Tuesday, October 27, 2026

वृत्त क्रमांक

बालकांचे आरोग्य जपण्यासाठी नियमित जंतनाशक गोळ्यांचे सेवन आवश्यक

• जिल्हा रुग्णालय नांदेड येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन

• 3 नोव्हेंबरला पूरक मोहीम

नांदेड, दि. 27 : बालकांना जंतांच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून त्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे मंगळवारी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. पेरके यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेद्वारे 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपमा बालाजी शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. बुट्टे, डॉ. लोमटे, प्रभारी परिचारिका रेखा मुंडे, परिचारिका जयश्री वाघ, आरकेएसके समुपदेशक धनश्री गुंडाळे तसेच परिचर्या विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करताना जंतांच्या प्रादुर्भावामुळे रक्तक्षय होऊ शकतो, तसेच वारंवार पोटदुखीचा त्रास उद्भवू शकतो, असे सांगण्यात आले. बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दर सहा महिन्यांनी जंतनाशक गोळी देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळ्या देण्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना अल्बेंडाझोल गोळीची अर्धी मात्रा योग्य पद्धतीने देण्यात येणार आहे, तर 2 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना एक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या दिवशी, म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी 3 नोव्हेंबर 2026 रोजी पूरक मोहीम (मॉप-अप दिन) राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार जंतनाशक गोळी देऊन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. पेरके यांनी केले आहे.

***





No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक नांदेडमध्ये १४ वर्षीय प्रणव मेंडके बेपत्ता ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन नांदेड, दि. २८ ऑक्टोबर : नांदेड शहरातील भाग्यनगर प...