Saturday, July 27, 2019


उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान
कृषि यांत्रिकीकरणांतर्गत कंधार येथे
1 हजार 89 अर्जांची लॉटरी पद्धतीने सोडत
नांदेड, दि. 27 :-   कंधार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कंधार तहसिल कार्यालय परीसरात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान  कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलीत औजारे, इलेक्ट्रिक पंप, प्लॅस्टिक / एचडीईपी पाईप या बाबींसाठी प्राप्त 1 हजार 89 अर्जांची लॉटरी पद्धतीने सोडत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 27 जुलै रोजी काढण्यात आली.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड रविशंकर चलवदे, उपविभागीय अधिकारी कंधार बोरगांवकर, तहसिलदार कंधार मांडवगडे, उपनगराध्यक्ष जफरोद्दीन, पदाधिकारी, पत्रकार ,तालुका कृषी अधिकारी कंधार रमेश देशमुख. विश्वांभर मंगनाळे, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
खासदार चिखलीकर यांनी कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करुन तालुक्यासह जिल्ह्यातील विविध उपक्रमांना निधीची कमतरता पडणार नाही. केंद्राच्या माध्यमातून येत्या काळात रेल्वेसह दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केली जातील, असे सांगितले.
          जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चलवदे यांनी मार्गदर्शन करताना, कृषी विभागाच्या अनेक योजना या केंद्र पुरस्कृत असून खासदार महोदयांच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमासह चालू योजनांना निधीची उपलब्धता होईल, अशी आशा व्यक्त केली. कृषी विभागाच्या विविध उपक्रमांना खासदार महोदयांच्या प्रयत्नांनी योजना मार्गी लागल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जलयुक्त शिवार, पीक विमा, मागेल त्याला शेततळे, वेदर फोरकास्ट अॅप यासह कृषि विभागाच्या विविध योजना, अडचणी याविषयी सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी कंधार रमेश देशमुख यांनी खरीप पीकाची पेरणी, पर्जन्यमान, पीक परिस्थिती, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत 55 लाखांचे, ठिबक सिंचन 1.72 कोटी, शेततळे यासाठी 1.08 कोटीचे थेट अनुदान शेतकऱ्यांना पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आल्याचे सांगितले.
          तहसिलदार मांडवगडे व उपविभागीय अधिकारी बोरगांवकर यांनी पीएम किसान, जलयुक्त शिवार यासह विविध योजनांबाबत माहिती दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पेरणी यंत्राचे वितरण, जमीन आरोग्य पत्रिका वितरण, शेतकरी मासिक वितरण ,वृक्ष रोपांचे वितरण,तर महसूल विभागाच्यावतीने गॅस जोडणी वितरण करण्यात आले. सुत्रसंचलन कृषी पर्यवेक्षक आर. एम. भुरे यांनी तर आभार कृषी सहाय्यक संभाजी वडजे यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...