Wednesday, June 24, 2026

वृत्त क्रमांक 

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास लोहा तालुक्यात प्रारंभ

नांदेड, दि. २४ जून:— भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision - SIR) 2026 राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत लोहा तालुक्यातील सर्व मतदारांना गणना फॉर्म (EF) भरून देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत दि. 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. भेटीदरम्यान प्रत्येक मतदाराला गणना फॉर्म वितरित करण्यात येणार असून तो काळजीपूर्वक भरून संबंधित अधिकाऱ्याकडे परत करणे बंधनकारक राहणार आहे.

प्रशासनाच्या सूचनेनुसार, गणना फॉर्मसोबत अलीकडील पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून ती BLO यांच्याकडे जमा करावीत. फॉर्म भरून परत करण्याची जबाबदारी संबंधित मतदाराची राहणार आहे.

फॉर्म सादर न करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याने सर्व मतदारांनी या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विठ्ठल परळीकर, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, लोहा यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   चार दिवस येलो अलर्ट जारी नांदेड , दि. 24 जून :  प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक २४ जून २०२६ रोजी दिलेल्या...