Tuesday, February 24, 2026

 वृत्त क्रमांक  

विविध कृषि पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणक प्रणाली

इच्छुक शेतकरी, संस्था, व्यक्ती, गटांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 24 फेब्रुवारी :- जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांनी सन 2025 पासूनचे विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त यांनी केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. 

महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनातर्फे दर वर्षी कृषीक्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट/संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय / अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्याला / जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. 

यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळवद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे. 

या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे.  यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे फायदा होणार आहे.

•  ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार.

* ऑफलाईन चार प्रतींमधील प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च वाचून प्रस्ताव सादरीकरण जलद गतीने होणार आहे.

•   एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा-पुन्हा देण्याची आवश्यकता नाही.

•  अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे.

•  छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होणार असून आर्थिक भार कमी होणार आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! नवी मुंबईच्या खारघरमध्ये आयोजित या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला आपली उपस्थि...