वृत्त क्रमांक
7 एप्रिल रोजी जिल्ह्यात 'जागतिक आरोग्य दिन' होणार साजरा - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख
“एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!”
या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृतीवर भर
नांदेड दि. 6 एप्रिल:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ एप्रिल हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी जागतिक आरोग्य दिनासाठी "Together for health. Stand with science" आणि मराठीत "एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!" हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात "माझे गाव आरोग्य संपन्न गाव" या संकल्पनेवर आधारित विविध आरोग्य कार्यक्रम आणि शिक्षण उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
जिल्ह्यात राबविले जाणारे प्रमुख उपक्रम:
जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनामार्फत खालील उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आरोग्य प्रभात फेरी व आरोग्य दिंडी: गावागावातून आरोग्याचा संदेश देण्यासाठी प्रभात फेऱ्या काढण्यात येतील.
चर्चासत्रे व जनजागृती: आरोग्य विषयावर तज्ज्ञांची चर्चासत्रे आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातील.
आरोग्य शिबिरे: नागरिकांच्या तपासणीसाठी विविध ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.
ग्रामपातळीवर उपक्रम : ग्रामपंचायतींमध्ये 'आरोग्य सभा' घेऊन समुदाय आधारित गटचर्चा व समुपदेशनावर भर दिला जाईल.
प्रचार-प्रसिद्धी: सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे, वृत्तपत्र लेख आणि यशोगाथांच्या माध्यमातून आरोग्य योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल.
उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जिल्ह्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचे जिल्ह्यात प्रभावी नियोजन करण्यात येत आहॆ.. "माझे गाव आरोग्य संपन्न गाव" ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment