Wednesday, November 25, 2026

 वृत्त क्रमांक 

जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटींची ऑनलाइन पूर्तता करा

• व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समितीचे आवाहन

नांदेड, दि. 25 : शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या; परंतु जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया अद्याप सुरू असलेल्या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटींची तातडीने ऑनलाइन पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांनी केले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय व आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अद्याप निर्णय प्रक्रियेत आहे. अशा पात्र विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत संबंधित समित्यांकडून एसएमएस, ई-मेल व पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, सूचना देऊनही अनेक विद्यार्थी व अर्जदारांनी अद्याप संबंधित समित्यांशी संपर्क साधलेला नाही.

जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जदार लॉगिनवरून तातडीने ऑनलाइन त्रुटी पूर्तता करावी. यासाठी www.cvc.barti.in या नवीन संकेतस्थळावर बार्टी हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अर्जदारांच्या शंका निरसन व मदतीसाठी दूरध्वनी : 020-26333339, व्हॉट्सअॅप : 9404999452 (फक्त संदेशासाठी),  ई-मेल : helpdesk@barti.in वर संपर्क सुविधा उपलब्ध आहेत.

अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित अर्जदारांची राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी व पालकांनी नवीन संकेतस्थळ आणि सुधारित नागरिक-केंद्रित सेवांचा लाभ घेऊन अर्जातील त्रुटींची वेळेत पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेडचे अध्यक्ष डॉ. किरण महाजन, उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांनी केले आहे.

**

 संविधान दिन – विशेष लेख

२६ नोव्हेंबर : भारतीय संविधानाचा गौरवशाली ऐतिहासिक दिवस !

संविधान दिन म्हणजे काय? २६ नोव्हेंबरलाच हा दिवस का साजरा केला जातो? यापूर्वी हा दिवस साजरा केला जात नव्हता का? भारतीय संविधानाची प्रास्ताविका म्हणजे काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार का म्हटले जाते? संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी भारतीय संविधानाचा इतिहास, त्याची निर्मिती आणि त्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळे लोकशाही शासनव्यवस्थेचा भक्कम पाया घातला गेला. ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवटीत भारतातील मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. या राजवटीविरुद्ध भारतीयांनी दीर्घकाळ स्वातंत्र्यलढा दिला. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक महापुरुषांनी आंदोलने, उपोषणे, सत्याग्रह आणि सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार लोकशाही तत्त्वांवर चालविण्यासाठी स्वतःची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी भारतीयांवर आली. त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली.

संविधान सभेची स्थापना आणि कार्य

भारताच्या स्वातंत्र्याचा आणि घटनात्मक भवितव्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ब्रिटिश सरकारने मार्च १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन भारतात पाठविले. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्या सरकारने पाठविलेल्या या मिशनमध्ये लॉर्ड पेथिक-लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मिशनलाच 'त्रिमंत्री योजना' असेही म्हटले जाते.

कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेच्या स्थापनेची प्रक्रिया निश्चित करण्यात आली. त्यानुसार जुलै १९४६ मध्ये संविधान सभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेची मूळ सदस्यसंख्या ३८९ निश्चित करण्यात आली होती. यामध्ये ब्रिटिश भारतातील प्रांतांचे प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्यसंख्या २९९ झाली.

९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथील सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेचे पहिले अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

स्वतंत्र भारतासाठी राज्यघटनेची निर्मिती करणे आणि देशाच्या घटनात्मक शासनव्यवस्थेचा पाया घालणे हे संविधान सभेचे प्रमुख उद्दिष्ट होते. या कार्यासाठी संविधान सभेने विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या. त्यामध्ये मसुदा समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती होती. संविधानाचा मसुदा तयार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीकडे सोपविण्यात आली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीय संविधानाचे शिल्पकार

२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. मसुदा समितीच्या मूळ सात सदस्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी. एल. मित्तर आणि डी. पी. खेतान यांचा समावेश होता.

पुढे बी. एल. मित्तर यांच्या जागी एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच डी. पी. खेतान यांच्या निधनानंतर टी. टी. कृष्णमाचारी यांची समितीवर नियुक्ती झाली.

संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार बी. एन. राव यांनी संविधानाच्या प्रारूप निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. विविध समित्यांचे अहवाल, घटनात्मक सल्लागारांचे प्रारूप आणि संविधान सभेतील चर्चा व निर्णय यांच्या आधारे मसुदा समितीने संविधानाचा मसुदा तयार केला.

मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले. संविधानातील विविध तरतुदींचा सखोल अभ्यास करून त्यांची मांडणी करणे, विविध समित्यांच्या शिफारशींचा समन्वय साधणे आणि संविधान सभेतील चर्चांना घटनात्मक स्वरूप देणे यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत मोलाची होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य विद्वत्तेमुळे, कायदेविषयक ज्ञानामुळे आणि संविधान निर्मितीतील महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' म्हणून गौरविण्यात येते.

संविधान निर्मितीचे हे ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी संविधान सभेने २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस अथक परिश्रम घेतले. या काळात संविधान सभेची ११ अधिवेशने झाली. सखोल चर्चा, विचारविनिमय आणि विविध विषयांवरील मंथनातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली.

२६ नोव्हेंबरलाच संविधान दिन का साजरा केला जातो?

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधानाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरला.

संविधानातील काही तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच लागू झाल्या. मात्र, संविधानातील बहुतांश तरतुदी २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आल्या. या दिवसापासून भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनला. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.

२६ जानेवारी या तारखेला आणखी एक ऐतिहासिक महत्त्व आहे. १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याच दिवशी पूर्ण स्वराज्याचा संकल्प साजरा केला होता. त्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून संविधान लागू करण्यासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यात आली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही. पी. मेनन यांच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांतून देशातील ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळे देशात एकात्मिक घटनात्मक शासनव्यवस्था प्रस्थापित झाली.

भारतीय संविधान : लोकशाही शासनव्यवस्थेचा पाया

भारतीय राज्यघटनेच्या आधारावर देशातील संसदीय लोकशाही शासनव्यवस्थेची उभारणी झाली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, लोकसभा, राज्यसभा, राज्य विधिमंडळे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये, निवडणूक आयोग आणि इतर घटनात्मक संस्थांची रचना, अधिकार व कार्यमर्यादा संविधानाने निश्चित केल्या आहेत.

भारतीय संविधान हे देशाचे सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज आहे. देशाचा कारभार कोणत्या पद्धतीने चालविला जावा, शासनाच्या विविध अंगांमध्ये अधिकारांचे विभाजन कसे असावे, नागरिकांचे अधिकार कोणते असावेत आणि शासनसंस्थांच्या कार्यावर कोणत्या घटनात्मक मर्यादा असाव्यात, याची स्पष्ट मांडणी संविधानात करण्यात आली आहे.

भारतीय संविधानाच्या मूळ स्वरूपात ३९५ अनुच्छेद, २२ भाग आणि ८ अनुसूच्या होत्या. कालांतराने विविध घटनादुरुस्त्यांद्वारे संविधानात बदल करण्यात आले. सध्या संविधानात १२ अनुसूच्या आहेत. भारतीय संविधान हे जगातील सर्वांत विस्तृत लिखित संविधानांपैकी एक आहे.

संविधानाची प्रास्ताविका म्हणजे संविधानाचा आत्मा

भारतीय संविधानाची उद्देशिका अर्थात प्रास्ताविका (Preamble) ही संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत मूल्ये स्पष्ट करणारा महत्त्वाचा भाग आहे. प्रास्ताविकेला संविधानाचा आत्मा असेही संबोधले जाते.

प्रास्ताविकेत भारताचे स्वरूप, नागरिकांना मिळणारी मूल्ये आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली मूलभूत तत्त्वे यांचा समावेश आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय संविधानाची प्रमुख मूल्ये आहेत.

भारतीय संविधानाच्या मूळ प्रास्ताविकेत 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द नव्हते. १९७६ मध्ये झालेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीने हे शब्द तसेच 'राष्ट्राची एकता आणि एकात्मता' यांचा समावेश प्रास्ताविकेत करण्यात आला.

भारतीय संविधानाची प्रास्ताविका पुढीलप्रमाणे आहे.

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;

दर्जाची व संधीची समानता ;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;

आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश

संविधान दिनानिमित्त देशभरात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाते. या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संविधानाची ओळख करून देणे, त्यातील मूलभूत मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि लोकशाहीप्रती बांधिलकी दृढ करणे हा आहे.

संविधानामुळे नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार मिळाले आहेत, त्यांची कर्तव्ये कोणती आहेत आणि देशाचा कारभार कोणत्या घटनात्मक चौकटीत चालतो, याची माहिती मिळते. कार्यपालिका, विधिमंडळ, न्यायपालिका, निवडणूक आयोग यांसारख्या घटनात्मक संस्थांची रचना आणि कार्यपद्धती समजून घेण्यास मदत होते.

संविधान हे केवळ शासनव्यवस्थेचे मार्गदर्शक दस्तऐवज नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी संबंधित असलेली मूल्यव्यवस्था आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार केल्यास जबाबदार नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ होते.

संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये देशाच्या व राज्याच्या गरजांनुसार विविध कायदे केले जातात. हे कायदे संविधानाच्या चौकटीत असणे आवश्यक आहे. कायदे करताना त्यांची घटनात्मक वैधता आणि जनहिताच्या दृष्टीने उपयुक्तता विचारात घेतली जाते. संविधानाच्या तरतुदींचे पालन करणे ही शासनसंस्थांसह प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाची किमान प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. संविधानाचे वाचन, त्यातील मूल्यांचे आकलन आणि दैनंदिन जीवनात त्या मूल्यांचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. यासाठीच संविधान दिन साजरा करणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात २००८ पासून संविधान दिन साजरा

भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार २६ नोव्हेंबर २०१५ पासून देशभरात अधिकृतपणे संविधान दिन साजरा करण्यात येऊ लागला.

मात्र, महाराष्ट्रात यापूर्वीच संविधान दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली होती. सन २००५ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी शाळांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला.

त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'संविधान फाऊंडेशन' या संस्थेने संविधान जागृतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांना प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबर २००८ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंतच्या शासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्याची ही महत्त्वपूर्ण व्यवस्था होती.

त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने ४ फेब्रुवारी २०१३ रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील सर्व प्रकारच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे दररोज सामूहिक वाचन करण्याचे निर्देश दिले. तसेच संविधान जागृतीसाठी प्रश्नमंजुषा, निबंध, चित्रकला, घोषवाक्य, पोस्टर स्पर्धा, व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमांमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ओळख निर्माण होण्यास आणि समाजात लोकशाही मूल्यांची जाणीव रुजण्यास मदत होत आहे.

संविधानिक मूल्यांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील आपल्या ऐतिहासिक भाषणात राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित केले होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे केवळ राजकीय जीवनापुरती मर्यादित न राहता सामाजिक जीवनातही रुजली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता.

राजकीय लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे, हा त्यांचा मूलभूत विचार होता. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना कर्तव्यांची जाणीव ठेवणे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम साजरा करण्याचा दिवस नसून भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचे स्मरण करण्याचा, संविधान निर्मात्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि घटनात्मक कर्तव्यांची जाणीव दृढ करण्याचा दिवस आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, न्यायाची हमी आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला आहे. त्यामुळे संविधानाचे महत्त्व समजून घेणे, त्यातील मूल्यांचा अंगीकार करणे आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे.

संविधानाचे वाचन करूया, संविधानातील मूल्ये जपूया आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध होऊया!

– सुरेश पाटील

सहायक संचालक,

विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.






Tuesday, November 24, 2026

स्वकर्तृत्व, स्वावलंबन आणि समाजसेवेचा आदर्श म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले!

महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजकार्याची वाट निवडताना स्वावलंबनाला विशेष महत्त्व दिले. स्वतःच्या कर्तृत्वातून संपत्ती उभी करून त्यांनी ती समाजाच्या कल्याणासाठी खर्च केली.
पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. बांधकाम व अन्य व्यापारी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या कंपनीला पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याचा (बंडगार्डन) पूल बांधण्याच्या कामाचे उपकंत्राट मिळाले होते.
या कामासाठी खडी, चुना आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका त्यांच्याकडे होता. सुमारे १४५ वर्षांनंतरही हा पूल मजबुतीने उभा आहे.
स्वावलंबनातून समाजसेवेचा वसा जपणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्यातून आजही प्रेरणा मिळते.
💐
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी कार्याला विनम्र अभिवादन!

 #दुष्काळ














भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस

• संघटित परीक्षा गैरप्रकारांत सहभागी व्यक्ती व संस्थांना ७ ते १० वर्षे कारावास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड प्रस्तावित

• विशेष कृती दल, जलदगती न्यायालये आणि परीक्षा शुल्क परताव्याचीही शिफारस

मुंबई, दि. २४ : राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यासह परीक्षा संचालन, प्रशासकीय यंत्रणा, तंत्रज्ञानाचा वापर, सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. अपर मुख्य सचिव व्ही. राधा समितीचा हा दुसरा अहवाल असून एकूण चार टप्प्यात अहवाल सादर होणार आहे.

संघटित परीक्षा गैरप्रकारांत सहभागी व्यक्ती व संस्थांना ७ ते १० वर्षे कारावास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड, गैरप्रकारांमधून झालेल्या नुकसानीची वसुली तसेच संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस समितीने केली आहे. याशिवाय गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष कृती दल (Special Task Force), खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करणे आणि तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत विचार करण्याची तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवारांची हरकत मान्य झाल्यास हरकत नोंदविण्यासाठी भरलेले शुल्क परत करण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.

राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय ४ सप्टेंबर २०२६ अन्वये उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसंदर्भातील पहिला अहवाल ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सादर केला होता. त्यानंतर समितीने आपला दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनास सादर केला आहे. या अहवालात कायदेशीर तरतुदी, परीक्षा संचालन व्यवस्था, प्रशासकीय समन्वय, उमेदवारांच्या सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षा याबाबत व्यापक सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत.

पेपरफुटीविरोधी कायद्यात कठोर सुधारणांची शिफारस

परीक्षांमधील पेपरफुटी, संघटित गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर यांना प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची शिफारस समितीने केली आहे.

गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना कठोर शिक्षा होऊन अशा गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा, या उद्देशाने कारावासाची शिक्षा, दंडाची रक्कम आणि काळ्या यादीत टाकण्याचा कालावधी वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती व संस्था : सध्याच्या कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये ५ ते १० वर्षे कारावास, किमान १ कोटी रुपये दंड आणि परीक्षा खर्चाची वसुली अशी तरतूद आहे. समितीने ही शिक्षा वाढवून ७ ते १० वर्षे कारावास, किमान १० कोटी रुपये दंड, व्यापक नुकसानभरपाईची वसुली आणि मालमत्ता जप्तीची शिफारस केली आहे.

अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्ती : सध्या ३ ते ५ वर्षे कारावास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. समितीने त्यात वाढ करून ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित केला आहे.

गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्था : सध्याच्या कायद्यानुसार १ कोटी रुपयांपर्यंत दंड, परीक्षेच्या प्रमाणशीर खर्चाची वसुली आणि चार वर्षांसाठी बंदी अशी तरतूद आहे. समितीने दंडाची मर्यादा ५ कोटी रुपयांपर्यंत वाढविणे, परीक्षा खर्चाची वसुली करणे आणि संबंधित संस्थेला आठ वर्षांसाठी बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

सेवा पुरवठादार संस्थांचे संचालक व व्यवस्थापन : सेवा पुरवठादार संस्थेचे संचालक, व्यवस्थापनातील व्यक्ती किंवा संस्थेचा प्रभारी अधिकारी गैरप्रकारात सहभागी असल्यास त्यांच्यासाठी ५ ते १० वर्षे कारावास आणि ५ कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली आहे. सध्या या गुन्ह्यासाठी ३ ते १० वर्षे कारावास आणि १ कोटी रुपये दंडाची तरतूद आहे.

परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे

परीक्षा गैरप्रकारांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि बहुस्तरीय असल्याने अशा गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस समितीने केली आहे.

सध्या पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जातो. त्याऐवजी जिल्ह्यांमध्ये किमान अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात किमान पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास सोपविण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यामुळे परीक्षा गैरप्रकारांमागील संघटित यंत्रणा, संबंधित व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध अधिक प्रभावी तपास करणे शक्य होणार आहे.

गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष कृती दलाची स्थापना

परीक्षा गैरप्रकारांमधील गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष कृती दल स्थापन करण्याची शिफारस समितीने केली आहे.

अशा प्रकरणांचा तपास विशेष कृती दलाकडे सोपविण्याचे अधिकार देण्याबरोबरच संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी या दलाला विशेष अधिकारक्षेत्र देण्याची तरतूद करण्याचेही सुचविण्यात आले आहे.

खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी विशेष जलदगती न्यायालये

परीक्षा गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांचे खटले दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत आणि दोषींवर वेळेत कारवाई व्हावी, यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या कायद्यांतर्गत सध्या प्रलंबित असलेले सर्व जुने खटलेही या विशेष न्यायालयांकडे वर्ग करून तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्याची शिफारस समितीने केली आहे.

मालमत्तेच्या व्याख्येत डिजिटल व आभासी मालमत्तांचाही समावेश

संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या संस्था किंवा सेवा पुरवठादारांची मालमत्ता जप्त करताना कायदेशीर संदिग्धता राहू नये, यासाठी अधिनियमात 'मालमत्ता' या संज्ञेची व्यापक व स्पष्ट व्याख्या समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यामध्ये जमीन, इमारती, जंगम मालमत्ता, बौद्धिक संपदा, अमूर्त हक्क तसेच डिजिटल आणि आभासी मालमत्तांचाही समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे गैरप्रकारांतून मिळविलेली मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस

उमेदवारांकडून परीक्षा शुल्कासंदर्भात सातत्याने करण्यात येणाऱ्या मागण्यांची दखल घेत समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्याने भरलेले संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत आयोगाने विचार करावा, असे समितीने सुचविले आहे.

यासाठी इतर राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उत्तम पद्धतींचाही अभ्यास करण्यात आला आहे.

तसेच, उत्तरतालिकेवर उमेदवाराने घेतलेली हरकत आयोगाने मान्य केल्यास संबंधित उमेदवाराने हरकतीसाठी भरलेले शुल्क त्याला परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे परीक्षेची तयारी गांभीर्याने करणाऱ्या उमेदवारांवरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी एकात्मिक मागणीपत्र प्रणाली विकसित करण्याची शिफारस

विविध शासकीय विभागांकडून रिक्त पदांची मागणी प्राप्त होण्यापासून ते उमेदवारांच्या शिफारशीपर्यंतच्या संपूर्ण भरती प्रक्रियेचा समितीने सखोल अभ्यास केला आहे.

विभागांकडून रिक्त पदांची अनियमित माहिती मिळणे आणि परीक्षांचे वेळापत्रक निश्चित नसणे, या समस्या उमेदवारांनी समितीसमोर मांडल्या होत्या. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकात्मिक मागणीपत्र प्रणाली विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या २ डिसेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत रिक्त पदांची मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविणे आवश्यक आहे. या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची शिफारस समितीने केली आहे.

तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, असेही अहवालात सुचविण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांना परीक्षांचे नियोजन आणि तयारी आगाऊ करता येणार आहे.

महाआयडी किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी सुविधा

उमेदवारांना विविध परीक्षांसाठी अर्ज करताना वारंवार प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अपलोड करावी लागू नयेत, यासाठी महाआयडी (MahaID) किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी (One-Time Registration) सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या सुविधेमुळे उमेदवारांची कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची आवश्यकता कमी होईल. तसेच, परीक्षा दिलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात परत करणेही सुलभ होणार आहे.

परीक्षांच्या देखरेखीसाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर

परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय 'एक्झाम कमांड अँड कंट्रोल सेंटर' (Exam Command and Control Centre) स्थापन करण्याची शिफारस समितीने केली आहे.

या व्यवस्थेत तीन स्तरांवर नियंत्रण केंद्रे कार्यरत राहतील.

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयात केंद्रीय नियंत्रण केंद्र.

२. जिल्हास्तरावर स्वतंत्र नियंत्रण केंद्र.

३. प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी नियंत्रण केंद्र.

या त्रिस्तरीय व्यवस्थेमुळे परीक्षा प्रक्रियेचे प्रभावी निरीक्षण, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि गैरप्रकार आढळल्यास तातडीने हस्तक्षेप करणे शक्य होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कायमस्वरूपी परीक्षा शाखा

जिल्हास्तरावर परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत कायमस्वरूपी परीक्षा शाखा स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. या शाखेमार्फत जिल्ह्यातील परीक्षा आयोजनासंदर्भातील विविध जबाबदाऱ्यांचे प्रभावी नियोजन आणि नियंत्रण करता येणार आहे.

याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या समितीमध्ये पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त यांच्यासह शिक्षण, परिवहन, कोषागार आणि अन्य महत्त्वाच्या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

या समितीमुळे विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय वाढून परीक्षा आयोजन अधिक सुलभ आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक

राज्यातील विविध भरती व स्पर्धा परीक्षांसाठी पुरेशा आणि आवश्यक पायाभूत सुविधांनी युक्त परीक्षा केंद्रांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र बँक (Venue Bank) तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या बँकेमध्ये परीक्षा केंद्र म्हणून वापरता येऊ शकणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींची अद्ययावत माहिती नोंदविण्यात येईल.

प्रत्येक केंद्राची आसनक्षमता, दिव्यांग व अन्य उमेदवारांसाठीची सुगम्यता आणि उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती या बँकेत समाविष्ट केली जाईल.

परीक्षा केंद्रांची नियमित तपासणी करण्यात येईल. तसेच, जिल्हाधिकारी आपल्या नियंत्रणाखालील अधिकाऱ्यांमार्फत केंद्रांना नियमित भेटी देऊन तेथील माहिती अद्ययावत असल्याची खात्री करतील.

यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निश्चित केलेल्या दरांनुसार शाळा व महाविद्यालयांच्या इमारती परीक्षा आयोजनासाठी ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची शिफारसही समितीने केली आहे.

प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा आराखडा

परीक्षांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर होणाऱ्या भरती परीक्षांसाठी स्वतंत्र सुरक्षा योजना आणि सविस्तर मार्गदर्शक सूचना तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान प्रतिबंधित तांत्रिक उपकरणांचा वापर रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा तपासणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कार्यपद्धती निश्चित करावी, असे समितीने सुचविले आहे.

या मार्गदर्शक सूचना अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्या मार्गदर्शनाखाली महा-सायबर यांचा सल्ला घेऊन तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षा प्रणालींची सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या माहितीचे संरक्षण

परीक्षा प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने परीक्षा प्रणालींची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर समितीने विशेष भर दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महा-सायबर आणि अन्य विशेष संस्थांच्या सल्ल्याने स्वतंत्र तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षांमधील गैरप्रकारांसाठी वापरली जाणारी सूक्ष्म संवाद उपकरणे, परिधान करता येणारे कॅमेरे (Wearable Cameras) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (Artificial Intelligence) आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना विकसित करण्याची जबाबदारी या कक्षाकडे असावी, असे सुचविण्यात आले आहे.

याशिवाय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी नियुक्त करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

आयोगामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रणालीसाठी तसेच आयोगाच्या वतीने बाह्य संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रणालींसाठी एकात्मिक माहिती सुरक्षा धोरण जारी करण्याचीही शिफारस समितीने केली आहे.

यामुळे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल प्रणालींची सुरक्षितता वाढण्याबरोबरच उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख भरती व्यवस्थेकडे महत्त्वपूर्ण पाऊल

उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालामध्ये राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतील विविध त्रुटी दूर करण्यासाठी सर्वंकष सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई, सक्षम तपास यंत्रणा, जलद न्यायनिवाडा, परीक्षा केंद्रांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, जिल्हास्तरीय प्रशासकीय उत्तरदायित्व, तंत्रज्ञानाधारित देखरेख आणि सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर उमेदवारांवरील आर्थिक भार कमी करणे, भरती प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करणे आणि विविध शासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातील समन्वय वाढविणे यावरही समितीने भर दिला आहे.

या शिफारशींच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता अधिक दृढ करणे, प्रामाणिक व पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि राज्यात पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह भरती परीक्षा व्यवस्था निर्माण करणे हा उद्देश आहे.

समितीने या सर्व शिफारशी राज्य शासनाच्या विचारार्थ सादर केल्या आहेत.

0000

 शासकीय कार्यालयांतील व्हॉट्सॲप वेबच्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा

• गोपनीय शासकीय माहितीच्या देवाणघेवाणीसाठी व्हॉट्सॲप वेबचा वापर टाळा

• अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका

• अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 24 : शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर सायबर गुन्हेगारांनी अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश वाचणे, वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होते. अशा प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगद्वारे माहिती मिळविणे तसेच अन्य सायबर गुन्हे घडविण्याचा धोका आहे.

गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीसाठी व्हॉट्सॲप वेब टाळा

शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबद्वारे करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेबचे लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळावे.

संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्याचे निर्देश

व्हॉट्सॲप खात्यावरून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात अन्य संशयास्पद हालचाली आढळणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक खबरदारी घ्यावी. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर तसेच अविश्वसनीय स्रोतांमधून प्राप्त झालेल्या फाइल्स उघडू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.

शासकीय माहितीची गोपनीयता, कार्यालयीन पत्रव्यवहाराची सुरक्षितता आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि डिजिटल संवाद साधताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

00000000

Monday, November 23, 2026

 

नांदेड जिल्ह्यातील 5 लाख 68 हजार शेतकऱ्यांना दुष्काळी अग्रीम अनुदान वितरित

  • 8 लाख 73 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर; उर्वरित मदतीसाठी तांत्रिक पूर्तता आवश्यक

नांदेड, दि. 23 : दुष्काळ 2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 8 लाख 73 हजार 31 शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 68 हजार 220 शेतकऱ्यांना शासनस्तरावरून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने अग्रीम अनुदान अदा करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत शासनाकडून प्राप्त लाभार्थी माहिती, पात्रता निकष आणि बँक खात्याशी संबंधित तांत्रिक बाबींची पूर्तता महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सामाईक खातेदारांपैकी एका खातेदारालाच मदत देय आहे. तसेच एकाच खातेदाराची एकापेक्षा अधिक गटांत, गावांत, तालुक्यांत किंवा जिल्ह्यांत जमीन असल्यास त्याला एकदाच मदत मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात तफावत येऊ शकते. सामाईक क्षेत्रातील तसेच अकृषिक क्षेत्रातील अपात्र लाभार्थी शासनाच्या निकषांनुसार प्राप्त माहितीच्या आधारे वगळण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास 1.36 लाख अकृषिक खातेदार आहेत. त्यांना सदर मदत देय ठरत नाही.

ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी योग्य आहेत; मात्र त्यांच्या बँक खात्याला आधार संलग्न नसणे, आधार अद्ययावत नसणे, ई-केवायसी पूर्ण नसणे किंवा आधार संलग्नीकरण (सीडिंग) न झाल्यामुळे तसेच थेट लाभ हस्तांतरणाची (डीबीटी) सुविधा सक्रिय नसल्यामुळे अनुदान जमा होण्यात अडचणी येत आहेत. अशा प्रकरणांत शासनाने जमा केलेली मदत तांत्रिक कारणास्तव तात्पुरती स्थगित राहू शकते. बँक खात्याला आधार संलग्न करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनुदानाची रक्कम अदा होऊ शकते. त्यामुळे प्रलंबित अनुदान असलेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार संलग्नीकरण आणि डीबीटी सुविधा सक्रिय असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*******

दुष्काळग्रस्तांसाठी शासनाच्या १२ महत्त्वपूर्ण उपाययोजना राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न...