वृत्त क्रमांक
अनोळखी निराधार रुग्णाला मिळाला मायेचा आधार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयातून मदर तेरेसा शांतिनिकेतनमध्ये पुनर्वसन
नांदेड (जिमाका), दि. 30 : उपचारानंतर अनोळखी व निराधार रुग्णाला
सुरक्षित निवारा, काळजी आणि आधार मिळवून देत शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील औषधवैद्यकशास्त्र
विभागाने माणुसकीचा संवेदनशील परिचय दिला. विभागाच्या पुढाकारातून सुमारे 60 वर्षीय रुग्णाचे मदर तेरेसा होम शांतिनिकेतन, मालटेकडी,
नांदेड येथे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यात आले.
सदर रुग्णास दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, हिंगोली येथून 108 रुग्णवाहिकेद्वारे पुढील
उपचारासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील
औषधवैद्यकशास्त्र विभागातील कक्ष क्र. 34 मध्ये दाखल करण्यात
आले होते.
उपचारादरम्यान रुग्णाकडून मिळालेल्या
माहितीनुसार तो हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील बेरुळा येथील रहिवासी
असल्याचे समोर आले. त्यानुसार दि. 20 ऑगस्ट रोजी
पोलीस ठाणे औंढा नागनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करून रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध
घेण्यात आला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रुग्णाचे त्या ठिकाणी वास्तव्य असले
तरी त्याची देखभाल व काळजी घेण्यासाठी जबाबदार नातेवाईक उपलब्ध नसल्याचे स्पष्ट
झाले.
रुग्णाच्या उपचारानंतरच्या स्थितीचा तसेच
त्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्याला सुरक्षित निवारा व पुढील काळजीची
आवश्यकता असल्याने मशिनरीज ऑफ चॅरिटी, मदर तेरेसा
होम शांतिनिकेतन, मालटेकडी, नांदेड
यांच्याशी संपर्क साधण्यात आला. संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर
रुग्णाच्या पुनर्वसनाची कार्यवाही करण्यात आली.
दि. 29 सप्टेंबर
रोजी औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या पथकाने रीतसर डिस्चार्ज प्रक्रिया पूर्ण केली.
त्यानंतर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेद्वारे वाहनचालक श्री. आवराळे व कक्ष सेवक मारुती
राठोड यांच्या समवेत रुग्णास मदर तेरेसा शांतिनिकेतन येथे सुरक्षितपणे दाखल
करण्यात आले.
या पुनर्वसन प्रक्रियेस अधिष्ठाता डॉ.
सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे
तसेच औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. शीतल राठोड यांचे
मार्गदर्शन लाभले. समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) संतोष मुंगल यांनी संबंधित विभाग,
पोलीस प्रशासन आणि मदर तेरेसा शांतिनिकेतन यांच्यात समन्वय साधून
पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली.
उपचारासोबतच निराधार रुग्णाला सुरक्षित
निवारा व आधार मिळवून देण्याच्या या प्रयत्नातून ‘रुग्णसेवा हीच समाजसेवा’ या
भावनेचा प्रत्यय आला.
******


No comments:
Post a Comment