Tuesday, September 15, 2026

वृत्त क्रमांक

कर्मचारी सर्वंकष माहितीकोष-२०२६ साठी शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन नोंदविण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. १५ :  शासनाच्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-२०२६ तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेडमार्फत सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील तसेच आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची दि. १ जुलै २०२६ हा संदर्भ दिनांक धरून माहिती ऑनलाइन आज्ञावलीत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


या माहितीकोषासाठी नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी तसेच तदर्थ तत्त्वावर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. यासाठी https://mahaces.maharashtra.gov.in/⁠ तसेच http://13.204.181.90:8080/EMDB/login⁠ या संकेतस्थळावर प्रवेश करून गतवर्षीचा डीडीओ कोड हा वापरकर्ता संकेतांक (युजरनेम) म्हणून वापरावा. संकेतशब्द (पासवर्ड) जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावा. गतवर्षीचे वापरकर्ता संकेतांक व संकेतशब्द कायम ठेवण्यात आले आहेत.


ऑनलाइन माहिती नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-१ जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्वीकारली जाणार नाहीत, याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागार कार्यालयात सादर होत नाहीत, अशा कार्यालयांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांची तसेच रिक्त पदांची माहिती ऑनलाइन आज्ञावलीद्वारे नोंदविणे आवश्यक आहे.


कर्मचारी सर्वंकष माहितीकोष-२०२६ साठी आवश्यक माहिती विहित पद्धतीने ऑनलाइन नोंदवावी. अधिक माहितीसाठी उपआयुक्त, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड
दूरध्वनी : ०२४६२-२५२७७५
ई-मेल : dso.nanded88@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त अर्जुन झाडे, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड यांनी केले आहे.
 
****

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा नांदेड (जिमाका), दि. 16 : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे दि. ...