, आवास, विकास, पीक विमा, सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वल अशा अनेकविध योजनांची माहिती दृकश्राव्य स्वरुपात देण्यात येत आहे. यामुळे योजनांसाठी पात्र लाभार्थी, अर्ज करण्याची पद्धती, आदींची तपशीलवार माहिती मिळणार आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, केंद्र सरकारने लोकाभिमुख आणि विकासाभिमुख विविध योजना कार्यांन्वीत केल्या आहेत. या योजनांची तपशीलवार माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अशाप्रकारचे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. विशेषत: कौशल्य विकासाच्या योजनांची युवकांनी माहिती घ्यावी, आणि त्यातील संधींचा पुरेपुर वापर करुन स्वत:चा विकास साधावा.
प्रदर्शनाचे सुरुवातीला फीत कापून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तसेच एनएफडीसीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. मुख्याध्यापक कच्छवे यांनी प्रास्ताविक केले. जी. एम. कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले व आभार मानले.  

000000
डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन संपन्न
नांदेड दि. 10 :- डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयात आज करण्यात आले.  हा सप्ताह 10 ते 16 जून 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
भारतात अंधत्व दूर करण्यासाठी स्वतंत्रपणे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सन 1976 पासून राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचा जन्म 10 जून 1926 रोजी झाला. ते प्रख्यात नेत्र शल्य विशारद होते. त्यांनी त्यांच्या कालावधीत दहा हजार यशस्वी मोतीबिंदू शत्रक्रिया केल्या. त्यांचा मृत्यू 10 जून 1979 रोजी झाला. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  कदम, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर.गुंटूरकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. भोसीकर, डॉ. साखरे, डॉ. लोकडे, डॉ. हजारी, डॉ. सोनकांबळे, डॉ. चिखलीकर, डॉ. बंडेवार यांची उपस्थिती होती. श्रीमती ज्योती पिंपळे यांनी नेत्रदान  करण्याविषयी आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (रा.अं.नि.का.) डॉ. एस. बी. सिरसीकर यांनी केले तर आभार नेत्र चिकित्सा अधिकारी व्ही. डी. दिक्षित यांनी मानले.

0000000

दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. पाणी, चारा व रोजगार हमीच्या कामांचा आढाव...