वृत्त क्रमांक
नांदेडमध्ये बायोचार प्रकल्पाला गती ; जिल्हाधिकारी कार्यालयात अद्विक सस्टेनेबल सोल्युशन्ससोबत सकारात्मक चर्चा
नांदेड, दि. 9 जुलै : नांदेड जिल्ह्यात शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन आणि कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन करण्याच्या दृष्टीने बायोचार प्रकल्प राबविण्याबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत अद्विक सस्टेनेबल सोल्युशन्स आणि जिल्हा प्रशासन यांच्यात प्रशासकीय स्तरावरील अनौपचारिक बैठक पार पडली.
बैठकीत अद्विक सस्टेनेबल सोल्युशन्सचे Founder & CEO अविनाश उमरे आणि Lead – Strategic Partnerships अक्षय श्रीकंठवार यांनी बायोचार प्रकल्पाचे सादरीकरण केले. विशेषतः कापूस पिकाचे अवशेष (Cotton Biomass) आणि प्रोसोपिस जुलीफ्लोरा (विलायती बाभूळ) यांचा वापर करून बायोचार निर्मिती करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.
बायोचारमुळे कृषी अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी होऊन वायू प्रदूषणात घट होईल, मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढेल, पाणी धारण क्षमता सुधारेल आणि जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. तसेच कार्बन संचयनाला चालना मिळून हवामान बदलाच्या परिणामांना कमी करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे बैठकीत नमूद करण्यात आले.
यावेळी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय समन्वय, विविध शासकीय विभागांचा सहभाग, शेतकरी जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रायोगिक स्वरूपात प्रकल्प सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासोबतच ग्रामीण भागात हरित रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनेही या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य देण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. जिल्ह्यात बायोचार प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीत बायोचार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नांदेड जिल्हा शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण आणि कार्बन कमीकरणाच्या क्षेत्रात राज्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
00000
No comments:
Post a Comment