Tuesday, October 13, 2026

 वृत्त  

नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश 

मुंबई, दि. १३, नांदेड जिल्हा प्रशासनाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून संरक्षित करावे, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

संभाव्य पाणी टंचाईच्या पार्शवभूमीवर गठित जिल्हास्तरिय सनियंत्रण समितीची पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. 

यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील , महानगर पालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता इ. मा. चिश्ती , जिल्हा मृद व जल साधारण अधिकारी अनील कांबळे आदी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात सध्या सरासरी ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मंजूर पाणीसाठ्याव्यतिरिक्त प्रत्येक प्रमुख जलाशयाच्या उपलब्ध जिवंत पाणीसाठ्यापैकी किमान १० टक्के साठा अतिरिक्त बफर/ आपत्कालीन साठा म्हणून राखून ठेवण्यात यावा. सदर बफर साठा हा अनपेक्षित पर्जन्यमानातील घट, दीर्घ कोरडा कालावधी वाढणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी राखीव राहील,असे शासनाचे निर्देश आहेत, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, शहरातील उद्याने, स्टेडियम यांच्यासाठी पाण्याचा वापर टाळावा, औद्योगिक वसाहतींनी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्रवापर करावा, असे निर्देश श्री. सावे यांनी यावेळी दिले.

जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपसा आणि गैरवापर यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, महापालिका क्षेत्रात पाणी गळतीवर नियंत्रण आणावे, मार्च-एप्रिल महिन्यात ज्या ठिकाणी अधिक पाणी टंचाई निर्माण होईल, अशा गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगाऊ नियोजन करावे, आदी सूचना श्री. सावे यांनी दिल्या. 

 जिल्हा प्रशासनाने प्रत्येक महिन्याला टंचाईचा आढावा घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे यावेळी सांगण्यात आले. 

या बैठकीत जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील सद्यस्थितीतील उपलब्ध उपयुक्त जलसाठा व मृत साठ्याचा आणि त्यानुसार करावयाचे नियोजन याचा आढावा घेण्यात आला.

***


 वृत्त क्रमांक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

नांदेड जिल्ह्यातील ५१ हजार ७२५ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील आतापर्यंत १ लाख ९७ हजार ९१२ शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र

शेतकऱ्यांनी आपले सेवा केंद्रावर प्रमाणीकरण करावे

नांदेड (जिमाका), दि. १३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ५१ हजार ७२५ पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ९७ हजार ९१२ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्यावरील थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ८४७ कर्जखात्यांची माहिती अपलोड

या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील बँकांनी योजना पोर्टलवर एकूण २ लाख २४ हजार ८४७ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. या माहितीचे संगणकीय प्रक्रियेद्वारे संस्करण करून महाआयटीने यापूर्वी २४ जुलै आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

आधार प्रमाणीकरणानंतर कर्जमुक्तीची रक्कम जमा

पात्र शेतकऱ्यांनी पुढील बाबींची नोंद घ्यावी :

कर्जमुक्तीचा लाभ : यादीत समाविष्ट पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या तरतुदीनुसार कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

थकबाकीची खातरजमा : पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावरील थकबाकी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडून थकबाकीची खातरजमा करून घ्यावी.

दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी : राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही पात्र शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जथकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.

विशेष लाभार्थ्यांसाठी तरतूद : मृत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.

आधार प्रमाणीकरण आवश्यक : पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. त्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासून, कर्जखात्यावरील थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

 वृत्त क्रमांक

आपत्तीच्या काळात जीव वाचविण्यासाठी सीपीआरचे प्रशिक्षण महत्त्वाचे

जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जनजागृती

उष्णतेपासून बचावाचेही मार्गदर्शन

नांदेड(जिमाका), दि. १३ : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सज्जता, जनजागृती आणि योग्य वेळी केलेली कृती महत्त्वाची असते. हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन) तंत्राचा योग्य वापर करून एखाद्याचा जीव वाचविता येऊ शकतो. तसेच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. या उद्देशाने जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सीपीआर प्रशिक्षण व उष्णतेपासून बचावाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या सहकार्याने मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड होते. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सीपीआरचे प्रात्यक्षिक; उपस्थितांकडून सराव

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे महत्त्व आणि आपत्ती व्यवस्थापनातील नागरिकांच्या सहभागाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रणालीचे (डीडीएमएस) गौरव तिवारी यांनी मार्गदर्शन केले.

तज्ज्ञ फिजिशियन डॉ. चांदू पाटील यांनी हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत सीपीआरचे महत्त्व, त्याची योग्य पद्धत आणि उष्णतेपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी मॅनिकिनच्या साहाय्याने सीपीआरचे प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष सरावही करून घेण्यात आला.

श्री गुरु गोविंदसिंहजी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने डॉ. प्रणिता आडे आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे समन्वयक सचिन कोत्ताकोंडावार यांनीही मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सरावात सहभाग घेतला. या उपक्रमाला महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पाणी बचत आणि आपत्ती सज्जतेचे आवाहन

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड आणि प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीपीआरचे प्रशिक्षण प्रत्येकासाठी उपयुक्त असून, आपत्कालीन परिस्थितीत योग्य कृती करून दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने हे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

सद्यःस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढत्या उष्णतेचा विचार करता पाण्याचा काटकसरीने व आवश्यकतेनुसार वापर करावा. स्वतः पाणी बचतीची सवय अंगीकारून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कु-हे यांनी केले, तर सूत्रसंचालन बारकुजी मोरे यांनी केले. यावेळी तहसीलदार बिराजदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

 वृत्त क्रमांक

निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध करा

 


  • चारा साक्षरता अभियानांतर्गत किनवट येथील कृष्णप्रिय गोशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

  

नांदेड(जिमाका), दि. 13: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याचे पोषणमूल्य वाढवून त्याचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले. चारा साक्षरता अभियानांतर्गत किनवट येथील कृष्णप्रिय गोशाळेत आज वाळलेल्या सोयाबीन कुटारावर युरिया-मोलॅसिस प्रक्रिया करून निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक शेतकरी व पशुपालकांना दाखविण्यात आले.

या प्रात्यक्षिकादरम्यान हिरवा व वाळलेला चारा कडबाकुट्टी यंत्राद्वारे बारीक करून वापरणे, निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविणे, मुरघास निर्मिती, गाळपेरा नियोजन तसेच चाऱ्याची नासाडी टाळून उपलब्ध चाऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा व सकस चारा उपलब्ध राहावा, तसेच चारा टंचाईचा संभाव्य परिणाम कमी व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले (नांदेड), सहाय्यक आयुक्त डॉ. संजीव पाटील (किनवट), पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जोंधळे, डॉ. शितल वानखेडे, डॉ. योगेश पाटील, डॉ. सुनील जाधव, डॉ. लक्ष्मीकांत ढगारे व डॉ. गुरुराज मेनकुदळे यांच्यासह पशुधन पर्यवेक्षक सचिन पवळे, विनय कटके, ज्ञानेश्वर इंगळे, अशोक चव्हाण, नितीन भुरके व राजकुमार भुरके उपस्थित होते. परिसरातील शेतकरी व पशुपालकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन, शास्त्रीय प्रक्रिया आणि साठवणुकीच्या तंत्रांचा अवलंब केल्यास चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानांतर्गत दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन पशुधनाच्या पोषणासाठी उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.

****** 





 वृत्त क्रमांक

दुष्काळात पशुखाद्य नियोजनाला गती; चारा संवर्धनावर भर


 

  • जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत पीक अवशेषांच्या प्रभावी वापरावर चर्चा 

नांदेड (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करून संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यायी पशुखाद्य नियोजनावर भर दिला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. उपलब्ध पीक अवशेषांपासून पर्यायी पशुखाद्य निर्मिती, चारा संसाधनांचे संवर्धन आणि चारा व पीक अवशेषांच्या वाहतुकीवरील निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी, तसेच जैवइंधन कोळसा, इंधन ठोकळे आणि कणफलक निर्मिती उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी सोयाबीनच्या कुटारावर आणि उसाच्या चोथ्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्यांचा पर्यायी पशुखाद्य म्हणून वापर करण्याच्या शक्यतांवर यावेळी चर्चा करण्यात आली. उपलब्ध पीक अवशेषांचे संवर्धन करून त्यांचा पशुधनासाठी प्राधान्याने वापर करणे, तसेच चारा संसाधनांचा कार्यक्षम विनियोग करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

चारा आणि पीक अवशेषांच्या खरेदी-विक्री व वाहतुकीसंदर्भात निर्गमित शासन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी संबंधित शासकीय विभाग आणि उद्योग प्रतिनिधींमध्ये समन्वय राखून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

उपलब्ध चारा संसाधनांचा योग्य वापर, पर्यायी पशुखाद्य निर्मिती आणि चारा टंचाईवरील उपाययोजनांच्या माध्यमातून पशुधनाचे संगोपन सुलभ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

******

 वृत्त क्रमांक

सेवा संकल्प अभियानातून योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत

 

  • विविध प्रमाणपत्रांचे वितरण; 350 नागरिकांची आरोग्य तपासणी, आरोग्य व सौरऊर्जा योजनांबाबत मार्गदर्शन 

नांदेड (जिमाका), दि. 13 : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देणारे शिबिर येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून प्रमाणपत्रांचे वितरण, आरोग्य तपासणी आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरास तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत मस्के, बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) शिवगंगा पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, सुनील माचेवाड, संजय नागमवाड, पुरवठा निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध प्रमाणपत्रांचे वितरण

आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना 31 जातींची प्रमाणपत्रे, 280 रहिवासी प्रमाणपत्रे आणि 145 उत्पन्न प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ग्रामविकास विभागामार्फत 35 जन्मदाखले व 35 मृत्यूदाखले, महसूल विभागामार्फत 75 जिवंत सातबारा उतारे, तर पुरवठा विभागामार्फत 51 ऑनलाइन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. कृषी विभागाने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने 125 महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वितरण केले. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता ॲपविषयी मार्गदर्शन केले.

आरोग्य तपासणी आणि कल्याणकारी योजनांची दिली माहिती

जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत 350 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 225 आरोग्य कार्डांचे, तर 60 वर्षांवरील नागरिकांसाठी 35 वंदना कार्डांचे वितरण करण्यात आले. याशिवाय अनुलोम संस्थेमार्फत आभा कार्ड, महावितरण विभागामार्फत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या नोंदणी प्रमाणपत्रांबाबत माहिती देण्यात आली.

एकाच छताखाली विविध शासकीय सेवा

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रमाणपत्रांचे वितरण, आरोग्य तपासणी, योजनांची माहिती आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शन यांमुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभतेने मिळण्यास मदत झाली. विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

*******






 वृत्त क्रमांक

लिंगीत लोकसहभागातून वनराई बंधारा; महिला शक्तीचा पुढाकार


सेवा संकल्प अभियानांतर्गत तीन तास श्रमदान

पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नांदेड(जिमाका), दि. 13  : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि केंद्र शासनाच्या विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत सेवा संकल्प अभियानानिमित्त किनवट तालुक्यातील लिंगी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. महिला, पुरुष आणि युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुमारे तीन तास श्रमदान केले. ग्रामविकास आणि जलसंधारणाच्या कार्यात महिला शक्तीचा सक्रिय सहभाग या उपक्रमातून अधोरेखित झाला.

गावात सकाळी 9 वाजता श्रमदानाला सुरुवात झाली. ग्रामस्थांनी टोपल्यांच्या साहाय्याने माती वाहून बंधारा उभारणीचे काम पूर्ण केले. पंचायत समिती, किनवटच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनीही ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. लोकसहभागातून विकासकामे उभी करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यास मदत होते. परिणामी भूजल पातळी वाढण्यास आणि परिसरातील पाणी उपलब्धता सुधारण्यास हातभार लागतो. लिंगी परिसरात उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी सरपंच तथा प्रशासक केशव उदे, आकांक्षित तालुका कार्यक्रम समन्वयक पांडुरंग मामीडवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उकंडराव पवार, सुमेध थोरात, ग्रामपंचायत अधिकारी कोटरंगे, हृषीकेश राठोड, ग्राम रोजगार सहाय्यक रामेश्वर चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत लिंगी आणि पंचायत समिती, किनवट येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकसहभागातून विकास हाच अभियानाचा उद्देश

“शासन योजना देते; मात्र गावाचा विकास गावकरीच घडवतात, हे लिंगी गावाने दाखवून दिले आहे. लोकसहभागातून विकास हेच अभियानाचे उद्दिष्ट असून, लिंगी गावाने या उपक्रमातून आदर्श निर्माण केला आहे. या श्रमदानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी अभिनंदन केले.

****** 











 वृत्त क्रमांक

निराधार महिलेला पुन्हा मिळाला कुटुंबाचा आधार

 

  • डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या पाठपुराव्याला यश; महिलेची सुखरूप घरवापसी

नांदेड(जिमाका), दि. 13: घरापासून दूर भरकटलेल्या सुशिला सायबू मैलारे (वय 50 वर्षे) यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील समाजसेवा विभागाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा कुटुंबाचा आधार मिळाला. आठ ते दहा दिवसांच्या पाठपुराव्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात यश आले. आवश्यक वैद्यकीय उपचारांनंतर दि. 9 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांना नातेवाईकांसमवेत सुखरूप घरी पाठविण्यात आले.

सुशिला मैलारे यांना दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड रेल्वेस्थानकाच्या वाहनतळ परिसरातून 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषध वैद्यकशास्त्र विभागातील कक्ष क्रमांक 31 येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना समाजसेवा विभागाने त्यांचे समुपदेशन केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांनंतर त्यांनी स्वतःचे नाव, पत्ता आणि कुटुंबीयांविषयी माहिती दिली. त्यानुसार त्यांचे मूळ गाव डौर, ता. बिलोली, जि. नांदेड असल्याचे समोर आले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यांचे कुटुंब रोजगारासाठी निजामाबाद जिल्ह्यातील नंदीपेठ येथे स्थलांतरित झाल्याचे समजले. त्यानंतर समाजसेवा विभागाने त्यांच्या मुला-मुलींशी संपर्क साधून आई रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. गणेशोत्सवादरम्यान रोजगारासाठी हैदराबाद येथे गेले असताना आई घरातून बाहेर पडल्याचे त्यांच्या मुलीने सांगितले. अखेर कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सुशिला मैलारे यांना घरी पाठविण्यात आले.

या कार्यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे आणि औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. शीतल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) संतोष मुंगल यांनी कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी समन्वय साधत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महिलेला पुन्हा आपल्या कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळाली.

*****

 


 

वृत्त क्रमांक 

दुष्काळात चारा उपलब्धतेसाठी प्रशासनाची संयुक्त पाहणी

 

  • कृषी अवशेष व उसाच्या चोथ्याचा पशुखाद्य म्हणून वापर करण्यावर भर
  • शासन आदेशांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

नांदेड(जिमाका), दि. 13: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कृषी अवशेष व उसाच्या चोथ्यावर प्रक्रिया करून त्यांचा पशुखाद्य म्हणून प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील विविध ठिकाणी संयुक्त पाहणी केली. सोमवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या पाहणीदरम्यान संबंधित घटकांशी चर्चा करून चारा उपलब्धतेचे नियोजन आणि शासन आदेशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, उपलब्ध कृषी अवशेषांचा योग्य वापर करणे आणि पिकांचे अवशेष व उसाच्या चोथ्यावर प्रक्रिया करून त्यांचा चारा म्हणून वापर करण्याच्या शक्यता तपासणे, हा या पाहणीचा प्रमुख उद्देश होता. तसेच चारा व पशुखाद्याच्या वाहतुकीवरील निर्बंध आणि विक्रीसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानेही संबंधितांशी चर्चा करण्यात आली.

या संयुक्त पाहणी पथकामध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ.प्रविणकुमार घुले, नायगाव तालुका पशुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. गौतम खिल्लारे आणि कृष्णूर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी शिवप्रसाद तेनलवार यांचा समावेश होता.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध संसाधनांचा काटेकोरपणे उपयोग करणे, कृषी अवशेषांवर प्रक्रिया करून त्यांची पशुखाद्य म्हणून उपयुक्तता वाढविणे आणि संबंधित घटकांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे. या माध्यमातून चारा उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करून पशुधनाचे संगोपन सुलभ करण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर आहे.

******** 




  वृत्त   नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश  मुंबई, दि. १३, नांदेड जिल्हा प...