वृत्त क्रमांक
नायगाव येथे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत
कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
नांदेड दि. 29 जून :- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायचे जिल्हा उपआयुक्त डॉ. एस. बी. खुणे, यांच्या संकल्पनेतून तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नायगाव डॉ. गौतम खिल्लारे यांच्या नियोजनाखाली तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नायगाव, जि. नांदेड येथे “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना” अंतर्गत कुक्कुटपालन विषयक 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिरास आज उत्साहात प्रारंभ झाला.
या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील एकूण 130 प्रशिक्षणार्थींची नोंदणी करण्यात आली आहे. शासनमान्य अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणार्थींना कुक्कुटपालन व्यवसायाचे शास्त्रीय व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना, खाद्य व्यवस्थापन, निवास व्यवस्था, लसीकरण, आर्थिक नियोजन तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या प्रशिक्षण उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवक, महिला व शेतकरी यांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन कुक्कुटपालन व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
00000
No comments:
Post a Comment