मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन..
Tuesday, November 17, 2026
वृत्त क्रमांक
इसापूर उजवा कालवा व सिंचन व्यवस्थेत अनधिकृत हस्तक्षेप केल्यास कठोर कारवाई!
• रब्बी हंगाम 2026-27 साठी कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू
• कालव्याचे दरवाजे उघडणे-बंद करणे, अनधिकृत पाणी उपसा व पाणीवाटपात अडथळा आणण्यास मनाई
नांदेड, दि. 18 : रब्बी व उन्हाळी हंगाम 2026-27 मध्ये उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालव्याच्या कालवा वितरण प्रणालीद्वारे होणाऱ्या सिंचन व बिगर सिंचन पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरळीत आणि नियंत्रित पद्धतीने व्हावे, तसेच उपलब्ध पाण्याचे न्याय्य पद्धतीने वितरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजव्या कालव्याचे रब्बी हंगाम 2026-27 मधील पहिले कालवा आवर्तन दि. 1 नोव्हेंबर 2026 पासून सुरू करण्यात आले आहे. या कालव्याद्वारे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, मुदखेड, उमरी, हदगाव व हिमायतनगर या तालुक्यांतील गावांना सिंचनाचा लाभ मिळतो. तसेच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यांनाही या कालव्याचा लाभ होतो. मात्र, सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढली असून, उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर कालव्यावरील काटनियामक (सी.आर.), एस्केप व इतर नियंत्रण संरचनांमध्ये अनधिकृत हस्तक्षेप करणे, कालव्याचे दरवाजे परस्पर उघडणे अथवा बंद करणे, कालव्यात अडथळे निर्माण करणे, अनधिकृत पाणी उपसा करणे, कालव्याचे नुकसान करणे तसेच पाणीवाटप करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि. 18 नोव्हेंबर 2026 रोजीपासून ते दि. 16 जानेवारी 2027 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक, नांदेड व संबंधित पोलीस विभागाने आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आदेशाची व्यापक प्रसिद्धी देण्याची जबाबदारी संबंधित विभागांना सोपविण्यात आली असून, सर्व संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
वृत्त
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा १९ नोव्हेंबरला
दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प या विषयावर परिसंवाद ;
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (विमाका) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि 'दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प' या विषयावरील परिसंवाद गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कॅम्ब्रिज चौक मैदान, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सादरीकरण, जलसंधारण, जलसुरक्षा व दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या यशोगाथा मांडण्यात येणार असून, सन २०२५-२६ मधील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना विभागस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
****
अमर क्रांतिकारकाला अभिवादन
भगवान बिरसा मुंडा हे केवळ स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक नव्हते, तर आदिवासी अस्मिता, स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार आणि कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत राहतील. #BirsaMunda #जनजातीयगौरवदिवसवृत्त क्रमांक
स्वाधार योजनेच्या अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ!
• अनुसूचित जातीच्या पात्र विद्यार्थ्यांनी नवीन, नूतनीकरणाचे अर्ज व प्रलंबित त्रुटींची पूर्तता करावी
नांदेड, दि. 17 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पात्र विद्यार्थ्यांना नवीन अर्ज, नूतनीकरणाचे अर्ज तसेच प्रलंबित अर्जांतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर नवीन अर्ज भरावेत. नूतनीकरणासाठी पूर्वीचा वापरकर्ता क्रमांक व परवलीचा शब्द वापरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण करावा. तसेच अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून त्रुटींची पूर्तता निर्धारित मुदतीत करावी. मुदतीनंतर नूतनीकरणाचे अर्ज भरता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी विलंब न करता अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी व संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती तपासावी.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जाची प्रत संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रात जमा करावी. योजनेसंदर्भातील अधिकृत माहिती व अडचणींचे निराकरण करण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाच्या samajkalyannanded या अधिकृत फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला अनुसरावे. तसेच कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिकृत व्हॉट्सॲप गटात सहभागी व्हावे. अनधिकृत व्यक्ती किंवा गटांकडून माहिती घेणे टाळावे. काही अडचणी असल्यास समाजकल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
***
वृत्त क्रमांक
दुष्काळात चारा लागवडीतून पशुधनाला आधार !
• रोहयोतून चारा पिकांसाठी आर्थिक मदत व रोजगार; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सीईओ महेश पाटील यांचे आवाहन
नांदेड, दि. 17 : दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात चारा पीक लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत चारा पिकांच्या लागवडीसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे पशुपालकांना चारा उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी चारा पीक लागवड करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या (रोहयो प्रभाग) 6 नोव्हेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध चारा पिकांच्या लागवडीसाठी रोपे, बियाणे, मजुरी व सामग्री यासाठी आर्थिक तरतूद निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मका लागवडीसाठी हेक्टरी 47 हजार 307 रुपये व 95 मनुष्यदिवस, ज्वारीसाठी 42 हजार 778 रुपये व 88 मनुष्यदिवस, तर बाजरीसाठी 35 हजार 505 रुपये व 74 मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध होणार आहे. नेपिअर गवत लागवडीसाठी 76 हजार 31 रुपये व 155 मनुष्यदिवस, मेथी घास (ल्युसर्न) लागवडीसाठी 1 लाख 13 हजार 290 रुपये व 270 मनुष्यदिवस, ज्वारी मल्टीकटसाठी 52 हजार 36 रुपये व 100 मनुष्यदिवस, तर बाजरी मल्टीकटसाठी 76 हजार 45 रुपये व 180 मनुष्यदिवस रोजगाराची तरतूद करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईमुळे पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा उपयोग करून चारा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यासोबतच पशुपालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी चारा पीक लागवडीसाठी संबंधित पंचायत समिती कार्यालय किंवा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून योजनेची माहिती घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
****
वृत्त क्रमांक बारावी व दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा महाराष्ट्र राज्य ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...


