Thursday, December 26, 2024

दि. 24 डिसेंबर, 2024

 वृत्त क्र. 1228

वाहनासाठी रिफ्लेक्टर वापरा ;अपघात टाळा 

जिल्हाधिकाऱ्यांचा चालकांशी संवाद 

 प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह 

नांदेड दि. २४ : रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत आज नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील साखर कारखान्यातील वाहनचालकांसोबत रस्ता सुरक्षा संदर्भातील संवाद साधण्यात आला. स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाहन चालकांना भेटून त्यांना रस्ता सुरक्षा विषयक सूचना केल्या.    

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यामध्ये सध्या ऊसतोड व ऊस पोहचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे हजारो ट्रॅक्टर ट्रॉल्या गावागावातून प्रवास करतात.या ट्रॅक्टर ट्रॉल्यांना कोणताही अपघात होऊ नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्याकडून रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे व त्यांच्या अन्य सहकार्यांनी यासंदर्भात आज सर्व साखर कारखान्याच्या वाहन चालकांची वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूकदारांशी संपर्क साधला.

स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपप्रदेशक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांच्यासोबत लोहा येथील साखर कारखान्यामध्ये वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी ऊस वाहतूक करताना रिफ्लेक्टर कापड व रिप्लेक्टिव्ह रेडियम टेप ट्रॅक्टर वर लावण्यात यावा असे आवाहन केले. 

रात्रीच्या अंधारामध्ये अनेक वेळा ट्रॅक्टरचे इलेक्ट्रॉनिक रिफ्लेक्टर, लाईट काम करत नाहीत अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेप आणि रिफ्लेक्टर कापड याचा वापर करण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

तसेच जिल्हयातील उर्वरित 05 कारखान्यासाठी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगांव-येळेगांव ता.अर्धापूर, येथे सहायक मोटार वाहन निरिक्षक श्रीमती तेजस्विनी कलाले, एम.व्ही. के. अॅग्रो वाघलवाडा ता. उमरी सहायक मोटार वाहन निरिक्षक श्री. हेमंत साळुंके, श्री. सुभाष सागर, प्रा.लि. हडसणी ता. हदगांव श्री. पंकज कंतेवार, शिवाजी सर्व्हिस स्टेशन लि.बा-हाळी ता.मुखेड  सुनिल जारवाल, कुंटूरकर शुगर अॅन्ड अॅग्रो प्रा.लि. कुंटूर ता. नायगांव . संजय भोसले या कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येवून मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी . विनय अहिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्रादेशिक परिवहन, नांदेड . संदिप निमसे यांच्या उपस्थितीत वाहन चालकांना सुरक्षित वाहतुक होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येवून कारखान्याच्या ठिकाणी असलेल्या रिफलेक्टर टेप लावण्यात आलेले आहे.असून दिनांक 01 जानेवारी 2025 पासून परिवहन विभागामार्फत जिल्हयातील सर्व रस्त्यावर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून येणार असून त्यांनी नमूद केलेल्या बाबीचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्यांचेविरुध्द मोटार वाहन कायदयातील तरतूदीनुसार कारवाई होणार असल्याचे सांगितले

सायकली, दुचाकी बैलबंड्याना रिफ्लेक्टर लावा 

यासंदर्भात साखर कारखान्यातील वाहतूक व्यवस्थेची संपर्क साधला असला तरी अन्य छोटी वाहने सायकली बैल बंड्या व दुचाकी वाहने चालवताना रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेपचा अधिकाअधिक वापर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनयकुमार अहिरे यांनी केले आहे. अल्प किमतीच्या या रिफ्लेक्टर मुळे रात्रीच्या वेळी मोठी सुरक्षा प्रदान होते. तसेच नागरिकांनी रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या रिफ्लेक्टरची सुरक्षाही सामाजिक जाणीवेतून करावी, सुरक्षा आदेशाचे पालन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

श्री अहिरे यांनी भारतामध्ये होत असलेल्या अपघातांची संख्या बघता प्राथमिक सूचनांचे देखील पालन महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेप रिफ्लेक्टर कापड मोठ्या संख्येने वापरण्यात यावा असे, आवाहनही केले आहे.

00000










दि. 24 डिसेंबर, 2024

वृत्त क्र. 1227

२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता 

दि 24 डिसेंबर: कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात अली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

Monday, December 23, 2024

 वृत्त क्र. 1226

माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी

 २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक  

नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी उद्या नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण व लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे माळेगाव तीर्थक्षेत्राला २५ डिसेंबरला दुपारी 2 वा. आढावा बैठक घेणार आहेत. सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माळेगाव येथे बोलवण्यात आले आहे. 

दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव येथील यात्रेला 29 तारखेपासून सुरूवात होणार आहे. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत विविध आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या परंपरेनुसार व निर्धारीत हे कार्यक्रम होणार आहेत. तथापि या ठिकाणी येणाऱ्या लाखोच्या संख्येतील श्रद्धाळू भाविक व यात्रेकरूंचा ओघ बघता प्राथमिक सुविधा चौख असाव्यात यासाठी हे आयोजन असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी यासंदर्भात संबंधित सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

0000

 ​वृत्त क्र. 1225

अडचणीतील महिलांनी निवाऱ्यासाठी

महिला राज्यगृहाशी संपर्क साधावा  

नांदेड दि. 23 डिसेंबर :- निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा व पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेत आहे. अशा महिलांनी न बिचकता शासनाच्या सुविधांचा वापर करावा व निवाऱ्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्य गृह नांदेड येथील अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे.  

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रित व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. 18 ते 60 वर्षापर्यंतच्या निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिला यांना याठिकाणी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. संबंधित महिलांनी किंवा अशा पद्धतीच्या गरजू महिला लक्षात आलेल्या कोणत्याही नागरिकांनी यासाठी अशा महिलांना मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता आपल्या या हक्काच्या शासकीय निवाऱ्याची सोय स्वत:साठी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह हॉटेल भाईजी पॅलेजच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डानपूल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 02462-233044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे. 

0000

 ​वृत्त क्र. 1224

सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी 

जलसंधारणाच्या कामाचा आढावा 

 नांदेड दि. 23 डिसेंबर :-  19 ते 25 डिसेंबर सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सुशासन सप्ताहमध्ये दिर्घकालीन व शाश्वत विकासाच्या अनेक उपक्रमांना स्थानिक प्रशासनाने गती देण्याला प्राधान्य दिले आहे. आज या सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनामध्ये आज या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने यावेळी रोजगार हमी व जलसंधारणाच्या संदर्भातील आढावा घेतला. यात जलयुक्त शिवार, नरेगा, पांदण रस्ते, विहिर बांधकाम, गाळमुक्त तलाव, शेततळे, शोषखड्डे, घरकुल, चारा लागवड, बांबुलागवड तसेच जलसंधारणांतर्गत शेततळे, तुषारसिंचन, सुक्ष्मसिंचन, मृदजलसंधारण आदी संदर्भात आढावा घेण्यात आला. 

पावसाळा लागण्यापूर्वी यासंदर्भातील कामांचे नियोजन आवश्यक आहे. तसेच या आर्थीक वर्षातील पुढील तीन महिने बाकी असून यामध्ये खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण यंत्रणेने याबाबत काम करावे, असे आवाहनही करण्यात आले. बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललीतकुमार वऱ्हाडे यांच्या विभाग प्रमुख उपस्थित होते. 

0000








 ​वृत्त क्र. 1223

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी 

नांदेड दि. 23 डिसेंबर :- राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन राजस्थान राज्यात जयपूर येथे 7 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत केले आहे. या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी खुल्या गटाची राज्य निवड चाचणी घेतली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याचे प्रयोजन आहे. या निवड चाचणीसाठी क्रीडापटूंनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

इंडियन असोसिएशनद्वारा ऑलिम्पिक अॅडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅडहॉक समिती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. महिला व पुरुष गटासाठी पुणे येथील आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. चाचणी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी श्री कसगावडे मो.नं. 9422518422  यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड कार्यालयाने केले आहे.

0000

 दि. 22 डिसेंबर, 2024

                                                                                  वृत्त क्र. 304

राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

 

मुंबई, दि.22 : - राज्य  मंत्रिमंडळांचे खातेवाटप  21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे-

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क. 

 

मंत्री 

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल

श्री. राधाकृष्ण विखे - पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

श्री. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण 

श्री. चंद्रकांत(दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य 

श्री. गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.

श्री. गणेश नाईक : वने

श्री. गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता. 

श्री. दादाजी भुसे: शालेय शिक्षण.

श्री.  संजय राठोड : मृद व जलसंधारण.

श्री. धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण. 

श्री. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता. 

श्री. उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा 

श्री. जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार. 

श्रीमती पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन. 

श्री. अतुल सावे : इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा 

श्री.  अशोक उईके : आदिवासी विकास. 

श्री. शंभूराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.

अॅड.आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य. 

श्री. दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 

कु. आदिती तटकरे : महिला व बालविकास. 

श्री. शिवेंद्रसिंह  भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).

अॅड. माणिकराव कोकाटे : कृषी. 

श्री. जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायतराज. 

श्री. नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य. 

श्री. संजय सावकारे : वस्त्रोद्योग. 

श्री.  संजय शिरसाट : सामाजिक न्याय. 

श्री. प्रताप सरनाईक : परिवहन 

श्री. भरत गोगावले : रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास. 

श्री. मकरंद जाधव-(पाटील): मदत व पुनर्वसन.

श्री. नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे. 

श्री. आकाश फुंडकर : कामगार. 

श्री. बाबासाहेब पाटील : सहकार. 

श्री. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. 

 

राज्यमंत्री

अॅड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार, 

श्रीमती माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 

डॉ पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म. 

श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम). 

श्री. इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण. 

श्री. योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन. 

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...