वृत्त क्रमांक
आषाढी वारीतील "चरणसेवा" उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी
नांदेड, दि. ८ जुलै : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तथा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेला *"चरणसेवा"* उपक्रम बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी मारोती मंदिर, सावरगाव पीर (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे संपन्न झाला.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या सद्गुरू श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूर यांच्या दिंडीची परंपरा अनेक वर्षांपासून अखंड सुरू आहे. या दिंडीसोबत जिल्ह्यातील शेकडो वारकरी पायी वारी करून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जातात.
वारकऱ्यांच्या पायी प्रवासामुळे होणारा शारीरिक थकवा कमी करणे, त्यांच्या पायांची व स्नायूंची योग्य काळजी घेणे तसेच आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषारभाऊ राठोड यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबईचे विशेष कार्य अधिकारी तथा कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. स्वानंद सोनार तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या उपक्रमात सुमारे *६० वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने ४०० हून अधिक वारकऱ्यांना* चरणसेवा, आरोग्य तपासणी व आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले. तसेच फिजिओथेरपी, आयुष उपचार पद्धतीद्वारे सेवा आणि पंचकर्म उपचारही देण्यात आले. या सेवेमुळे पायी प्रवासामुळे आलेला शारीरिक थकवा दूर होऊन पुढील वारीसाठी नवचैतन्य आणि ऊर्जा मिळाल्याची भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली.
सद्गुरू श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूरचे दिंडी प्रमुख ह.भ.प. गुरुराज महाराज यांनी "चरणसेवा" उपक्रमाचे विशेष कौतुक करत, या सेवेमुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. दिंडीतील वारकऱ्यांनीही उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सद्गुरू श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड, नांदेड फिजिओथेरपी कॉलेज, पांगरी, आरोग्य भारती (नांदेड जिल्हा) तसेच अनुलोम, नांदेड जिल्हा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. गंगासागरे, स्वास्थवृत्त विभागप्रमुख डॉ. यशवंत पाटील, डॉ. भास्कर पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी (मुखेड) डॉ. अविनाश देशमुख यांनी विशेष सहकार्य केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक श्री गजानन वानखेडे, समन्वयक श्री संभाजी लोंढे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. देवानंद पवार, डॉ. संदीप फंड, डॉ. विनोद बिजमवार, डॉ. शंकर इंदुरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे डॉ. धोंडीबा मुंडे व त्यांचे कर्मचारीवृंद तसेच नांदेड फिजिओथेरपी कॉलेज, पांगरीचे असोसिएट डायरेक्टर डॉ. विजय भारतीया, डॉ रोहिणी सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांसह अनुलोम, नांदेडचे पांडुरंग बुद्धेवाड, राम मुलंगे आणि निलेश डांगे तसेच संगमेश्वर देवकते व मनोज कांबळे यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेला प्राधान्य देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरला असून भविष्यातही अशा स्वरूपाचे उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
0000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment