Sunday, August 14, 2022

 नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न 

·   5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली

·8 कोटी 82 लाख 19 हजार 691 रक्कमेतील विविध प्रकरणात तडजोड    


नांदेड (जिमाका) दि. 14  :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात एकुण   5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 8 कोटी 82 लाख 19 हजार 691 एवढ्या रक्कमेबाबत विविध प्रकरणात तडजोड झाली.  

 

या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये इंदिराबाई वय 100 वर्ष यांचे तीन पिढींपासून वाटणी संबंधी प्रलंबीत असलेल्या दाव्यात आपसी सामोपचाराने समझोता होवून सदर प्रकरणाचा निराकरण करण्यात आला. हा दावा श्रीमती के.पी. जैन, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड यांच्या पॅनलवर ठेवण्यात आला होता. त्यात त्यांनी संबंधीतांचा समझोता घडवून आणून प्रकरण निकाली काढले.

 

विविध प्रकरणात दिवाणी, फौजदारी, एन.आय. अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, ग्राहक तक्रार मंच यांच्या प्रकरणांचा व महसूल विभागाचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रकरणे व रमाई आवास योजना अंतर्गत प्रकरणे, विविध बँकांचे प्रकरणे, एम.एस.ई.बी. विद्युत प्रकरणे, बी.एस.एन.एल. यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत ल. आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती डी.एम. जज यांनी विशेष प्रयत्न केले.

 

ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकील सदस्य, तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे सुध्दा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअतंर्गत 1 हजार 819 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, विविध बॅंकांचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसुल विभाग अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी लोकअदालत यशस्वी झाल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव  श्रीमती डी. एम. जज, तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले. विशेष म्हणजे सदर लोकअदालतमध्ये सहभागी पक्षकार, विधीज्ञ, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी इत्यादीसाठी गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील बाबा बलविंदर सिंहजी यांच्याकडून लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीमती डी. एम. जज यांनी लंगर साहिब गुरुद्वारा व राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी ज्यांनीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. यापुढेही असेच सहकार्य सर्वांकडून मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

00000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...