Wednesday, November 9, 2016

नोटांच्या बदलाबाबत नागरिकांनी घाबरून
जाऊ नये , बँकांनी-यंत्रणांनी सेवा देण्यासाठी दक्ष रहावे
जिल्हाधिकारी काकाणी यांचे आवाहन , विविध यंत्रणांची बैठक
नांदेड , दि. 9 :- भारत सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केलेल्या आहेत. पण या नोटा अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी शुक्रवार 11 नोव्हेंबर 2016 च्या रात्री बारा वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानुसार त्या स्विकारण्यात याव्यात व बँकांद्वारे या नोटा विहीत पद्धतीने बदलून देण्याची आणि रक्कम काढण्याबाबतही निर्देशित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सामान्य नागरिकांची अडवणूक होऊ नये यासाठी या यंत्रणांनी काळजी घ्यावी. तर नागरिकांनीही घाबरून न जाता व कोणत्याही आमिष, अफवांना बळी न पडता व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या निर्देशानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध यंत्रणा, बँकांचे अधिकारी-प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. गुंटूरकर,  रेल्वे, राज्य परिवहन महामंडळ तसेच पेट्रोप पंप चालक संघटनेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 
बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी या सर्व यंत्रणांना नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्ष रहावे असे निर्देशित केले. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये. अनावश्यकरित्या बँकामध्ये व्यवहारांसाठी गर्दी करू नये. रुग्णालये, औषध दुकाने, पेट्रोल-डिझेल आणि गॅस पंप, घरगुती गॅस, सरकारी बस सेवा, रेल्वे तिकीट, विमान तिकीट अशा विहीत केलेल्या विविध ठिकाणी शुक्रवार 11 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा स्विकारण्यात येणार आहेत. त्याठिकाणी इंधन व औषध खरेदी करताना, पाचशे व हजाराच्या पटीत करणे सोईस्कर ठरेल. इंधन व औषधांसाठी समन्वयाने सुट्ट्यांपैश्यांच्या उपलब्धतेबाबत मार्ग काढण्यात यावा. शुक्रवार 11 नोव्हेंबर नंतर मात्र या जीवनावश्यक सेवांच्या ठिकाणीही जुन्या नोटांचा वापर करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले.
बैठकीत बँक तसेच उपस्थित विविध यंत्रणांना जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी येत्या दोन दिवसात काटेकोर काळजी घेण्यात यावी. पुरेसे कर्मचारी सेवा देतील व येणाऱ्या सामान्य नागरिकांचे पुर्ण समाधान होईल, अशी माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, अशाही सुचना करण्यात आल्या. जुन्या नोटा बँकांमधून बदलून देण्यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे.तसेच व्यवहारांचा लेखा-जोखा असेल, तर अशा जुन्या नोटांच्या स्वरुपातील रक्कमा पुढे 30 डिसेंबर 2016 पर्यंत संबंधितांना खात्यात जमा करता येणार आहेत.
बँकामधून टप्प्या-टप्प्याने ग्राहक, खातेदारांना एटीएम व थेट बँकेतून रक्कमा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठीही भारतीय रिझर्व बँकेने पद्धत विहीत करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या गरजेपुरत्या रक्कम उपलब्ध होणार आहेत. पण अनावश्यकरित्या बँकेतून रक्कमा काढून घेण्यासाठी गर्दी करू नये. बँकांनी याबाबत ग्राहकांना-खातेदारांना माहिती द्यावी. मागणीनुसार चलन पुरवठ्यासाठी वेळीच कार्यवाही करावी, वरीष्ठ बँकांकडे सतत-संपर्क ठेवावा, असेही निर्देशित केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनीही ‘जिल्ह्यातील नागरिकांनी येत्या दोन दिवसात बँकीग व्यवहाराबाबत दक्ष रहावे. कोणत्याही आमिषाला व अफवांना बळी न पडता व्यवहार करावेत. घाई-गर्दी न करता व्यवहार करावेत. यामुळे चलन पुरवठ्याची परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी मदत होईल. जनतेने बँक यंत्रणा, प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून काळा पैसा आणि चलन व्यवहारातील गैरप्रकार निपटून काढून, राष्ट्र उभारणीत हातभार लागेल,’ असेही आवाहन केले आहे.

00000

Tuesday, November 8, 2016

दहावीच्या मार्च 2017 परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर
नांदेड, दि. 8  :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या मार्च 2017 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत.
परीक्षेस नियमित प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पुर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावेत.
माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत नियमित शुल्कासह शुक्रवार 4 नोव्हेंबर ते सोमवार 21 नोव्हेंबर 2016  पर्यंत, शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची मुदत मंगळवार 22 ते सोमवार 28 नोव्हेंबर 2016 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची मुदत बुधवार 7 डिसेंबर 2016 आहे.  तर विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत मंगळवार 22 ते सोमवार 28 नोव्हेंबर 2016 पर्यंत, शाळांनी बँकेत चलन सादर करावयाची मुदत मंगळवार 29 नोव्हेंबर ते शनिवार 3 डिसेंबर 2016 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या तारीख बुधवार 7 डिसेंबर 2016 आहे.
मंगळवार 29 नोव्हेंबर ते बुधवार 7 डिसेंबर 2016 या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सलमध्ये मुद्रीत कराव्यात. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्याध्यापक यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.  ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी. प्रचलित शुल्क बॅक ऑफ इंडियात जमा करुन बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत, विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करण्यात याव्यात. अर्जामध्ये आधारकार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी एखादा विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल. आधार नोंदणी केली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून अर्ज भरले नाही असे होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

0000000

Monday, November 7, 2016

निवृत्तीवेतन, कुटुंबवेतनधारकांनी  हयात

  प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन

नांदेड , दि. 7 :- सन 2016 या वर्षाचे हयात प्रमाणपत्र कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन 1 ते 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीमधील हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी , असे आवाहन कोषागार अधिकारी एम. एस. गग्गड यांनी केले आहे.

00000

बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवारी

भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड , दि. 7 :-  जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-4 चे आयोजन करण्यात आले आहे. अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शुक्रवार  11 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास बिल्डींग श्रीनगर वर्कशॉप रोड नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
एसआयएस इं. लि. हैद्राबाद या कंपनीत सेक्युरिटी गार्डच्या पुरुषांसाठी 100 पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, कार्यक्षेत्र हैद्राबाद राहील. वेतन दरमहा 8 ते 12 हजार रुपये दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच ग्लोसरी सॉफ्ट टेक प्रा. लि. हैद्राबाद या कंपनीत महिला व पुरुषांसाठी सेल्समनच्या 100 पदासाठी  पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. कार्यक्षेत्र हैद्राबाद राहील. वेतन दरमहा 11 हजार व  भत्ते दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आवश्यक आहे.
ऑनलाईन सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन आयडी पासवर्ड टाकून लॉगइन व्हायचे. जॉब फेअरमध्ये जावून जॉब इन्व्हेन्टमधून जिल्हा निवडणे. नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-3 च्या उजव्या बाजूस ॲक्शनमध्ये जावून पार्टीसिपेशनला क्लिक करणे. टर्म अन्ड कंडीशनला आय ॲग्री करुन अप्लाय करणे. पुन्हा ॲक्शनवर येवून इंट्री पास काढून घेणे व हा इंट्री पास घेवूनच मेळाव्यात यावे लागेल. काही अडचण आल्यास दूरध्वनी क्र. 02462-251674 यावर संपर्क साधावा.
या मेळाव्यासाठी ऑनलाईन सहभाग, इच्छुकता दर्शविल्याशिवाय सहभागी होता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवाराची नोंद झाली नाही त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. इंट्री पास शिवाय मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. याबाबत होणारा प्रवास खर्च व इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

000000
विधान परिषद निवडणुकीसाठीच्या
मतदान केंद्राना आयोगाकडून मान्यता
नांदेड , दि. 7 :- महाराष्‍ट्र विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक- 2016 साठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानाकरीता जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली होती. या केंद्राना भार‍त निवडणूक आयोगाने मान्‍यता दिल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
मतदान केंद्रांची यादी मतदान केंद्राचे ठिकाण, केंद्र ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीचे नाव,  त्या मतदान केंद्रास जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव अशा क्रमाने पुढीलप्रमाणे.
नांदेड- तहसील कार्यालय नांदेड : जिल्‍हा परिषद नांदेड  (सर्व पं.स. सभापतीसह) नांदेड वाघाळा मनपा व नगर पंचायत अर्धापूर.
किनवट- तहसील कार्यालय किनवट :  नगर पंचायत माहूर व नगर परिषद किनवट.
हदगाव- तहसील कार्यालय हदगाव :  नगर पंचायत हिमायतनगर व नगर परिषद हदगाव.
भोकर- तहसील कार्यालय भोकर : नगर परिषद भोकर व नगर परिषद मुदखेड.
कंधार- तहसील कार्यालय कंधार :  नगर परिषद लोहा व नगर परिषद कंधार.
धर्माबाद- तहसील कार्यालय धर्माबाद : नगर परिषद उमरी व  नगर परिषद धर्माबाद.
बिलोली- तहसील कार्यालय बिलोली : नगर पंचायत नायगाव, नगर परिषद कुंडलवाडी व नगर परिषद बिलोली.
देगलूर- तहसील कार्यालय देगलूर : नगर परिषद देगलूर व नगर परिषद, मुखेड. याची संबंधित मतदार तसेच यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी
'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर
लघुपट सादर करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ
नांदेड , दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे  राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर ' महाराष्ट्र माझा शेतकरी राजा ' लघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली  आहे.या स्पर्धेसाठी लघुपट सादर करण्यास दि.30 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे.  जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.
परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळे, सहायक संचालक (माहिती) ८६०५३१२५५५ यांचेशी  संपर्क साधावा.
******


Saturday, November 5, 2016

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या
पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
नांदेड, दि. 5 :- संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी सीडीएसची परीक्षा 5 फेब्रुवारी 2017 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2016 अशी आहे. परीक्षेची जाहिरात 9 नोव्हेंबर 2016 रोजी रोजगार समाचारमध्ये आणि संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचे www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
सीडीएस परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 18 नोव्हेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 या कालवधीत सीडीएस कोर्स क्र. 53 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे मंगळवार 15 नोव्हेंबर 2016 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.com या संकेतस्थळावरील recruitment tab ला क्लीक करुन त्यामध्ये सीडीएस-53 कोर्ससाठी उपलब्ध महत्वाच्या तारखा व चेक लिस्ट सोबत असणारी सर्व परिशिष्टांचे अवलोकन करुन त्यांना डाऊनलोड करुन त्याची दोन प्रतीतमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी केले आहे.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...