Wednesday, October 28, 2026

वृत्त क्रमांक

एफएफएस ॲपद्वारे नांदेड जिल्ह्यात 3,553 शेतकऱ्यांची 928 मे. टन खतासाठी नोंदणी

• खत खरेदीतील पारदर्शकतेसाठी डिजिटल सुविधेचा लाभ घ्या-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

नांदेड, दि. 28 : शेतकऱ्यांना आवश्यक खते सुलभतेने उपलब्ध व्हावीत, खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढावी आणि खत खरेदीसाठी होणारी गर्दी टाळता यावी, यासाठी केंद्र शासनाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) हे ॲप उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेचा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी लाभ घेत असून, आतापर्यंत 3 हजार 553 शेतकऱ्यांनी 928 मेट्रिक टन खतासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द. रा. कळसाईत यांनी केले आहे.

केंद्र शासनाची ही डिजिटल प्रणाली महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. शेतकऱ्यांना मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून एफएफएस ॲप डाउनलोड करून आपल्या परिसरातील खत विक्री केंद्रांवर उपलब्ध असलेली खते, त्यांचा साठा आदी माहिती घरबसल्या मिळविता येते. आवश्यक खताची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून खत खरेदी करणे अधिक सुलभ होते. त्यामुळे खत खरेदीसाठी दुकानांबाहेर रांगा लावण्याची गरज कमी होणार आहे.

एफएफएस प्रणालीमुळे खत विक्री प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. खतांची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे तसेच अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करणे यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यास या प्रणालीची मदत होईल. ऑनलाइन नोंदणीमुळे खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना आवश्यक खत उपलब्धतेची माहिती वेळेत मिळू शकेल.

नोंदणीनंतर 72 तासांत खताची उचल आवश्यक

शेतकऱ्यांनी एफएफएस ॲपवर खताची नोंदणी केल्यानंतर 72 तासांच्या आत संबंधित खताची उचल करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नोंदणी करताना खताची प्रत्यक्ष गरज, आवश्यक प्रमाण आणि खरेदीसाठी उपलब्ध असलेला वेळ यांचा विचार करावा. तसेच ॲपचा वापर करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या एकवेळच्या संकेतांकाद्वारे (ओटीपी) पडताळणी केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड व त्यास संलग्न मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवावेत.

एफएफएस ॲपचा वापर करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. गावपातळीवर क्षेत्रीय सहाय्यक कृषी अधिकारी व संबंधित उपकृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना ॲप हाताळण्याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जात आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी ऑनलाइन नोंदणी सुविधेचा अधिकाधिक वापर करावा. या सुविधेमुळे खत वितरण अधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द. रा. कळसाईत यांनी केले आहे.

***

राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये खरीप हंगामात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

प्रिय नागरिकांनो,

सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासनामार्फत ही माहिती देण्यात येत आहे.

सोबत दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. यामध्ये सायबर फसवणूक कशी केली जाते आणि त्यापासून सुरक्षित कसे राहावे, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

सायबर गुन्हा किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास, तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवावी.

अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांना फॉलो करा:

इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/mahacyber


एक्स (ट्विटर) : https://x.com/MahaCyber1?lang=en


सतर्क राहा, सुरक्षित राहा. — महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासन



 चारा पीक लागवडीच्या अंदाजपत्रकास मान्यता


वृत्त क्रमांक

नांदेडमध्ये १४ वर्षीय प्रणव मेंडके बेपत्ता ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन

नांदेड, दि. २८ ऑक्टोबर : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. प्रणव रामेश्वर मेंडके असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. नातेवाइकांनी शोध घेऊनही तो आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, भाग्यनगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

घरातून पहाटे निघाला, अद्याप परतला नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव मेंडके हा सोमवार ५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ४.२० वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतला नसल्याचे समोर आले आहे. नातेवाइकांनी त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र तो सापडला नसल्याने अखेर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

प्रणव हा मूळचा भोकर तालुक्यातील आमदरी वाडी येथील रहिवासी असून, सध्या तो नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरातील मोरेश्वर प्लाझा, प्लॉट क्रमांक ३०१ येथे राहत होता.

बेपत्ता मुलाचे वर्णन
प्रणवची उंची सुमारे पाच फूट असून, रंग सावळा आणि शरीरबांधा सडपातळ आहे. त्याचा चेहरा लांबट असून, बेपत्ता झाला त्यावेळी त्याने ग्रे रंगाचा हाफ टी-शर्ट, हिरवट रंगाची नाइट पँट परिधान केली होती. तसेच त्याच्या तोंडाला लाल रंगाचा मास्क सदृश बांधलेले कापड आणि पायात सॅन्डल होते. त्याला चहा पिण्याची सवय व मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा बोलता येत असल्याची माहिती पोलिसांच्या शोधपत्रिकेत नमूद करण्यात आली आहे. 

माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
बेपत्ता प्रणव मेंडके याच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ भाग्यनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे. संपर्क क्रमांक भाग्यनगर पोलीस ठाणे  ०२४६२-२६१३६४, पोलीस निरीक्षक संतोष तांबे ९८५०१८८१००, तपासीक अंमलदार आर. पी. जाधव : ९०४९३४३०९५ हा आहे. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास वरील क्रमांकांवर त्वरित कळवावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
0000





 

Tuesday, October 27, 2026

३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे...

वृत्त क्रमांक

बालकांचे आरोग्य जपण्यासाठी नियमित जंतनाशक गोळ्यांचे सेवन आवश्यक

• जिल्हा रुग्णालय नांदेड येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन

• 3 नोव्हेंबरला पूरक मोहीम

नांदेड, दि. 27 : बालकांना जंतांच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून त्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे मंगळवारी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. पेरके यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेद्वारे 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपमा बालाजी शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. बुट्टे, डॉ. लोमटे, प्रभारी परिचारिका रेखा मुंडे, परिचारिका जयश्री वाघ, आरकेएसके समुपदेशक धनश्री गुंडाळे तसेच परिचर्या विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करताना जंतांच्या प्रादुर्भावामुळे रक्तक्षय होऊ शकतो, तसेच वारंवार पोटदुखीचा त्रास उद्भवू शकतो, असे सांगण्यात आले. बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दर सहा महिन्यांनी जंतनाशक गोळी देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळ्या देण्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना अल्बेंडाझोल गोळीची अर्धी मात्रा योग्य पद्धतीने देण्यात येणार आहे, तर 2 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना एक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या दिवशी, म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी 3 नोव्हेंबर 2026 रोजी पूरक मोहीम (मॉप-अप दिन) राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार जंतनाशक गोळी देऊन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. पेरके यांनी केले आहे.

***





राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...