Sunday, August 14, 2022

 फाळणीतील वेदना अधोरेखित

करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

 

·  15 ऑगस्टपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- देशाच्या फाळणीमुळे लाखो लोकांनी झेललेले दु:ख, यातना या न विसरता येणाऱ्या आहेत. अनेकांनी यात बलिदान दिले. त्या ज्ञात-अज्ञात सर्व व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ आज 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळण्यात आला. फाळणीतील महत्वपूर्ण घटनांचे छायाचित्र व त्यासंदर्भातील माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी या उद्देशाने खास तयार करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ आज करण्यात आला.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसपत्नी व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनीचे प्रातिनिधीक उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस पत्नी सुमन त्रिंबकराव कुलकर्णी, सिंधुबाई गगनराव देशमूख, कस्तुराबाई श्रीकिशन पारीख, यमुनाबाई मारोती कुरुडे, सुंदराबाई मारोतराव देशमुख, प्रभावती दत्तात्रय टेळकीकर, साधनाबाई रामराव पांडे, कुमुदिनी राहेगावकर, प्रेमलाबाई रामराव अंबुलगेकर यांना शाल श्रीफळ देवून गौरव केला. हे प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000


 








 नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न 

·   5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली

·8 कोटी 82 लाख 19 हजार 691 रक्कमेतील विविध प्रकरणात तडजोड    


नांदेड (जिमाका) दि. 14  :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात एकुण   5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 8 कोटी 82 लाख 19 हजार 691 एवढ्या रक्कमेबाबत विविध प्रकरणात तडजोड झाली.  

 

या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये इंदिराबाई वय 100 वर्ष यांचे तीन पिढींपासून वाटणी संबंधी प्रलंबीत असलेल्या दाव्यात आपसी सामोपचाराने समझोता होवून सदर प्रकरणाचा निराकरण करण्यात आला. हा दावा श्रीमती के.पी. जैन, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड यांच्या पॅनलवर ठेवण्यात आला होता. त्यात त्यांनी संबंधीतांचा समझोता घडवून आणून प्रकरण निकाली काढले.

 

विविध प्रकरणात दिवाणी, फौजदारी, एन.आय. अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, ग्राहक तक्रार मंच यांच्या प्रकरणांचा व महसूल विभागाचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रकरणे व रमाई आवास योजना अंतर्गत प्रकरणे, विविध बँकांचे प्रकरणे, एम.एस.ई.बी. विद्युत प्रकरणे, बी.एस.एन.एल. यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत ल. आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती डी.एम. जज यांनी विशेष प्रयत्न केले.

 

ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकील सदस्य, तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे सुध्दा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअतंर्गत 1 हजार 819 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, विविध बॅंकांचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसुल विभाग अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी लोकअदालत यशस्वी झाल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव  श्रीमती डी. एम. जज, तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले. विशेष म्हणजे सदर लोकअदालतमध्ये सहभागी पक्षकार, विधीज्ञ, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी इत्यादीसाठी गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील बाबा बलविंदर सिंहजी यांच्याकडून लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीमती डी. एम. जज यांनी लंगर साहिब गुरुद्वारा व राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी ज्यांनीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. यापुढेही असेच सहकार्य सर्वांकडून मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

00000

 मंत्री संजय राठोड यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय राठोड हे 15 व 16 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

सोमवार 15 ऑगस्ट 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पहूर येथून सांय. 7.30 वा. बोथतांडा ता. किनवट येथे आगमन व मुक्काम (राखीव). मंगळवार 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 वा. बोथतांडा येथून शासकीय वाहनाने यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000

Saturday, August 13, 2022

 कोलामपोड येथे नागूबाई जेव्हा

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत  तिरंगा फडकवितात !

तेलंगणाच्या सीमेवर आदिवासी पाड्यामध्ये घरोघरी तिरंगाचा उत्सव

नांदेड (जिमाका) दि. 13 :- तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या  किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर आज "घरोघरी तिरंगा" चा अभिनव शुभारंभ करण्यात आला. चारी बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले. 

अवघ्या १५ उबंरठयाच्या कोलामपोड येथील या उत्सवाला साक्षीदार होण्यासाठी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, गटविकास अधिकारी सुभाष धनवे आदी उपस्थित होते.

गावातील जेष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम ही महिला गावातील इतर महिला समवेत आपल्या दाराला तिरंगा लावण्यासाठी सज्ज झाली. सडे आणि रांगोळीने सजलेल्या खांबाला तीने तिरंगा लावून देश प्रेमाची एक नवी ऊर्जा दिली. "या देशाची आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे. याचा सर्वांना आम्हाला अभिमान आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व देशाप्रती कृतज्ञता म्हणून आम्हाला हा तिरंगा उत्सव साजरा करताना विशेष आनंद असल्याच्या भावना" नागुबाईने आपल्या तोडक्या भाषेत सांगितल्या. 

किनवट येथील आदिवासी विकास प्रकल्प मार्फत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा हा उपक्रम प्रत्येक पाड्यावर साजरा होण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन केले. प्रकल्पातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः एकेक पाडा निवडून त्या ठिकाणी आदिवासी बांधवांसमवेत घरोघरी तिरंगा उत्सव साजरा केल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच पूजार यांनी दिली.

यावेळी मान्यवरांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गावातून, विविध पाडयामधून विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून अवघा परिसर देशभक्तीमय केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगवान बिरसा मुंडा, शामादादा कोलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.

लिंबगुडा येथील रहिवाशी व शासकीय आश्रमशाळा तलाईगुडा येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदिम कोलाम समाजातील जयश्री भीमराव पुरके ही जवाहर नवोदय विद्यालयात प्रविष्ठ झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा येथील विद्यार्थिनी व तलाईगुडा येथील युवकांनी आदिवासी ढेमसा नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी ग्रामस्थ राजाराम मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी आभार मानले. याप्रसंगी बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, महाजन अर्जून टेकाम, गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी आदिवासी निरीक्षक स्मिता पहुरकर, संदीप कदम, केंद्र प्रमुख प्रतापसिंग राठोड, मुख्याध्यापक सचिन चव्हाण, जी. व्ही. चव्हाण, शंकर नागोशे , हमीद सय्यद , विनोद जक्कीलवाड, अभि. सचिन येरेकर, विस्तार अधिकारी एस.आर. शिंदे आदींची उपस्थिती होती.

00000






फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयात चित्र प्रदर्शनाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- “फाळणी दु:खद स्मृती दिन” हा 14 ऑगस्ट 2022 रोजी पाळण्यात येत आहे. या दिनावर आधारित चित्र प्रदर्शन, घडामोडींचे आयोजन रविवार 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर माहिती http://amritmahotsav.nic.in/partition-horror-remembrance-day.htm या वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

 

दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या देशाच्या फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या मरण यातना, मन:स्ताप आणि दु:ख भोगावे लागले त्याची कल्पना देशातील सर्व नागरिकांना व्हावी यादृष्टीने फाळणी दु:खद स्मृती दिनावर आधारित चित्र प्रदर्शन, घडामोडींचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनास सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, निमंत्रित, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, पत्रकार आणि कर्मचारी, आदींची  उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास व प्रदर्शनास  सर्व संबंधितांनी भेट देऊन पाहणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.  

000000

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित

फ्रीडम वाल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतीय  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित फ्रीडम वॉल या स्पर्धेस शाळा व महाविद्यालये यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

ही स्पर्धा कृषीतंत्र महाविद्यालय यांच्या संरक्षक भिंतीवर आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, हर घर तिरंगा व स्वातंत्र्य चळवळीतील घटना, नेते व देशभक्तीपर चित्रे काढण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. अशा आशयाची एकूण 16 सुंदर आकर्षक चित्रे या भिंतीवर काढण्यात आली व भिंत ही आजादी का अमृत महोत्सवाची साक्षीदार बनली.


या स्पर्धेत प्रथम क्रमांक ललीत कला अकादमी नांदेड चित्रकला शिक्षक यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक किड्स किंग्डम यांना तर तृतीय क्रमांक नागार्जुन पब्लिक स्कूल यांना मिळाला.

00000

 भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे  

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या कालावधीत नोंदणीकृत सर्व दुकाने, आस्थापनांनी राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी प्रेरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दुकाने, व्यापारी संकुल व सर्व आस्थापनांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अनवर सय्यद यांनी केले आहे.

 

राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या किंवा पॉलीस्टर, सिल्क, खादीपासून तयार केलेल्या कापडाचे असावेत. हा उपक्रम राबवतांना भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे. जाणते, अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्व दुकान, आस्थापना मालकांनी घ्यावी, असेही सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...