वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यास २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘येलो अलर्ट’
वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. २३ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. २३ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दि. २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी भूपृष्ठाजवळून अचानक ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी किंवा वेगवान वारे वाहण्याची तसेच हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे, जुनी व कमकुवत झाडे उन्मळून पडणे, कच्च्या घरांचे किंवा शेडचे पत्रे उडणे तसेच हलक्या वस्तू हवेत उडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विजांच्या कडकडाटावेळी घ्यावयाची खबरदारी
आकाशात विजा चमकत असल्यास नागरिकांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळ सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून सुरक्षित स्थितीत बसावे. घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये.
घरातील विद्युत उपकरणे बंद करून त्यांचा वीजपुरवठा शक्य असल्यास खंडित करावा. तारांचे कुंपण, विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात असल्यास तात्काळ पाण्याबाहेर यावे.
या गोष्टी टाळाव्यात
विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करणे, वॉशबेसिनचे नळ किंवा पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करणे तसेच विद्युत उपकरणांचा वापर करणे टाळावे.
वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू असताना लोखंडी धातूने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये. उंच झाडाखाली उभे राहू नये तसेच धातूच्या उंच मनोऱ्यांजवळ थांबू नये. घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडण्याचे दृश्य पाहण्यासाठी उभे राहू नये.
हवामान विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
***
No comments:
Post a Comment