Wednesday, July 25, 2018


स्वभावासाठी औषध
                          ‘ आरोग्यम धनसंपदा ’ किंवा ‘ हेल्थ इज वेल्थ ’ या सुविचारांची आपल्याला लहाणपणापासुन ओळख असते.पण खरोखरचं आपण ते सुविचार समजून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आत्मसात करतो का,याचा विचार करण्याची गरज आहे. कारण आधुनिक काळात अनेक प्रकारच्या वाढलेल्या स्पर्धा व विविध विवंचनांमुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे .तसेच धावपळ , ताण  , सतत कामाचा दाब यामुळे शरीर व मनावर विपरीत परिणाम होतात . सतत चिंता लागणे , खिन्नता वाटणे , विनाकारण चिडचिड होणे , राग येणे किंवा संताप होणे , मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी मनातुन न जाणे , काळजी  इत्यादी मानसिक लक्षणे आपल्या आसपासच्या लोकांमध्ये बरेचदा बघायला मिळतात . हि लक्षणे काही गंभीर मानसिक आजार दर्शवितात किंवा  अशा मानसिक आजारांची सुरूवात असू शकतात . कधीकधी  अशी लक्षणे त्यांच्या आयुष्याचा भागच बनुन जातात  - त्यांच्याही नकळत आणि मग अशा वेळी त्यावर उपाय करणे तर सोडाच त्याची जाणिवही त्या व्यक्तीला होत  नाही . एखाद्या गोष्टी बद्दल अतिशय चीड /राग  / संताप येणे , सतत चिंता करणे , भुतकाळात अति रममाण होणे , अकारण भिती वाटणे , आत्मविश्वास कमी असाणे , व्यसनी बनणे , विनाकारण संशय घेणे , कुठलेही नविन काम सुरू करण्यापूर्वी साशंक होऊन ते पुढे ढकलणे , एकलकोंडेपणा तसेच कधीकधी दुसऱ्या वर प्रमाणाबाहेर अवलंबून राहणे , इतरांपासून लपवाछपवी करण्याची प्रव्रुत्ती इत्यादी लक्षणे मानसिक आरोग्य बिघडल्याची निर्देर्शक आहेत .
            वरिल काही लक्षणे सामान्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग झाला असल्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या परिवारातील लोकांच्या लक्षातही येत नाही .जेव्हा  कधी घरातील सदस्य / मित्र परिवार त्यांच्या अशा वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करतात, तेव्हा त्या व्यक्ती म्हणतात कि मलाही कळतं, सगळं पण वळतं नाही  किंवा काय करू स्वभावाला औषध नाही . पण आता जर खरोखरच एखाद्याची ईच्छा असेल तर त्याला त्याच्या स्वभावावरुन औषध देता येईल व त्याच्या स्वभावातील नकारात्मक गोष्टी काढून योग्य तो सकारात्मक बदल त्याच्या स्वभावात करणे शक्य आहे . कसे ???  बाख फ्लॉवर रेमिडीज म्हणजे पुष्पौषधीं द्वारे , डॉ एडवर्ड बाख , लंडन येथील सुक्षम जिवशास्त्रञ यांनी 1930  साली बाख फ्लावर रेमिडीज म्हणून एक औषध पद्धती सुरू केली.
            डॉ बाख हे उच्चविद्याविभुषित होते . MBBS केल्यानंतर त्यांनी त्या काळातील  MRCS , LRCP तसेच DPH ( केंब्रिज) या पदव्या  मिळवल्या . परंतु ते संशोधक वृत्तीचे असल्याने त्यांनी त्यांची ॲलोपॅथिक वैद्यकाची प्रॅक्टिस सोडून दिली व 1930 साली वनस्पतींच्या फुलांपासुन औषधे वापरण्याची पद्धत सुरू केली. यालाच बाख फ्लॉवर रेमिडीज किंवा पुष्पौषधी म्हणतात.                  
            डॉ बाख यांच्या औषधींची संख्या 38 असुन यामध्ये रानफुले , झुडपे , वृक्षांची फुले यांचा समावेश होतो.  यापैकी कोणतेही औषध अपायकारक नसून त्यांची सवयही लागत नाही . मानसिक व शारीरिक अशा दोन्हीही रोगप्रकारांवर त्यांचा चांगला उपयोग होतो ,असा डॉ बाख यांचा प्रयोगसिद्ध व अनुभवसिद्ध दावा आहे. डॉ बाख यांनी त्यांच्या "बारा गुणकारी औषधे व इतर औषधे " या पुस्तकात 38 पुष्पौषधींच्या गुणधर्मांची माहिती देऊन मनाच्या सात अवस्थांचे वर्णन केले आहे .मनाच्या या सात अवस्था  खालील प्रमाणे आहेत.
1.भिती,
 2.अनिश्चितता,
3.सद्यस्थितीत रस न वाटणे, 
 4.एकटेपणा/एकाकीपणा                                    
  5.कल्पना जास्त करणे व आजुबाजुच्या परिस्थितीस जास्त संवेदनशील असणे             
  6.नैराश्य अथवा विषण्ण मनस्थिती  
 7.दुसऱ्याचे भले होण्याविषयी  जादा  काळजी करण्याचा स्वभाव                          
              डॉ  बाख यांनी भितीच्या प्रकारांवर 5 औषधे वर्णन केली आहेत - धास्ती वाटणे , अकल्पित भीती व द्यात भीती , मानसिक भीतीने तोल सुटणे , घराबाहेरील लोकांची भिती वाटणे हे भीतीचे 5 प्रकार असून यासाठी 5 पुष्पौषधी देऊन भीती घालवता येते . इतर औषधी सोबतच (ॲलोपॅथिक / होमियोपॅथिक/आयुर्वेदीक/ युनानी ) ही औषधे घेतले तरी चालेल. आत्मविश्वास कमी असल्याने कुणी निर्णय घेउ शकत नाही  किंवा मनाच्या चलबिचल अवस्थेला कंटाळून जर निर्णय घेणे जमत नसेल तर अशा लोकांना बाख फ्लॉवर रेमिडीजने फायदा होतो .                                      
            स्वतः साठी बाख यांची औषधे घेण्याने तर विशेष फायदा होतो , कारण आपल्या मानसिक व शारीरिक अवस्थांची आपल्याला जास्त जाणीव असते. अतिशय थकवा आल्यास कसे वाटते ? मनासारखे न झाल्यास कशी  चिडचिड  होते किंवा तसे व्हायला उशिर झाल्यावर आपण कसे अधीर होतो  ? तातडीच्या गंभीर प्रसंगी मनःस्थिती कशी असते ? हवेत बिघाड  झाल्यास मन कसे उदास वाटते ,वगैरेची जाणीव आपल्याला लगेच होते. आपल्या मनाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये योग्य त्या बाख फ्लॉवर रेमिडीजचा वापर करुन बिघडलेल्या मानसिक स्थितीला लवकरच पुर्ववत करण्यासाठी ही औषधे खुप उपयोगी पडतात. स्वतःच्या मनःस्थितीचे निरीक्षण करुन तज्ञांच्या सल्ल्याने औषध सुरु करुन काही आठवडे / गरजेनुसार  औषध घेतल्यास नक्कीच फायदा होतो .                                             
            रोग होऊ नये म्हणून बाख फ्लॉवर रेमिडीजचा प्रतिबंधक औषध म्हणूनही उपयोग होतो . प्रतिबंधक औषधांचा वापर करताना व्यक्तीच्या मनाची अवस्था हाच केंद्रबिंदू लक्षात घेऊन औषधांची निवड करावी असे डॉ बाख यांनी सांगितले .व्यक्तीचा भावनात्मक समतोल बिघडला की शारीरिक लक्षणे त्यानंतर निर्माण होतात . तेव्हा नेहमीच मानसिक अवस्थांचा समतोल राखल्यास नंतरचा शारीरिक आजार होणारच नाही , असे डॉ बाख यांचे मत आहे .दुर्दैवाने मनाच्या अवस्थांकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही  व असे दुर्लक्ष केल्याने शारीरिक त्रास सुरू होतात आणि त्यावर औषधे घेतली जातात . आपल्यातील दोष आपल्याला माहिती असतात , त्यांचे आपण जतन करतो परंतु प्रक्रुती  निरोगी ठेवणारी डॉ बाख यांची औषधे  त्यांच्यावर दिली पाहिजे हे अनेकांना माहित नसते. भीती , राग , मत्सर , ईर्ष्या  वगैरे मनोवृत्ती लहान वयापासूनच असतात  तेव्हा प्रथम पासूनच ही औषधे दिल्यास व्यक्ती  निरोगी व सशक्त होईल . मला काही होत नाही  असे म्हणणारे अनेकजण असतात . ते मानसिक दडपणाखाली असल्याचे आढळते  व त्यांच्या मनोवेदना शारीरिक वेदनांपेक्षाही अधिक तीव्रतेच्या असतात , कारण वैचारिक वेदना या शारीरिक वेदनेपेक्षा नेहमीच जास्त त्रासदायक / वेदनादायक असतात . कामाचे  दडपण   घेऊन जर कोणी काम करत असेल किंवा आपल्याला न आवडणारे काम करावे लागले तर त्यामुळे थकवा येणे , निरुत्साही होणे किंवा चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात .तेव्हा कुठल्याही प्रकारचा ताण न घेता / लाज न बाळगता योग्य त्या बाख फ्लॉवर रेमिडीजचे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सेवन करावे व आपल्या जीवनातील समस्या / प्रश्न यांना  आत्मविश्वासाने सामोरे जावे .....पटतंय ना ? प्रथम  आपल्याला काही तरी समस्या आहे हे आपल्याला पटलं तर त्यानंतरच ती समस्या सोडवण्याच्या दिशेने योग्य त्या उपायापर्यंत आपण पोहचु शकतो.योग्य त्या उपायांमुळे अमूल्य असलेले आपले जीवन अधिक आनंदी ,समाधानीपणे जगतं आपल्यासह इतरांना ही आनंदी ठेवू शकतो.त्यामुळे चला स्वतःला वेळ देऊ या, आरोग्यसंपन्न जीवनशैली आत्मसात करु या आवश्यक तेथे बाख फ्लॉवर रेमिडीज तुमच्या सहाय्यासाठी आहेच.
-         डॉ.हेमा थोरात,(होमिओ तज्ञ)
      औरंगाबाद.


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 27 जुलै 2018 पासून घोषित करण्यात येत आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा शुक्रवार 27 जुलै 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रविवार 26 ऑगस्ट 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.  
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
नांदेड, दि. 25 :- जिल्ह्यात गुरुवार 26 जुलै 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 9 ऑगस्ट 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी सूचना  
नांदेड , दि. 25 :- गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कापुस जिनिंग व प्रेसिंग मिलचे मालक, व्यवस्थापक, कापुस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ व तालुका कृषि अधिकारी यांची सभा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड येथे नुकतीच घेण्यात आली. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या सभेत पुढील प्रमाणे सुचना देण्यात आल्या.  मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करुन कुठेही गुलाबी बोंडअळीचे पतंग तयार होऊन प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिनिंग मिलमधील किडके बियाणे त्वरीत नष्ट करण्यात यावेत. पडलेल्या सरकीपासून झाडे उगवली असल्यास ती उपटून टाकून कोणत्याही ठिकाणी सरकी पासून झाड उगवू देऊ नये. पतंगाचा अटकाव करण्यासाठी प्रत्येकी दहा मिटर अंतरावर एक कामगंध सापळा याप्रमाणे सगळीकडे कामगंध सापळे लावावे. त्यामध्ये सापडणाऱ्या पतंगाची गणना करुन तालुका कृषि अधिकारी यांना कळवावे. ठिकठिकाणी प्रकाश सापडळे सायं 6 ते 11 या कालावधीत लावून जास्तीत जास्त पतंग जमा होतील असे पहावे. कृषि उत्पन्न बाजार समिती व जिनिंग मालक यांनी त्यांच्या परिसरात 2 हजार शेतकऱ्यांना कामगंध सापळे ल्युर्स उपलब्ध करुन दयावे. याप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या मिलधारकावर क्रिमीनल पिनल कोड 133 अंतर्गत (सार्वजनिक हितास बाधा पोहचवणे) कायदेशीर कार्यवाही तसेच पर्यावरणास धोका निर्माण करणे पर्यावरण कायदा अंतर्गत परवाना रद्द करण्याबाबत संबंधीत मंत्रालयास प्रस्ताव पाठविण्यात येईल व सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.  
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी आभार मानले. कापुस संशोधन केंद्राचे कापुस विशेष डॉ. बेग, डॉ. तेलंग, डॉ. पांडागळे, ग्रेडर श्री. सुर्यवंशी, श्री. माने तसेच कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. शिंदे, प्रा. कल्याणकर, प्रा. तुरखडे उपस्थित होते, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
000000

Tuesday, July 24, 2018


घोगरवाडी या गावातील प्रश्न मार्गी लावावेत  
 --- किरण कुलकर्णी
नांदेड , दि. 24 :- घोगरवाडी ता. किनवट या गावातील प्रश्न मार्गी लावावेत. ग्रामसेवक , तलाठी यांनी कोलाम, प्रधान, गोंड या प्रवर्गाच्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ग्रामसेवक व तलाठी यांनी या नागरिकांना कायद्याची माहिती करुन द्यावी. विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती करुन देण्यात यावी. आणि योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक तथा सचिव विशेष तपासणी समिती किरण कुलकर्णी यांनी सांगितले.  
पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक तथा सचिव विशेष तपासणी समिती किरण कुलकर्णी यांनी घोगरवाडी ता. किनवट या गावास भेट दिली.  गावातील नागरिकांनी पारंपरिक पध्दतीच्या ढेमसा हे नृत्य सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले. 
नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच औरंगाबाद महसूल विभागात नामसाधर्म्याचा फायदा घेवून अनुसूचित जमातीच्या बोगस जात प्रमाणपत्रे , अवैध मार्गाने अनुसूचित जमातीची बनावट जात प्रमाणपत्रे व पडताळणी समितीचे बनावट आदेश, न्यायालयाचे बनावट आदेश / निर्णय तयार करणे इत्यादीची सखोल तपासणी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली किनवट उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत नागरिकांच्या अडीअडचणींचे सखोल चर्चा करुन तसेच पुरावे दाखल करणे, अन्य विविध विषयांच्या मुद्द्यावर  चर्चा करण्यात आली. तसेच समितीच्या कामकाजासंदर्भात निवेदने स्वीकारण्यात आली.  
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय आयुक्त कार्यालय , औरंगाबाद उपजिल्हाधिकारी (मागासवर्ग कक्ष) सरिता सुमात्रे, किनवट उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार नरेंद्र देशमुख, गटशिक्षणाधिकारी पी.टी. जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. आर. बारसे, वरिष्ठ संशोधन अधिकारी विजयकुमार कटके आदि संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
0000
 



Sunday, July 22, 2018


महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड , दि. 22 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 23 जुलै 2018 रोजी दारव्हा येथून खाजगी वाहनाने  पुसद, महागाव, वारंगा मार्गे  दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे समवेत महाराजस्व अभियान संदर्भात चर्चा. सायंकाळी 5.30 वा. खाजगी वाहनाने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम नांदेडकडे प्रयाण. सायं. 6 वा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आषाढी महोत्सव 2018 या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ-  शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम नांदेड. सोईनुसार खाजगी वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण आगमन व राखवी.
मंगळवारी 24 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वा. खाजगी वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगनम व राखीव. सकाळी 10.50 वा. टुजेट विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...