Tuesday, June 2, 2026

वृत्त क्रमांक 

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी

भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक

'गोजातीय प्रजनन व नियमन' विषयावर कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 2 जून:- राज्यातील खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून राज्यातील पशुवैद्यकीय सेवेची संख्यात्मक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार असून, त्यामुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा व गुणवत्ता आणखी वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले.

औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू हॉल येथे 'गोजातीय प्रजनन व नियमन' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त पशुसंवर्धन तथा अध्यक्ष, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरण डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत विविध तज्ज्ञ अधिकारी, सेवा पुरवठादार आणि संस्थात्मक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यासोबतच कृत्रिम रेतन (AI) सेवा आणि नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंगच्या तांत्रिक एकत्रीकरणावर तसेच राज्य व केंद्र सरकारच्या भविष्यकालीन धोरणांवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त व प्राधिकरणाचे सदस्य डॉ. देवेंद्र जाधव यांच्या प्रास्ताविकाने झाली.

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी 'महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृत्रिम रेतन सेवा आणि NDLM डिजिटल ट्रॅकिंग आवश्यक असल्याने या तांत्रिक बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. राज्यामध्ये उच्च उत्पादनक्षम पशुधनाच्या संख्यात्मक वाढीसाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी कृत्रिम रेतनाच्या कार्यात अधिकधीक पारदर्शकता निर्माण करणे आवश्यक आहे. खाजगी कृत्रिम सेवादातांनी याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या सोबतीने काम केले पाहिजे. या कामात खाजगी कृत्रिम सेवादातांना पशुसंवर्धन विभाग सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही उपस्थितांना डॉ. किरण पाटील यांनी दिले. 

तज्ज्ञांचे सादरीकरण आणि तांत्रिक सत्र

कार्यशाळेच्या उत्तरार्धात विविध संस्थांच्या तज्ज्ञांनी आपले अनुभव आणि तंत्रज्ञान याविषयी सादरीकरण केले. बायफ, पुणे येथील डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीतील बायफच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. चितळे-ABS जेनस प्रा. लि. चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी 'जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन' या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गोवंश उत्पादकता व पैदास कशी सुधारावी, याबद्दल तांत्रिक माहिती दिली.

भारत पशुधन प्रणालीची उपयोगिता व वापर याबाबत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. राजू कोलते यांनी उपस्थित खाजगी कृत्रिम सेवादात्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रानंतर उपस्थित सर्व प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन विविध मुद्द्यांवर अभिप्राय घेण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. प्रशांत भड यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. 

0000



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल नांदेड दि. 2  जून :- नांदेड विधान परिषदेच्‍या स्‍थानिक प्राधिकारी मतदा...