Monday, August 17, 2020

 वृत्त क्र. 770        

शनिवारी सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत

अटी व शर्तींच्या अधिन राहून दुकाने चालू ठेवण्यास मुभा  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात दर शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी रहावी यासाठी प्रत्येक शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने अटी व शर्तींच्या अधिन राहून चालू  ठेवण्याची मुभा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने शनिवार व रविवार वगळून सकाळी 9 ते सायं. 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे. परंतू शनिवार व रविवारी दुकाने, आस्थापना बंद असल्यामुळे दर शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची गर्दी वाढत होती. उपाययोजनेचा एक भाग म्हणून सदर गर्दी कमी होण्यासाठी नांदेड जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे मुभा दिली आहे.    

 

तसेच कोव्हिड-19 च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या सूचना व निर्देशाचे जो कोणी पालन करणार नाही अशा व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मान्यात येईल व कारवाई करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...