Saturday, June 24, 2017

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या
माध्यमातून ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा – मुख्यमंत्री
राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई, दि. २४ : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय असून त्यामुळे महाराष्ट्रातील ८९ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कर्जमाफीमुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्या बँक खात्यात २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
            या ऐतिहासिक निर्णयासंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.
            मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता राज्य शासनाने देशाच्या इतिहासातील अभुतपूर्व असा कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. २०१२ पासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जात बुडाले होते.  कर्ज भरु शकत नसल्याने कर्जमाफी करण्याबाबत मागणी होत होती. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध घटकांशी चर्चादेखील सुरु होत्या. दरम्यानच्या काळात झालेल्या शेतकरी आंदोलनातही राज्य शासनाने शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. मंत्रिगटाची उच्चाधिकार समिती नियुक्त करुन त्यांनी विविध घटकांशी आणि शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार राजू शेट्टी यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा केली.
            सर्वांशी चर्चा करुन राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रापेक्षा अन्य राज्यात घरटी कृषी कर्जाची रक्कम दुप्पट आहे. केंद्र शासनाने संपूर्ण देशात कर्जमाफी केली होती. त्यात महाराष्ट्राची ७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. यावर्षी राज्य शासनाने अभुतपूर्व अशी ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार असून यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. जे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येईल. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे.
            राज्य शासनाने घेतलेल्या अभुतपूर्व निर्णयाचा सर्व पक्ष, संघटना स्वागत करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निधी उभा करण्याकरिता सर्व मंत्री आणि आमदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या १० हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे राज्य शासनावर आर्थिक भार येणार असला तरी अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पैसा उभारण्याकरिता बँकांशी संपर्क साधून हप्ते पाडून त्याची परतफेड करण्यात येणार आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतीमधील  गुंतवणूक वाढविण्यात येणार असून शेतमालाला हमी भाव मिळण्याकरिता केंद्र शासनाशी चर्चा करुन त्यासंदर्भात एक यंत्रणा निर्माण करण्यात येईल. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या कृषीमालाला योग्य तो भाव मिळण्यास मदत होईल.
·         राज्य शासनाने केली देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर.
·         राज्य शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक होते, आज मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी.
·         कजमाफीची योजना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना नावाने ओळखली जाणार.
·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना विविध पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली.
·         इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रातील कर्जाची रक्कम कमी
·         ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ.
·         या कर्जमाफीमुळे ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा
·         ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ
·         या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.
·         जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार.
·         जे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येईल.
·         शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निधी उभा करण्याकरिता सर्व मंत्री आणि आमदार एक महिन्याचे वेतन जमा करणार
·         शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतीमधील  गुंतवणूक वाढविणार.

·         शेतमालाला हमी भाव मिळण्याकरिता केंद्र शासनाशी चर्चा करुन त्यासंदर्भात एक यंत्रणा निर्माण करणार.
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी
‘सर्वांना परवडणारी घरे’ या विषयावर
27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 24 :दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय”हा कार्यक्रम यावेळी “सर्वांना परवडणारी घरे”या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी  दि. 27 जून 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.comया ई-मेल वर तसेच 8291528952 या क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे रेकॉर्डिंग करून किंवा संदेश स्वरूपात पाठवता येतील, सोबत आपले छायाचित्रही पाठवता येऊ शकेल.
“सर्वांना परवडणारी घरे”या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात महारेरा, म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शहरांचा विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.
या कार्यक्रमात नगर विकास, गृहनिर्माण, ग्राम विकास विभाग तसेच, सिडको, महारेरा, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण सारख्या प्राधिकरणांचा समावेश असेल.

००००
 जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 10.84 मि.मी. पाऊस
          नांदेड, दि. 24 - जिल्ह्यात शनिवार 24 जुन 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 10.84 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 173.50  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 132.86 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13.90 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 24 जुन रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 28.25 (195.40), मुदखेड- 8.67 (160.00), अर्धापूर- 4.00 (128.66) , भोकर- 2.25  (148.00) , उमरी- 3.33 (85.00), कंधार-16.50 (156.01), लोहा-14.83 (138.00), किनवट- 16.71 (151.00), माहूर- 3.50 (132.38), हदगाव- 4.29 (170.05), हिमायतनगर- 5.00 (93.48), देगलूर- 3.50  (96.50), बिलोली- 18.80 (114.60), धर्माबाद- 15.67 (123.34), नायगाव- 20.20  (113.26), मुखेड- 8.00 (120.00) आज  अखेर  पावसाची सरासरी 132.86 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2125.68) मिलीमीटर आहे.

00000

Friday, June 23, 2017

पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करावे  
                                                - डॉ. अफरोज अहेमद
            नांदेड, दि. 23 :-  ग्लोबल वार्मिंगच्या नुसत्याच चर्चा करुन चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करुन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आज ज्या गतीने जंगल नष्ट होत आहेत त्याच गतीने जंगलाचे संवर्धनही करण्याची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये पर्यावरण एक गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळेच केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून वनांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याला यशही येत असल्याचे मत पर्यावरण व पुनर्वसन समितीचे केंद्रीय सदस्य डॉ. अफरोज अहेमद यांनी व्यक्त केले.
           
सरदार सरोवर प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर वनजमीन गेली आहे. त्यात लाखो विविध प्रकारचे झाडे नष्ट झाले आहेत. त्याची भरपाई म्हणून गायरान जमिनीवर वन विभागाकडून पर्यायी वनीकरण करण्यात येत आहे. त्यात हदगाव तालुक्यातील कोहळी येथे 540 हेक्टर खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी डॉ. अहेमद नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती श्री बग्गा हे देखील होते.
यावेळी डॉ. अहेमद म्हणाले की, सरदार सरोवरामध्ये महाराष्ट्रातील 33, मध्यप्रदेशातील 152 तर गुजरातमधील 19 गावे गेली. सुमारे 46 हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील 11 गावे मुलभुत सोयी-सुविधांयुक्त वसविण्यात आली आहेत. यात बहुतांश आदिवासी लोकांचा समावेश आहे. आज आदिवासी कुटुंबातील मुलेही उच्च शिक्षण घेत आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शिवाय 1 हजार 450 मेगा वॅट वीजही तयार होत आहे. त्यापैकी 300 मेगा वॅट वीज ही महाराष्ट्राला मिळत आहे. शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार, हदगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. एस. एस. एखंडे, वनसर्वेक्षक मोहन कोस्केवार, नांदेड नेचर क्लबचे हतिंद्र कट्टी, महेश होकर्णे व कर्मचारी उपस्थित होते.

000000
पशु-पक्षांना फटाकाच्या ध्वनी पासून
त्रास होऊ देऊ नका
नांदेड दि. 23 :- पशु व पक्षांना फटाक्यांच्या ध्वनी प्रदुषणांचा भयंकर त्रास होत असल्याने हे मुके पशु पक्षी तीव्र ताण व दडपणाखाली जगत असतात. प्रत्येक सणावाराच्या व समारंभाच्यावेळी फोडण्यात येणाऱ्या फटाक्याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत जनजागृती करुन त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे आवश्यक आहे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन तथा सदस्य सचिव महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ यांच्यावतीने जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
मंडप, पेंडॉल तपासणीसाठी समिती गठीत
नांदेड दि. 23 :- मा. उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्राकरीता मंडप, पेंडॉल तपासणीसाठी सनियंत्रण समिती आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये गठीत करण्‍यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी असून सदस्य नांदेड महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष कंदेवाड व नांदेड पोलीस उपअधिक्षक (गृह) विश्वास नांदेडकर हे आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, सर्व सनियंत्रण समिती सदस्य शासन परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही करतील. मंडप तपासणी समितीने सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभासाठी उभारण्‍यात येणा-या पथकांच्‍या क्षेत्राबाबतचा प्रस्‍ताव  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रत्‍येक वर्षी जानेवारी महिन्‍याच्‍या 10 तारखेपर्यंत सादर करतील. त्‍याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जानेवारी महिन्‍यांच्‍या 21 तारखेपर्यत मंडप तपासणी पथक, पथके गठीत करण्‍याबाबतचे आदेश निर्गमित केले जातील.  गठीत करण्‍यात आलेल्‍या मंडप तपासणी पथकाची माहिती सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये दर्शनीय भागावर प्रदर्शित करावी. समितीने गठित मंडप तपासणी पथकास आपल्‍या कार्यक्षेत्रातील सर्व मंडप, पेंडॉल यांना सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभापुर्वी सात दिवस अगोदर नियमित भेट देण्‍यासंदर्भात आदेशित करावे. समितीने मंडप तपासणी पथकाकडून तपासणीबाबतचा वस्‍तुनिष्‍ठ अहवाल विहित कालमर्यादेत (सण, उत्‍सव, समारंभ सुरु होण्‍यापूर्वी तीन दिवस अगोदर) प्राप्‍त करुन घेऊन एकत्रितपणे माहिती प्रपत्र क्र. 2 मध्‍ये जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.  मंडप तपासणी पथकामार्फत सादर करण्‍यात आलेल्‍या अहवालावर सक्षम प्राधिका-याने केलेल्‍या कार्यवाहीचा त्रै-मासिक अहवाल विवरणपत्र क्र. 2 मध्‍ये शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास नियमितपणे सादर करण्‍याची जबाबदारी मंडप तपासणी समितीची राहिल.  ही कार्यवाही करताना मा. उच्‍च न्‍यायालयांचे निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍यात यावी व कुठल्‍याही परिस्थितीत मा. उच्‍च न्‍यायालयाचे आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमुद केले आहे.

000000
दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड दि. 23 :-  जिल्ह्यात सोमवार 26 जुन 2017 रोजी मुस्लीम बांधवाच्यावतीने (चंद्र दर्शनानुसार) रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोमवार 26 जुन रोजी जिल्ह्यातील दारु विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहे.
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी रमजान ईद 26 जुन रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल / बिआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्या अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

000000

वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...