Tuesday, November 3, 2026

वृत्त क्रमांक

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा व पाणी व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करा

• जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे यांची मुदखेड तालुक्यातील गोशाळेस भेट ; 

    पशुधन संगोपन व्यवस्थेची पाहणी

नांदेड, दि. 03 : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी उपलब्ध चारा व पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच पशुधनास संतुलित आहार देऊन त्यांचे आरोग्य व स्वच्छता राखण्याची दक्षता घ्यावी, असे मार्गदर्शन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी केले.

मुदखेड तालुक्यातील मौजे कोल्हा येथील प्रियदर्शनी मागासवर्गीय विकास महिला मंडळ (रजि.) संचलित श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्पास आज दि. 3 नोव्हेंबर रोजी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन गोशाळेतील पशुधन संगोपन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी गोशाळेतील पशुधनाची सद्यस्थिती, उपलब्ध हिरवा व सुका चारा, चारा साठवणूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच दैनंदिन संगोपन व्यवस्थेची माहिती घेण्यात आली.

यावेळी सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रविणकुमार घुले आणि पशुवैद्यकीय अधिकारी, नेरली डॉ. साईनाथ पवार उपस्थित होते. पाहणीदरम्यान उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर, चाऱ्याचे योग्य नियोजन, पशुधनास संतुलित आहाराचा पुरवठा तसेच पशुधनाचे आरोग्य व गोशाळेतील स्वच्छता राखण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

***






No comments:

Post a Comment

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा द्विशताब्दी जयंती वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200