वृत्त क्रमांक 456
जिल्हा युवा पुरस्कारासाठी संदिप कळासरे यांची निवड
1 मे रोजी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त खेळाडुंचा होणार गौरव
नांदेड दि. 30 एप्रिल :- जिल्हास्तर युवा पुरस्कार निवड समितीमार्फत सन 2024-25 (युवक) करीता संदिप हरीभाऊ कळासरे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असुन सदरचा पुरस्कार महाराष्ट्र दिन 1 मे, 2025 चा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 चा अजय माधव पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू) रा. किनवट व सन 2023-24 चा लताताई परमेश्वर उमरेकर (पॅरा ऑलम्पिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू) रा. नांदेड यांना महाराष्ट्राचे मा. राज्यपाल महोदय व इतर मान्यवर यांच्या हस्ते बालेवाडी पुणे येथे गौरविण्यात आले असल्याने ते नांदेड जिल्हयाचे रहिवाशी असल्याने अजय माधव पेंदोर व लताताई परमेश्वर उमरेकर यांचा सुध्दा महाराष्ट्र दिन रोजी मान्यवरांच्य हस्ते यथोचीत सत्कार करण्यात येणार आहे.
राज्याचे युवा धोरण सन 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय 12 नोव्हेंबर 2013 अन्वये जिल्हयात कार्यरत असलेल्या युवक, युवतीं व नोंदणीकृत संस्थानी केलेल्या समाजहिताच्या उल्लेखीत कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी जिल्हयातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थाकडून जिल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 या वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुषंगाने प्राप्त प्रस्तावाची जिल्हास्तर युवा निवड समितीच्यावतीने छाणणी करुन अंतिम पुरस्कारार्थीची नावे निवडण्यात आली आहेत.
जिल्हयातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, विविध एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी दिनांक 1 मे, 2025 रोजी वेळ सकाळी 8 वा. पोलीस परेड मैदान वजिराबाद नांदेड येथे मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment