Tuesday, July 30, 2019

सुधारणा/अभिप्राय/मत/सूचना कळविण्याचे आवाहन महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय



नांदेड, दि. 30 : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात आला असल्याचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी कळविले आहे.
            या नियमामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री  अनुदाने यासाठी मान्यता) नियम, 1970, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहायक अनुदानासाठी मान्यता देणे) नियम, 1971, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपध्दती) नियम, 1973, महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थांची ग्रंथालये)सहायक अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम, 1974 याचा समावेश आहे.
ग्रंथालय चळवळीशी संबंधित लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक, वाचक व सभासद, शैक्षणिक ग्रंथपाल, ग्रंथालय व्यावसायिक, संस्था, लोकप्रतिनिधी, महिला, महाविद्यालय/ विद्यापीठीय ग्रंथालय व माहितीशास्त्राचे प्राध्यापक, संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, प्रस्तावित अधिनियम व नियमांमध्ये सुधारणा/बदल सुचवावेत. बदल/ सुधारणा सांगताना त्याचे बाबनिहाय सकारण समर्थन करणे आवश्यक आहे. सुधारणा/अभिप्राय/मत/सूचना याबाबत पत्रव्यवहार समक्ष/टपाल/ईमेलदवारे ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांनी 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावा.याबाबतचा संपूर्ण तपशील ग्रंथालय संचालनालयाच्या WWW.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
००००


जप्‍त रेती साठ्याचा आज लिलाव



नांदेड दि. 30 :- विनापरवानगी अनाधिकृत रेती साठा नांदेड तालुक्‍यात केल्‍याचे निदर्शनास आले असून हा रेती साठा जप्‍त करुन त्‍याची ईटीएस मोजणी करण्‍यात आली आहे. या रेती साठयाच्या लिलावाची पहिली व दुसरी फेरी नांदेड उपविभागीय अधिकारी यांच्‍या अधिपत्‍याखाली 31 जुलै 2019  रोजी सकाळी 11 वा. नांदेड तहसिल कार्यालय येथे घेण्‍यात येणार आहे.   
नांदेड तालुक्यातील हा रेती साठा पुढील ठिकाणी उपलब्ध असून पहिल्या फेरीतील रेती साठ्याचे ठिकाण व गाव (कंसात ईटीएस मोजणी अंती जप्त रेती साठा) मौ. नागापूर (966 ब्रास), मौ. वांगी (125 ब्रास), मौ. सिद्धनाथ (326 ब्रास), दुसरी फेरी मौ. भनगी (1261 ब्रास), मौ.  गंगाबेट (730 ब्रास), मौ. नाळेश्‍वर (191 ब्रास) एकूण (3599 ब्रास). या ठिकाणी रेती साठा गट नंबर निहाय असून स्‍थळाचे ठिकाण असलेला साठा तपासुनच बोलीत भाग घ्‍यावा. अटी शर्तीबाबत अधिक माहिती नांदेड तहसिल कार्यालयाचे गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेल, असे तहसिलदार नांदेड यांनी कळविले आहे.
00000

Monday, July 29, 2019


विशेष तपासणी मोहिमेत
29 दोषी वाहनांवर कार्यवाही
नांदेड दि. 29 :-  जिल्ह्यात मोटार वाहन विभागामार्फत खाजगी प्रवासी बस वाहतूकी विरुद्ध विशेष तपासणी मोहिम 21 ते 27 जुलै कालावधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत 97 बसेसची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 29 दोषी वाहनांवर कार्यवाही करुन एक बस अटकाविण्यात आली आहे. तसेच टपावरुन पार्सल वाहतूक करणाऱ्या 5 बसेसवर कार्यवाही करण्यात आली.
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांच्या मदतीने वायुवेग पथकात कार्यरत मोटार वाहन निरीक्षक विनोद सुदंराणी, सहा. मोटार वाहन निरीक्षक संजय पल्लेवाड, किरण लोणे यांनीही मोहिम राबविली. ही तपासणी मोहिम अधीक प्रभावीपणे सुरु राहणार असून मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता बसधारकांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान, बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन



नांदेड, दि. 29 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेंतर्गत 20 लाभार्थी व बीजभांडवल योजनेंतर्गत 11 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर तळमजला, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील.
या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत पुढील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपसिथत राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसिलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. अनुदान न घेतल्याबाबत शंभर रुपयाच्या बॉडवर प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) एच. डी. गतखणे यांनी केले आहे.
00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 9.84 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात  सोमवार 29 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 9.84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 157.44 पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 242.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 25.45 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 29 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 5.25 (226.78), मुदखेड- 11.00 (295.01), अर्धापूर- 3.33 (221.31), भोकर- 11.50 (251.45), उमरी- 8.33 (260.77), कंधार- 7.50 (223.83), लोहा- 5.00 (199.20), किनवट- 17.71 (286.53), माहूर- 11.25 (298.84), हदगाव- 9.29 (225.14), हिमायतनगर- 17.67 (245.69), देगलूर- 12.00 (153.15), बिलोली- 11.00 (302.00), धर्माबाद- 14.67 (218.66), नायगाव- 4.80 (261.60), मुखेड- 7.14 (206.27). आज अखेर पावसाची सरासरी 242.26 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3876.23) मिलीमीटर आहे.
00000

Saturday, July 27, 2019


उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान
कृषि यांत्रिकीकरणांतर्गत कंधार येथे
1 हजार 89 अर्जांची लॉटरी पद्धतीने सोडत
नांदेड, दि. 27 :-   कंधार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कंधार तहसिल कार्यालय परीसरात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान  कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलीत औजारे, इलेक्ट्रिक पंप, प्लॅस्टिक / एचडीईपी पाईप या बाबींसाठी प्राप्त 1 हजार 89 अर्जांची लॉटरी पद्धतीने सोडत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 27 जुलै रोजी काढण्यात आली.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड रविशंकर चलवदे, उपविभागीय अधिकारी कंधार बोरगांवकर, तहसिलदार कंधार मांडवगडे, उपनगराध्यक्ष जफरोद्दीन, पदाधिकारी, पत्रकार ,तालुका कृषी अधिकारी कंधार रमेश देशमुख. विश्वांभर मंगनाळे, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
खासदार चिखलीकर यांनी कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करुन तालुक्यासह जिल्ह्यातील विविध उपक्रमांना निधीची कमतरता पडणार नाही. केंद्राच्या माध्यमातून येत्या काळात रेल्वेसह दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केली जातील, असे सांगितले.
          जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चलवदे यांनी मार्गदर्शन करताना, कृषी विभागाच्या अनेक योजना या केंद्र पुरस्कृत असून खासदार महोदयांच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमासह चालू योजनांना निधीची उपलब्धता होईल, अशी आशा व्यक्त केली. कृषी विभागाच्या विविध उपक्रमांना खासदार महोदयांच्या प्रयत्नांनी योजना मार्गी लागल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जलयुक्त शिवार, पीक विमा, मागेल त्याला शेततळे, वेदर फोरकास्ट अॅप यासह कृषि विभागाच्या विविध योजना, अडचणी याविषयी सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी कंधार रमेश देशमुख यांनी खरीप पीकाची पेरणी, पर्जन्यमान, पीक परिस्थिती, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत 55 लाखांचे, ठिबक सिंचन 1.72 कोटी, शेततळे यासाठी 1.08 कोटीचे थेट अनुदान शेतकऱ्यांना पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आल्याचे सांगितले.
          तहसिलदार मांडवगडे व उपविभागीय अधिकारी बोरगांवकर यांनी पीएम किसान, जलयुक्त शिवार यासह विविध योजनांबाबत माहिती दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पेरणी यंत्राचे वितरण, जमीन आरोग्य पत्रिका वितरण, शेतकरी मासिक वितरण ,वृक्ष रोपांचे वितरण,तर महसूल विभागाच्यावतीने गॅस जोडणी वितरण करण्यात आले. सुत्रसंचलन कृषी पर्यवेक्षक आर. एम. भुरे यांनी तर आभार कृषी सहाय्यक संभाजी वडजे यांनी मानले.
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 13.87 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात  रविवार 28 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 221.98 पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 232.42 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 24.44 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 28 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 9.38 (221.53), मुदखेड- 14.67 (284.01), अर्धापूर- 3.67 (217.98), भोकर- 9.25 (239.95), उमरी- 12.33 (252.44), कंधार- 10.83 (216.33), लोहा- 15.83 (194.20), किनवट- 29.29 (268.82), माहूर- 30.50 (287.59), हदगाव- 13.29 (215.85), हिमायतनगर- 18.67 (228.02), देगलूर- 2.00 (141.15), बिलोली- 13.60 (291.00), धर्माबाद- 20.67 (203.99), नायगाव- 15.00 (256.80), मुखेड- 3.00 (199.13). आज अखेर पावसाची सरासरी 232.42 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3718.79) मिलीमीटर आहे.
00000

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...