Monday, November 9, 2026

वृत्त क्रमांक

दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईवर मात करण्यासाठी 

रोजगार हमी योजनेतून चारा पिकांची लागवड करा-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

• सात प्रकारच्या सुधारित चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन 

नांदेड, दि. 09 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी हिरवा व कोरडा चारा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत चारा पिकांच्या लागवडीची कामे हाती घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. नैऋत्य मोसमी पावसातील तूट, एल निनोचा प्रभाव आणि रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात संभाव्य घट यामुळे आगामी काळात चारा उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन गायरान जमिनी तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतजमिनीवर सुधारित चारा पिकांची लागवड करण्याची कामे मंजूर करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, मेथी घास, ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट अशा सात प्रकारच्या चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या पिकांसाठी हेक्टरी आर्थिक तरतूद व रोजगार निर्मितीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार मका पिकासाठी 47 हजार 307 रुपये व 95 मनुष्यदिवस, ज्वारीसाठी 42 हजार 778 रुपये व 88 मनुष्यदिवस, बाजरीसाठी 35 हजार 505 रुपये व 74 मनुष्यदिवस, नेपियर गवतासाठी 76 हजार 31 रुपये व 155 मनुष्यदिवस, मेथी घासासाठी 1 लाख 13 हजार 290 रुपये व 270 मनुष्यदिवस, ज्वारी मल्टीकटसाठी 51 हजार 36 रुपये व 100 मनुष्यदिवस, तर बाजरी मल्टीकटसाठी 76 हजार 44 रुपये व 180 मनुष्यदिवस रोजगार निर्मितीची तरतूद आहे.

या लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, एनएमएच-4053, न्यूट्री गोल्ड, सीएसव्ही-33 एमएफ, न्यूट्रीफास्ट, यशवंत, जयवंत, सुपर नेपियर, आरएल-88, सीओ-1, जायंट बाजरी आदी सुधारित वाणांचा वापर करता येणार आहे. आवश्यक बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विज्ञान केंद्र यांसारख्या अधिकृत संस्थांमार्फत उपलब्ध करून घेता येईल. या योजनेत मजुरांच्या श्रमांना प्राधान्य देण्यात आले असून, मजुरांमार्फत करणे शक्य असलेल्या कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे चारा उत्पादनासोबतच ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे.

या कामांची अंमलबजावणी पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वैयक्तिक शेतकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवर आणि पात्र लाभार्थ्यांच्या शेतजमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासोबतच पशुधनाचे संवर्धन आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती साध्य करण्यासाठी या योजनेचा प्रभावी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

**

No comments:

Post a Comment

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ राज्यभर विविध उपक्रम #भगवानबिरसामुंडा #आदिवासीविकास #महाराष्ट्रशासन #Ma...