Tuesday, July 24, 2018


घोगरवाडी या गावातील प्रश्न मार्गी लावावेत  
 --- किरण कुलकर्णी
नांदेड , दि. 24 :- घोगरवाडी ता. किनवट या गावातील प्रश्न मार्गी लावावेत. ग्रामसेवक , तलाठी यांनी कोलाम, प्रधान, गोंड या प्रवर्गाच्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ग्रामसेवक व तलाठी यांनी या नागरिकांना कायद्याची माहिती करुन द्यावी. विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती करुन देण्यात यावी. आणि योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक तथा सचिव विशेष तपासणी समिती किरण कुलकर्णी यांनी सांगितले.  
पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक तथा सचिव विशेष तपासणी समिती किरण कुलकर्णी यांनी घोगरवाडी ता. किनवट या गावास भेट दिली.  गावातील नागरिकांनी पारंपरिक पध्दतीच्या ढेमसा हे नृत्य सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले. 
नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच औरंगाबाद महसूल विभागात नामसाधर्म्याचा फायदा घेवून अनुसूचित जमातीच्या बोगस जात प्रमाणपत्रे , अवैध मार्गाने अनुसूचित जमातीची बनावट जात प्रमाणपत्रे व पडताळणी समितीचे बनावट आदेश, न्यायालयाचे बनावट आदेश / निर्णय तयार करणे इत्यादीची सखोल तपासणी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली किनवट उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत नागरिकांच्या अडीअडचणींचे सखोल चर्चा करुन तसेच पुरावे दाखल करणे, अन्य विविध विषयांच्या मुद्द्यावर  चर्चा करण्यात आली. तसेच समितीच्या कामकाजासंदर्भात निवेदने स्वीकारण्यात आली.  
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय आयुक्त कार्यालय , औरंगाबाद उपजिल्हाधिकारी (मागासवर्ग कक्ष) सरिता सुमात्रे, किनवट उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार नरेंद्र देशमुख, गटशिक्षणाधिकारी पी.टी. जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. आर. बारसे, वरिष्ठ संशोधन अधिकारी विजयकुमार कटके आदि संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
0000
 



Sunday, July 22, 2018


महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड , दि. 22 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 23 जुलै 2018 रोजी दारव्हा येथून खाजगी वाहनाने  पुसद, महागाव, वारंगा मार्गे  दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे समवेत महाराजस्व अभियान संदर्भात चर्चा. सायंकाळी 5.30 वा. खाजगी वाहनाने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम नांदेडकडे प्रयाण. सायं. 6 वा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आषाढी महोत्सव 2018 या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ-  शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम नांदेड. सोईनुसार खाजगी वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण आगमन व राखवी.
मंगळवारी 24 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वा. खाजगी वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगनम व राखीव. सकाळी 10.50 वा. टुजेट विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
नांदेड , दि. 22 :- राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 
सोमवार 23 जुलै 2018 रोजी  जालना येथून सायं 5 वा. नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सायं. 6.30 वा. आमदार हेमंत पाटील यांनी आयोजित केलेल्या आषाढी महोत्सव या कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. मंगळवार 24 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. नांदेड येथून जालनाकडे प्रयाण करतील.
0000


लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे
प्र. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते प्रकाशन
नांदेड , दि. 22 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्य या मासिकाच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्रीमती ढालकरी यांनी लोकराज्य ‘आषाढी वारी’ विशेषांक वाचकांसाठी वाचनीय असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोल्लू, जिल्हाधिकारी कार्यालयातील बालाजी पांचाळ, प्रसाद शिरपूरकर, भगवान देवसरकर, शिवानंद स्वामी, के. के. मेहकरकर, आर. टी. पोहरे, बालाजी चौहान तसेच छायाचित्रकार महेश होकर्णे, मोहम्मद हाजी, जिल्हा माहिती कार्यालयाचे काशिनाथ आरेवार, महमंद युसूफ आदी उपस्थित होते.
आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक
पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी  वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
हा लोकराज्य विशेषांक जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंकाची किंमत 10 रुपये असून लोकराज्य (मराठी) मासिकाची वार्षिक वर्गणी शंभर रुपये आहे. ही वर्गणी जिल्हा माहिती कार्यालय सिद्धी विनायक मंदिराजवळ विसावानगर नांदेड येथे भरता येईल. जास्तीतजास्त नागरिकांनी हा विशेषांक संग्रही ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
 0000000

Saturday, July 21, 2018


बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या
विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज 31 जुलै पासून सुरु  
नांदेड, दि. 21 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2018 या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) http://form17.mh-shc.ac.in या संकेतस्थळावर सोमवार 30 जुलै 2018 पासून स्विकारण्यात येणार आहेत, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.   
सोमवार 30 जुलै 2018 ते शनिवार 25 ऑगस्ट 2018 या कालावधीत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरावीत. मंगळवार 31 जुलै 2018 ते शनिवार 27 ऑगस्ट 2018 कालावधीत विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क कनिष्ठ महाविद्यालयास जमा करावीत. शुक्रवार 31 ऑगस्ट 2018 रोजी कनिष्ठ महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

 नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्डाचे
 तीन सदस्‍य निवडून देण्यासाठी पात्र मतदारांची नाव नोंदणी सुरु
नांदेड, दि. 21 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्डाचे तीन सदस्‍य निवडून देण्‍यासाठी मतदार यादी तयार करण्यात येत आहे. पात्र मतदारांचे नाव नोंदणीचे अर्ज संबं‍धीत तहसीलदार यांचेकडे शनिवार 18 ऑगस्‍ट 2018 पर्यंत स्विकारले जातील, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब अधिनियम 1956 च्‍या कलम 6 पोटकलम दोन अन्‍वये बोर्डाचे तीन सदस्‍य निवडून देण्‍यासाठी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी पुढील सूचना देण्‍यात आल्या आहेत. नियम तीन खाली शासनाने दिनांक 1 जूलै 2018 ही अर्हता तारीख निर्दिष्‍ट केली आहे. मतदार यादीत नाव दाखल करण्‍यास पात्र असलेल्‍या मतदारांना 20 जूलै 2018 या तारखेपासून 30 दिवसात त्‍यांचे नाव मतदार यादीत नोंदविता येईल. महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्‍या मतदार यादीत दिनांक 1 जुलै 2018 रोजी ज्‍यांची नावे आहेत व जे सामान्‍यत: जुन्‍या हैद्राबाद संस्‍थानचा भाग महाराष्‍ट्र राज्‍यात समाविष्‍ट केलेल्‍या भागात राहतात. (औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील) अशा सर्व शिख मतदारांना या निवडणुकीसाठी तयार होणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल. मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठी सोबत मतदानाचे ओळखपत्र किंवा नोंदणीकर्त्‍यांचे मतदार यादीतील नावांची छायांकित प्रत जोडण्‍यात यावी.
महाराष्‍ट्र राज्‍यात सामील झालेल्‍या भूतपुर्व हैद्राबाद राज्‍याच्‍या भागात अर्थात  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील भाग हा मतदारसंघ आहे. सामान्‍यत: या क्षेत्राबाहेर राहणाऱ्या शिख मतदारांना मतदार यादीत नावे नोंदविता येणार नाहीत.
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्जाचे नमुने संबंधीत तालुक्‍याच्‍या तहसीलदारांकडे देण्‍यात आले आहेत. मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठीचा अर्ज नमुना नं. 1 मध्‍ये संबं‍धीत तहसीलदार यांचेकडे दिनांक 20 जूलै 2018 ते 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत स्विकारले जातील. प्रारुप मतदार यादी तयार झाल्‍यानंतर मतदार संघातील सर्व संबंधीत जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयात तसेच जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) व गुरुव्‍दारा बोर्डाच्‍या कार्यालयात नियम आठ प्रमाणे उक्‍त मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल. नियम 9 व 10 प्रमाणे कार्यवाही झाल्‍यानंतर नियम 11 नुसार अंतिम मतदार यादी  प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

आषाढी एकादशी निमित्त
सोमवारी स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 21 :-  शासन निर्णयाद्वारे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सन 2018  साठी स्थानिक सुट्ट्या निश्चित केल्या आहे. त्यानुसार सोमवार 23 जुलै 2018 रोजी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) निमित्त नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सोमवार 23 जुलै रोजी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) निमित्त या दिवशी नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना ही सुट्टी लागू राहिल.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही या अधिसुचनेत म्हटले आहे.
मंगळवार 6 नोव्हेंबर 2018 रोजी नरक चतुर्दशी निमित्त नांदेड जिल्ह्यास स्थानिक सुट्टी राहील. यापुर्वी कंधार ऊर्ससाठी बुधवार 4 एप्रिल 2018 रोजी स्थानिक सुट्टी देण्यात आली होती.
000000

दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.! खरीप हंगामातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,...