Tuesday, December 17, 2019


 राष्ट्रीय पुरुष / थोर व्यक्तींची जयंती,
राष्ट्रीय दिन साजरा करण्याचे निर्देश
नांदेड, दि. 17 :- सन 2020 मध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक 12 डिसेंबर 2019 नुसार सर्व राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्यात यावेत. परिशिष्टात दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व रविवारी तसेच महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी येत असले तरी ते कार्यक्रम त्या-त्या दिवशी साजरे करण्यात यावेत. आपल्यास्तरावरुन सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील संबंधीत सर्व कार्यालयांना सदरचे कार्यक्रम घेण्याबाबत आवश्यक त्या सुचना देवून त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000



Monday, December 16, 2019


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव
31 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद कार्यालयामार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये 11 वी 12 मध्ये शिक्षण घेत असलेल्या पुढील वर्षामध्ये व्यावसायिक अभ्यास करण्याकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत मंगळवार 31 डिसेंबर 2019 पर्यंत या समिती कार्यालयास सादर करावे. 
विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालये यांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावे, विहित मुदतीनंतरचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन दिनकर पावरा सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी केले आहे.
00000



शबरीमाला उत्सवासाठी भाविकांनी
तांत्रिकदृष्ट्या योग्य वाहनातून प्रवास करावा
नांदेड दि. 16 :- जिल्हयातील शबरीमाला केरळ येथील उत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांनी तांत्रिकदृष्टया योग्य असलेल्या वाहनातून प्रवास करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
शबरीमाला केरळ येथे होणाऱ्या उत्सवात महाराष्ट्रातील निरनिराळया ठिकाणाहून भाविक जात असतात. या यात्रेस भाविक ज्या वाहनातून प्रवास करतात दरमहा ती वाहने तांत्रिकदृष्टया योग्य नसल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंव्हेबरच्या दुसऱ्या आठवडयापासून सुरु होऊन जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात शबरीमाला उत्सव साजरा केला जातो, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


दीनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन
नांदेड दि. 16 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड येथे शुक्रवार 20 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वा. पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
या मेळाव्यात धुत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद, फ्लेमिंगो फार्यासुटीकल्स लि. कृष्णूर, समस्ता मायर्क्रो फायनान्स लि. लालबाग बॅगलोर, न्युक्लीअर्स टेक्नोलॉजीस नांदेड या नामांकीत कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगारांची संधी मिळावी यारीता मुलाखती घेण्यात येणार आहेत.
ट्रेनी ऑप्रेटर, कस्टमर रिलेशनशिप ऑफीसर, डि.टी.पी. ट्रेनर (प्रशिक्षक), टॅली ट्रेनर (प्रशिक्षक), डेटा इन्ट्री ऑप्रेटर एकुण 246  या पदाकरीता किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी उर्त्तीण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास येतेवेळेस उमेदवारांनी सेवायोजन नाेंदणी कार्ड (असल्यास) शैक्षिणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत घेऊन यावे. असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र नांदेड यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
000000

Saturday, December 14, 2019


जिल्ह्यात लोकअदालतीत 4 हजार 197
प्रकरणात 14 कोटी रक्कमेची तडजोड  
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 4 हजार 197 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 14 कोटी 60 लाख 53 हजार 342 रुपये  (अक्षरी चौदा कोटी साठ लाख त्रेपन्न हजार तिनशे बेचाळीस रुपये मात्र) इतक्या रक्कमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली.
राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक  धोळकिया यांच्या  मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात दि. 14 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणांचा व विविध बॅंकांचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन यांचे दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ, समाजसेवक आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.
ही लोकअदालत यशस्वी व जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायाधीश दि. अ. धोळकिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री धोळकिया यांनी लोकअदालत यशस्वी झाल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. रोटे यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी व लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानुन यापुढेही अशाच सहकार्याची आपेक्ष व्यक्त केली.
00000


Friday, December 13, 2019


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 16 डिसेंबर 2019 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000


 शिधापत्रिकेसाठी सेतूमार्फत
संचिका सादर करावी - तहसिलदार अरुण जराड
नांदेड, दि. 13 :- शिधापत्रिका काढण्यासाठी सेतूमार्फत संचिका सादर करावी. बाहेरील व्यक्तीकडे शिधापत्रीका काढण्यासाठी देऊ नये. सेतूमार्फत दाखल केलेल्या अर्जांची चौकशी तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अथवा अधिकृत सेतू चालकांकडे करावी. इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू नये, असे आवाहन नांदेड तहसिलदार अरुण जराड यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपुर्ण योजनेंतर्गत नांदेड तहसिल कार्यालयात अती जूने प्रलंबीत असलेल्या संचिका निकाली काढून संबंधित लाभार्थ्यांच्या घरपोच पोस्टाने पत्र पाठवून दयावे अशा सुचना दिल्या. त्यानुसार शिधापत्रीका विभागातील अती जूने प्रलंबीत असलेल्या संचिका निकाली काढून 1 हजार 207 लाभार्थ्यांना घरपोच पोस्टाने पत्र पाठविण्यात आलीत. ज्या लाभार्थ्यांना पत्र मिळाले त्यांनी तहसिल कार्यालयातून शिधापत्रीका नेली. यावेळी शिधापत्रीकाधारकांना घरपोच पत्र दिल्याने लाभार्थ्यांना शिधापत्रीका मिळेल व फसवणूक होत नाही, असे मत शिधापत्रीकाधारकांनी व्यक्त केले. यासाठी नायब तहसिलदार (पुरवठा) सारंग चव्हाण, अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...