Thursday, February 9, 2017

* लेख क्र. 3

 हत्तीरोग उच्चाटनासाठी
सामुहिक औषधोपचार मोहीम

महाराष्ट्रात नांदेड, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,  ठाणे, सोलापूर इत्यादी जिल्ह्यात हत्तीरोगाचे रुग्ण आजही आढळतात. या हत्तीरोगाचे सन 2020 पर्यंत उच्चाटन करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी “एकदिवसीय सामुहिक औषधोपचार” मोहीम नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 10 ते मंगळवार 14 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख...  

भारतात “हिवताप” खालोखाल “हत्तीरोग” ही सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोकांना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला आहे. त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतो आहे. नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान औषधोपचार मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 34 लाख 82 हजार 628 लोकसंख्या पैकी 29 लाख 90 हजार 793 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 27 लाख 81 हजार 437  आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतुची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुन: दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात. नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ ) 12 ते 18 महिने आहे.
हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकागृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुद्धा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाह्य जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृद्धी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2020 पर्यंत उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते.
जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी “एकदिवसीय सामुहिक औषधोपचार” एम.डी.ए. (मास ड्रेग ॲडमिनिट्रेशन) सर्वांना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसतो) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.
या एम.डी.ए. ( एक दिवसीय सामुहिक औषधोपचार) मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपूर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे, शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम. डी. ए. या एकदिवसीय डी.ई.सी. अधिक ॲलबेनडॉझॅाल गोळ्याचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा ( डोस ) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ-जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो.
एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळ्याचा डोस – वयोगट- 2 वर्षापेक्षा कमी ( डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- निरंक) ( ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ.- निरंक ), 2 ते 5 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 1 गोळी) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी), 6 ते 14 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 2 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी), 15 वर्षावरील (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 3 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी).
या मोहिमेबाबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, ही मोहिम नांदेड जिल्ह्यात राबविण्यासाठी 1 हजार 833 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आली आहे. त्यावर 183 पर्यवेक्षक, 19 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 11 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. मोहीम राबविण्यासाठी 75 लाख डि. ई. सी. गोळ्या व 30 लाख अलबेंडॉझॉल गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. तेंव्हा डी. ई. सी. , ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व स्वयंसेवक ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान  येतील तेंव्हा या गोळ्या  उपाशी पोटी न घेता जेवन करुन घ्याव्यात. शासनाच्या या मोहिमेस नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास नक्कीच आपण हत्तीरोगापासून मुक्त होऊ.
-         संकलन
काशिनाथ र. आरेवार ,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

0000000
कर्करोग दिन व पंधरवड्यानिमित्त
जिल्हा कारागृहात शिबीर संपन्न
नांदेड दि. 9 :-  कर्करोग दिन व पंधरवाडा 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017 या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज श्री गुरुगोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय नांदेड व समता मेमोरिअल फाऊनडेशन  यांच्यावतीने जिल्हा कारागृह नांदेड येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम व सर्व रोगनिदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय डॉ. डी. एन. हजारी हे होते.  
डॉ. हजारी यांनी तंबाखू हे मानवी आरोग्यास कसा घातक आहे याबद्दल कैद्यांना सोप्या शब्दात माहिती दिली. दंत शल्याचिकित्सक  डॉ. रोशनी चव्हाण यांनी उपस्थित कैद्यांना तंबाखू सारख्या निकोटीनयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे कॅन्सरसह होणाऱ्या विविध आजाराची माहिती दिली.
यावेळी उपस्थित कैदी तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात 70  रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७.१ टक्के रुग्ण उच्चरक्तदाब व ७.१ टक्के मधुमेहाचे उपचार घेत असल्याची दिसून आली. तसेच ८ टक्के नवीन रुग्ण उच्चरक्तदाबासाठी निदान झाली. त्याचबरोबर ६१.४२ टक्के रुग्णांच्या त्वचेची व  १२.८५ टक्के रुग्णांची मुख आरोग्यासाठी तपासणी करण्यात आली.
शिबिरास डॉ. एच.आर साखरे, कारागृह अधीक्षक श्री. चव्हाण,  डॉ. रोशनी चव्हाण, डॉ. बोरसे डी. पी., सामुपदेशक सुवर्णकार सदाशिव, अधिपरिचारिका सारिका तथोडे व समता मेमोरिअल फाऊनडेसेन ऑफिसर शिवशंकर गव्हाणे उपस्थित होते.

0000000
हत्तीरोग उच्चाटनासाठी आजपासून
जिल्ह्यात सामुहिक औषधोपचार मोहीम
गृहभेटीत गोळ्या खाऊ घालण्यात येणार
नांदेड दि. 9 :- महाराष्ट्रात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा,  सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यात हत्तीरोगाचे रुग्ण आजही आढळतात. या हत्तीरोगाचे 2020 पर्यंत उच्चाटन करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी “एकदिवसीय सामुहिक औषधोपचार” मोहीम नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 10 ते मंगळवार 14 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान औषधोपचार मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 34 लाख 82 हजार 628 लोकसंख्या पैकी 29 लाख 90 हजार 793 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 27 लाख 81 हजार 437  आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
ही मोहिम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी 1 हजार 833 टिम (2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर 183 पर्यवेक्षक, 19 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 11 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. तेंव्हा डी. ई. सी. अधिक ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व स्वयंसेवक वरील तारखांना येतील तेंव्हा या गोळ्या जेवन करुन ( उपाशी पोटी न घेता ) घेऊन या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वांना हातभार लावावा, असे आवाहन हिवताप अधिकारी डॅा. राजेंद्र पवार यांनी केले आहे.  

0000000

Wednesday, February 8, 2017

ई-पीओश मशिन्सद्वारे नांदेड जिल्ह्यात
धान्य वितरणाची कॅशलेस प्रणाली सुरू
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते गोपाळवाडी येथे प्रारंभ
नांदेड दि. 8 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण अंतर्गत सद्यस्थीतील ईपीडीएस अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील टप्पा ई-पीओएस मशिन्सद्वारे अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना आता यापुढे धान्य वितरीत होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील शंभर टक्के आधार सिडींग झालेल्या दोन दुकानांचा ई-पीओएस मशिन्सद्वारे धान्य वितरणास नुकताच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते मुदखेड तालुक्यातील गोपाळवाडी येथे पार पडला. प्रायोगिक तत्वावरील ही प्रणाली पुढील काळात काळात सर्व दुकानांकरीता अंमलात आणली जाणार आहे.
 या प्रणालीअंतर्गत कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आयडीएफसी बँकने मुदखेड शंभर टक्के आधार सिडींग पूर्ण केलेल्या गोपाळवाडी व मुदखेड येथील दोन दुकानदार यांचे पीओसी तसेच व्यवसाय प्रतिनिधींकरीता त्यांचेकडील मॅायक्रो एटीएमद्वारे आयडीएफसी बँकचे चालू बँक खाते सुरु केले आहे. यामुळे ई-पीडीएस म्हणजेच आधारद्वारे संलग्न वितरण व्यवस्थेंतर्गत आता स्वस्त धान्य दुकानदारांच्या पुढाकाराने महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात ई-पीडीएस कॅशलेस तसेच एफपीएस व्यवसाय प्रतिनिधींची वाटचाल सुरु झाली. यावरुन हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये प्रथम यशस्वी करण्यात नांदेड जिल्ह्याने बाजी मारली आहे.
उपआयुक्त श्रीमती वर्षा ठाकूर यांनी या योजनेचा उद्देश तसेच डिजीटल तंत्रज्ञानाचा वापरामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम होणार आहे. याकरीता तुम्हा सर्वांचे सहकार्य असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शासन लाभार्थ्यांकरीता तसेच त्यांचे हिताकरीता अधिक सुलभतेकडे व पारदर्शकतेकडे पावले उचलत असल्याचे सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी या योजनेचा हेतू गावकऱ्यांना पटवून दिला. तंत्रज्ञान ही काळाची गरज लक्षात घेता ईपीडीएस कॅशलेस तसेच एफपीएस बाबत जनसमुदायमध्ये जनजागृती होणे व या योजनेचा हेतू साध्य होणे हा आहे. याबाबत नांदेड जिल्हा सक्रीय झाला असून ही तंत्रज्ञानाची यशस्वी वाटचाल  नांदेड जिल्ह्याची सुरु झाल्याचे नमूद केले.
आयडीएफसी बँकचे स्टेट मॅनेजर सचिन पेटकर यांनी नवीन तंत्रज्ञानाचा किती फायदा आहे किती पारदर्शक हेतू आहे हे पटवून दिले. या मायक्रो एटीएमद्वारे आपण कोठेही 5 मिनीटांच्या आत आपले बँक खाते सुरु करू शकतो, तसेच रक्कम अन्य खात्यावर पाठवू शकतो, ठेव, तसेच ठेव-रक्कम काढून घेण्याची इत्यादी सुविधाही आता उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
0000000


तंबाखु सेवनाच्या सवयीपासून दूर
 राहण्याचा संकल्प करावा - डॉ. गुंटूरकर
नांदेड दि. 8 :- तंबाखुचे व्यसन ही एक वाईट सवय आहे. तंबाखुचे सेवन करणे हे स्वत:सह इतरांच्या आजारासाठीही खूप घातक आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने तंबाखूसारख्या निकोटीनयुक्त पदार्थाचे सेवन करू नये. अशा वाईट सवयीपासून दूर राहण्याचा संकल्प करावा, असे आवाहन  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी केले.
कर्करोग दिन व पंधरवाडा 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017  या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज श्री गुरुगोबिंदसिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयातील सर्जिकल हॉल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर हे बोलत होते.
डॉ. गुंटूरकर पुढे म्हणाले की , तंबाखू या निकोटीन युक्त पदार्थाचे सेवन हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे. भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे जवळपास दहा लक्ष व्यक्तीचा मृत्यु होतो. त्याचबरोबर नवीन पिढी मोठ्या प्रमाणात याच्या आहारी गेल्याचे दिसून येते असे सांगितले. त्यामुळे तंबाखुच्या कोणत्याही प्रकारच्या सेवनामुळे केवळ कर्करोग हा एकमेव आजार कारणीभूत  नाही. त्यापासून हृदयरोग, फुफुसाचे आजार, पोटाचे विकार अशा विविध आजार उद्भवण्याची  शक्यता असते.
कार्यक्रमास डॉ. डी. एन.हजारी, डॉ. सौ. लातूरकर डॉ.एच.के. साखरे डॉ.रोशनी चव्हाण (दंतशल्यचिकित्सक) डॉ.पवार, डॉ.बोरसे आदी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थी सहभागी होते.

0000000

Tuesday, February 7, 2017

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 361 ,
पंचायत समितीसाठी 597 उमेदवार रिंगणात
 दोन जि.प.गट, एक पं.स.गणातील उमेदवार अपीलाच्या निर्णयानंतर  

नांदेड दि. 7 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद गटासाठी 361 व पंचायत समिती गणासाठी 597 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याचे स्पष्ट झाले. या उमेदवारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून चिन्हांचेही वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भोकर तालुक्यातील पिंपळढव गट, नायगाव तालुक्यातील मांजरम गट आणि पंचायत समिती निवडणुकीत नांदेड तालुक्यातील रहाटी बु. गणातील अपीलावरील निकालानंतर अंतिम उमेदवारांची नावे निश्चित होणे अपेक्षीत आहे.
आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर तालुकानिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांच्यासाठी निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. सुरुवातीला जिल्हा परिषद गटातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांची तालुकानिहाय संख्या (कंसात वैध उमेदवार व माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या ) पुढील प्रमाणे -  माहूर- (24-14) रिंगणातील उमेदवार-10, किनवट- (74-26) 48 , हिमायतनगर – (40-27) 13. हदगाव- (103-58) 45, अर्धापूर- (23-11) 12, नांदेड- (69-35) 34 , मुदखेड- (13-6) 7, भोकर- (45) ( पिंपळढव गटातील 22 वगळता 23-14) 9, उमरी- (13-04) 9, धर्माबाद- (21-9) 12, बिलोली- (62-36) 26, नायगाव-  (45) (मांजरम गटातील 11  वगळता 34-19) 15, लोहा- (45-17) 28, कंधार- (45-16) 29, मुखेड- (57-24) 33, देगलूर- (53-22) 31. अशारितीने जिल्हा परिषद गटासाठी एकूण वैध उमेदवार 732 होते. त्यापैकी पिंपळढव गटातील 22 व मांजरम गटातील 11 उमेदवारांबाबतची बाब वगळता जिल्ह्यात 60 गटासाठी एकूण 361 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहे.
पंचायत समिती गण निवडणूक रिंगणातील उमेदवारांची तालुकानिहाय संख्या (कंसात वैध उमेदवार व माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या ) पुढील प्रमाणे- माहूर- (42-18) रिंगणातील उमेदवार-24, किनवट- (120-47) 73 , हिमायतनगर – (36-20) 16. हदगाव- (104-50) 54, अर्धापूर- (32-12) 20, नांदेड- (74) ( रहाटी बु. गणातील 11 वगळता 63-26) 37 , मुदखेड- (28-11) 17, भोकर- (61-30) 31, उमरी- (35-13) 22, धर्माबाद- (31-11) 20, बिलोली- (60-24) 36, नायगाव- (75-36) 39, लोहा- (79-22) 57, कंधार- (81-25) 56, मुखेड- (85-29) 56, देगलूर- (70-31) 39. अशारितीने पंचायत समिती गणासाठी एकूण वैध उमेदवार 1 हजार 13 होते. त्यापैकी रहाटी बु. गणातील 11 उमेदवारांबाबतची बाब वगळता जिल्ह्यात 125 गणांसाठी एकूण 597 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
निवडणुकीसाठीच्या मतदान केंद्राची यादी शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे.                    

0000000

Monday, February 6, 2017

अर्थशास्त्रावरील कोळंबे यांच्या
व्याख्यानास उत्स्फुर्त प्रतिसाद 
नांदेड, दि. 6 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय अ‍धिकारी यांच्यावतीने “उज्ज्वल” नांदेड माहिमेअतंर्गत रविवार 5 फेब्रुवारी 2017 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे असे पुणे येथील अर्थशास्त्राचे व्याख्याते रजंन कोळंबे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या व्याख्यानासाठी होतकरु विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली.

व्याख्यानात श्री. कोळंबे यांनी स्पर्धा परीक्षेमधील अर्थशास्त्राचे महत्व या विषयातील महत्वाच्या अभ्यासाच्याबाबी, परीक्षेतील प्रश्नांचे स्वरुप, उत्तराची पध्दत व एकूणच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी अभ्यासाची तयारी याविषयीही मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. ते म्हणाले की,  विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करताना कोणताही मनात न्यूनगंड न बाळगता सक्षमपणे परीक्षांना सामोरे जावे. प्रशासन विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा पुर‍विण्यासाठी कटीबद्ध आहे.
व्याख्याते रंजन कोळंबे व त्यांच्या पत्नी पूनम कोळंबे यांचे ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले. राज्यातून प्रथम क्रमांकाने सहायक कक्ष अधिकारी या पदासाठी निवड झालेल्या अश्विनी अर्जूनराव पोतलवार यांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. सभागृह तुंडुब भरल्यानंतर सभागृहा बाहेर एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक विद्यार्थी झाडाखाली, जिकडे जागा मिळेल तिकडे मैदानामध्ये उभे राहून, बसून  व्याख्यान ऐकत होते. मनपाच्या सहायक आयुक्त माधवी मारकड, उमरी-धर्माबादच्या मुख्याधिकारी अंधारे, नायगावच्या मुख्याधिकारी टोंगे यांच्यासह इतरही अधिकारी ज्यांना कोळंबे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे तेही आवर्जून उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन व आभार  जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीना सोलापूरे, आरती कोकूलवार, संजय कर्वे, प्रताप सुर्यंवशी, अजय वटमवार, कोंडिबा गाडेवाड, विठ्ठल यनगुलवार, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, शहादत्त पुयड, अभीजीत पवार, नितीन कसबे, सतपाल सिंग, लक्ष्मण सेनेवाड, ज्ञानेश्वर सेनेवाड, सोपान यनगुलवार आदींने सहकार्य केले.

000000 

वृत्त क्रमांक विशेष लोकअदालतीचे 21 नोव्हेंबरला आयोजन •प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याची संधी; पक्षकारांनी लाभ घेण्याचे...