Tuesday, May 19, 2026

वृत्त  

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी

द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी होणार मतमोजणी
मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र विधान परिषदेतील 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान 75 टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. हे निकष पूर्ण न झाल्यामुळे या मतदारसंघांतील निवडणुका यापूर्वी घेता आल्या नव्हत्या. मात्र, आता या सर्व 16 मतदारसंघांमध्ये आवश्यक निकष पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आयोगाला दिल्यानंतर आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार, 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, 1 जून 2026 असेल. मंगळवार, २ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून गुरवार, ४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
या निवडणुकांसाठी मतदान गुरूवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार, 22 जून रोजी करण्यात येईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरूवार, 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे त्यामध्ये प्रशांत परिचारक (सोलापूर), अरुणकाका जगताप (अहमदनगर), रवींद्र फाटक (ठाणे), चंदुभाई पटेल (जळगाव), मोहनराव कदम (सांगली-सातारा), अमरनाथ राजूरकर (नांदेड), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ), अनिल भोसले (पुणे), डॉ. परिणय फुके (भंडारा-गोंदिया), अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), नरेंद्र दराडे (नाशिक), रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली), प्रवीण पोटे (अमरावती), सुरेश धस (उस्मानाबाद-लातूर-बीड), विप्लव बाजोरिया (परभणी-हिंगोली) आणि अंबादास दानवे (औरंगाबाद-जालना) यांचा समावेश आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000

वृत्त क्रमांक 

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन

नांदेड, दि. 19 मे : ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट यांच्या वतीने 20 मे 2026 रोजी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी औषध व अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त (औषधे) अ.तु. राठोड (मो. 8369027068), अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शि.व. श्रीरामे (मो. 8080108818) तसेच लिपिक टंकलेखक श्रीमती अ.रा. पाटील (मो. 8446318983) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बंदच्या कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास अथवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असेही अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.
00000

Monday, May 18, 2026

वृत्त क्रमांक 

विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव 20 मेपर्यंत सादर करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 18 मे : फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा सवलत गुण वाढीचे प्रस्ताव ‘आपले सरकार’ पोर्टलवर तसेच संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते.

मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे तसेच त्रुटींअभावी हे प्रस्ताव विहित मुदतीत लातूर विभागीय मंडळाकडे प्राप्त झाले नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात आलेले नाहीत.

अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शिफारसीसह 20 मे 2026 पर्यंत लातूर विभागीय मंडळाकडे सादर करावेत, असे आवाहन विभागीय सचिव अनुपमा भंडारी यांनी केले आहे.

निर्धारित मुदतीनंतर कोणतेही प्रस्ताव स्वीकारले जाणार नसल्याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

नांदेड, दि. 18 मे : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 अंतर्गत पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील मौजे नांदुसा येथील श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाने एकत्र येत इर्जिक पद्धतीने 200 लिटर दशपर्णी अर्क तयार केला.

यासाठी लागणाऱ्या दहा प्रकारच्या वनस्पतींचा पाला गोळा करून त्याचे कुटण व प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक महिला सदस्यांनी प्रत्यक्ष सहभागातून केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर वसंत जारीकोटे यांनी दशपर्णी अर्क तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया उपस्थित महिलांना समजावून सांगितली.

पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विशाल इंगळे यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मृदा परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. खतांच्या मात्रा परीक्षण अहवालानुसार योग्य पद्धतीने देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर कैलास पेरके यांनी गटामार्फत पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच त्यासाठीच्या गुणांकन पद्धतीची माहिती दिली. उमेदचे मेंटॉर कंदुरके यांनी प्रास्ताविकातून BBF पेरणी व उताराला आडवी मशागत याबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमात गटातील सर्व महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. SOP पद्धतीचा अवलंब करून सहकार्याने गटशेती व स्मार्ट शेती करण्याचा निर्धार यावेळी सदस्यांनी व्यक्त केला. तसेच स्पर्धेसाठी पूर्ण तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी गटाच्या निमंत्रक श्रीमती माया जनकवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबाराव जनकवाडे, मन्मथ जनकवाडे, शिवदास जनकवाडे, दैवशाला डांगे यांच्यासह गटातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

0000





 वृत्त क्रमांक 

देगलूर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 18 मे :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील दिव्यांग, अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात विद्युत तारतंत्री, सर्व्हिसिंग ऑफ इलेक्ट्रीक डोमेस्टिक ऍप्लायसेंस, मोबाईल रिपेअरिंग ॲड सर्व्हिसिंग, फीटर, एलिमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरींग, कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस.ऑफीस, डेस्क टॉप पब्लिशिंग (DTP) कॉम्प्युटर अकाँटिंग व ऑफिस ऑटोमेशन व अगरबत्ती, खडु, धुप बनवणे इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. 

इच्छूक दिव्यांग, अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी 30 जून 2026 पर्यंत प्राचार्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, भायेगाव रोड, देगलूर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावा किंवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी मो. 9960900369, 9403207100, 7378641136 वर संपर्क साधावा, असे आवाहन कर्मशाळा अधिक्षक तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

20 मे च्या औषध विक्रेता बंद दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये; अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. 18 मे : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) देशभरात तसेच राज्यात बेकायदेशीररीत्या इंटरनेट फार्मसीद्वारे होणारी ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टल तसेच GSR 817(E) दि. 28 ऑगस्ट 2018 आणि कोविड संदर्भातील GSR 220(E) दि. 26 मार्च 2020 हे आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी 20 मे रोजी एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.

या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड शहरासह तालुका व ग्रामीण भागातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही रुग्णाला औषधांच्या उपलब्धतेबाबत अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय नांदेड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनालाही त्यांच्या औषध भांडारात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याबाबत कळविण्यात आले आहे.

बंदच्या कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास अथवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8369027068 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, जेणेकरून संभाव्य गैरसोय टाळता येईल, असेही अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अ.तु. राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीची सुवर्णसंधी

नांदेड, दि. 18 मे : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही महत्वाकांक्षी योजना जिल्हा उद्योग केंद्र व ग्रामोद्योग मंडळामार्फत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना उद्योग उभारणीसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने शहरी व ग्रामीण भागातील वाढती सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षात घेऊन स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. उत्पादन, सेवा व कृषीपूरक उद्योग व्यवसायांसाठी ही योजना लागू आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

* वय मर्यादा : किमान 18 वर्षे पूर्ण

* अर्जदार : स्थानिक रहिवासी व स्थायी उत्पन्न नसलेले युवक-युवती

प्रकल्प मर्यादा :

    * सेवा व कृषीपूरक उद्योग : कमाल 50 लाख रुपये

    * उत्पादन उद्योग : कमाल 1 कोटी रुपये

शैक्षणिक पात्रता :

    * 10 लाखांवरील उत्पादन प्रकल्पांसाठी

    * 5 लाखांवरील सेवा व कृषीपूरक प्रकल्पांसाठी

    * अर्जदार किमान 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक

* अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानाधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे

* पासपोर्ट साइज फोटो

* आधार कार्ड

* पॅन कार्ड

* शाळा सोडल्याचा दाखला

* जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

* ग्रामीण भागासाठी लोकसंख्येचा दाखला

* व्यवसायासंदर्भातील इतर आवश्यक कागदपत्रे

अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :

🔗 https://maha-cmegp.gov.in

योजनेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, पहिला मजला, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

महत्वाची सूचना

योजना राबविण्यासाठी कोणत्याही खाजगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मध्यस्थामार्फत अर्ज भरू नयेत. फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संपर्क : दूर- 02462-299088

ई-मेल didic.nanded@maharashtra.gov.in

00000000

दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.! खरीप हंगामातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,...