वृत्त क्रमांक
विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
१८ बीएलओ व ३ पर्यवेक्षकांविरुद्ध होणार कार्यवाही – डॉ. सचिन खल्लाळ
नांदेड, दि. ९ जुलै : ०८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत एकूण ३१२ मतदारयादी भागांमध्ये विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या कामासाठी वारंवार सूचना देऊनही १८ बीएलओ (Booth Level Officer) व ३ पर्यवेक्षक यांची प्रगती अत्यंत कमी असल्याने त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.
या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ व त्यांच्या सहाय्यकांना उपस्थित राहण्यापासून अडवणूक करणाऱ्या संबंधित आस्थापना प्रमुखांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न केल्यास तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील तरतुदीनुसार संबंधित कार्यालय प्रमुखांविरुद्धही शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, २५ बीएलओ व ६ पर्यवेक्षक यांची कामगिरी असमाधानकारक असल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटिसा देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. दि. १० व ११ जुलै या दोन दिवसांत त्यांच्या कामात अपेक्षित प्रगती न झाल्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील तरतुदीनुसार संबंधितांविरुद्ध पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे.
तसेच ज्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यांच्या कामात दि. ११ जुलैपर्यंत सुधारणा न झाल्यास त्यांच्याविरुद्धही कार्यवाहीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. खल्लाळ यांनी सांगितले.
विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी नियुक्त बीएलओ, त्यांचे सहाय्यक, पर्यवेक्षक तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार विहित मुदतीत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. कामात निष्काळजीपणा अथवा दिरंगाई करणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नसून संबंधितांविरुद्ध कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिला.
00000
No comments:
Post a Comment