Wednesday, September 30, 2026

 वृत्त क्रमांक

पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी नियोजन करा-मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

 

नांदेड (जिमाका), दि. 30 : दुष्काळसदृश परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा तत्परतेने उपलब्ध करून देतानाच पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी नियोजन करावे. टंचाई आराखडा हा प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित असावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले.

उमरी येथील पंचायत समितीमध्ये नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीअंतर्गत विविध विभागांचे तसेच ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सर्व विभागांनी संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे. टंचाई आराखड्यात आवश्यक उपाययोजनांचा समावेश करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना सीईओ महेश पाटील यांनी दिल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व इतर घरकुल योजनांतील लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (RHE) व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गावनिहाय विशेष शिबिरे आयोजित करावीत. लाभार्थ्यांच्या अडचणी शक्यतो जागेवरच सोडवून घरकुलांची कामे गतिमान करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

सेवा संकल्प अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवून नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवावा. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात 100 टक्के सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या माध्यमातून नागरिकांना गावातच विविध ऑनलाइन सेवा व आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत. नागरिकांना अनावश्यकपणे तालुका कार्यालयात येण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतींचे प्रशासन अधिक पारदर्शक व सक्षम करण्यासाठी सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवावेत, नोंदी नियमितपणे पूर्ण कराव्यात तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, गट विकास अधिकारी ए. एल. सरोदे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

*******

 

 वृत्त क्रमांक

महा-उपलब्धी अॅपची  निवृत्तीवेतनधारकांना माहिती देण्यासाठी मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका), दि. 30 : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन विषयक सेवा जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘Maha-UPLABHDHI’ (महा-उपलब्धी) मोबाईल अॅपबाबत माहिती देण्यासाठी मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

वित्त विभागाच्या दि. 19 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या मोबाईल अॅपच्या विविध सुविधांची माहिती निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना व्हावी, यासाठी अॅपच्या वापराबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

नांदेड कोषागारामार्फत निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व संबंधितांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून Maha-UPLABHDHI मोबाईल अॅपच्या सुविधांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी शोभा मुंढे यांनी केले आहे.

******

 वृत्त क्रमांक 

भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहसचिव पी. नरहरी यांचा शुक्रवारी नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका), दि. 30 : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहसचिव (भू.सं.) पी. नरहरी हे शुक्रवार, दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

सहसचिव पी. नरहरी हे शुक्रवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता हैद्राबाद येथून नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता त्यांचे नांदेड येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने आयोजित विशेष ग्रामसभेस ते उपस्थित राहतील.

दुपारी 1.30 वाजता जेवणासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी 2 ते 4 या कालावधीत ते जिल्हा प्रशासनाची भेट घेणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ते नांदेड येथून हैद्राबादकडे प्रयाण करतील.

********

 वृत्त क्रमांक 

अनोळखी निराधार रुग्णाला मिळाला मायेचा आधार 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयातून मदर तेरेसा शांतिनिकेतनमध्ये पुनर्वसन

 

नांदेड (जिमाका), दि. 30 : उपचारानंतर अनोळखी व निराधार रुग्णाला सुरक्षित निवारा, काळजी आणि आधार मिळवून देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील औषधवैद्यकशास्त्र विभागाने माणुसकीचा संवेदनशील परिचय दिला. विभागाच्या पुढाकारातून सुमारे 60 वर्षीय रुग्णाचे मदर तेरेसा होम शांतिनिकेतन, मालटेकडी, नांदेड येथे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यात आले.

सदर रुग्णास दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, हिंगोली येथून 108 रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील औषधवैद्यकशास्त्र विभागातील कक्ष क्र. 34 मध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान रुग्णाकडून मिळालेल्या माहितीनुसार तो हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील बेरुळा येथील रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानुसार दि. 20 ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे औंढा नागनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करून रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रुग्णाचे त्या ठिकाणी वास्तव्य असले तरी त्याची देखभाल व काळजी घेण्यासाठी जबाबदार नातेवाईक उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णाच्या उपचारानंतरच्या स्थितीचा तसेच त्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्याला सुरक्षित निवारा व पुढील काळजीची आवश्यकता असल्याने मशिनरीज ऑफ चॅरिटी, मदर तेरेसा होम शांतिनिकेतन, मालटेकडी, नांदेड यांच्याशी संपर्क साधण्यात आला. संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर रुग्णाच्या पुनर्वसनाची कार्यवाही करण्यात आली.

दि. 29 सप्टेंबर रोजी औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या पथकाने रीतसर डिस्चार्ज प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेद्वारे वाहनचालक श्री. आवराळे व कक्ष सेवक मारुती राठोड यांच्या समवेत रुग्णास मदर तेरेसा शांतिनिकेतन येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले.

या पुनर्वसन प्रक्रियेस अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे तसेच औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. शीतल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) संतोष मुंगल यांनी संबंधित विभाग, पोलीस प्रशासन आणि मदर तेरेसा शांतिनिकेतन यांच्यात समन्वय साधून पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली.

उपचारासोबतच निराधार रुग्णाला सुरक्षित निवारा व आधार मिळवून देण्याच्या या प्रयत्नातून ‘रुग्णसेवा हीच समाजसेवा’ या भावनेचा प्रत्यय आला.

******




केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...