वृत्त क्रमांक
दुष्काळात पशुखाद्य नियोजनाला गती; चारा संवर्धनावर भर
- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत पीक अवशेषांच्या प्रभावी वापरावर चर्चा
नांदेड (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत
पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करून संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी
जिल्हा प्रशासनाने पर्यायी पशुखाद्य नियोजनावर भर दिला आहे. या अनुषंगाने
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12
ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. उपलब्ध पीक
अवशेषांपासून पर्यायी पशुखाद्य निर्मिती, चारा संसाधनांचे
संवर्धन आणि चारा व पीक अवशेषांच्या वाहतुकीवरील निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी
याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक
आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा उद्योग केंद्राचे
प्रतिनिधी, तसेच जैवइंधन कोळसा, इंधन
ठोकळे आणि कणफलक निर्मिती उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सोयाबीनच्या कुटारावर आणि उसाच्या
चोथ्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्यांचा पर्यायी पशुखाद्य म्हणून वापर
करण्याच्या शक्यतांवर यावेळी चर्चा करण्यात आली. उपलब्ध पीक अवशेषांचे संवर्धन
करून त्यांचा पशुधनासाठी प्राधान्याने वापर करणे, तसेच चारा
संसाधनांचा कार्यक्षम विनियोग करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
चारा आणि पीक अवशेषांच्या खरेदी-विक्री व
वाहतुकीसंदर्भात निर्गमित शासन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही आढावा
घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी संबंधित शासकीय विभाग आणि उद्योग प्रतिनिधींमध्ये समन्वय राखून
उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
उपलब्ध चारा संसाधनांचा योग्य वापर, पर्यायी पशुखाद्य निर्मिती आणि चारा टंचाईवरील उपाययोजनांच्या माध्यमातून
पशुधनाचे संगोपन सुलभ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
******
No comments:
Post a Comment