Tuesday, September 12, 2017

"महाराष्ट्र वार्षिकी" संदर्भ ग्रंथ
सर्वांसाठी उपयुक्त ठरेल
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 12 :- शासनाच्या विविध योजना, विभाग, मंत्रीमंडळ निर्णय, महाराष्ट्राचा इतिहास, भुगोल, परंपरा, कलासंस्कृती महत्वाच्या घडामोडी यासारखी महत्वाची माहिती "महाराष्ट्र वार्षिकी 2017" या ग्रंथातून मिळणार आहे. म्हणून हा संदर्भ ग्रंथ सर्वांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रसिद्ध केलेला "महाराष्ट्र वार्षिकी 2017" या ग्रंथाची प्रत जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी आज जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना भेट म्हणून दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनाही या ग्रंथाची प्रत देण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले  हे उपस्थित होते.
महाराष्ट्राची ऐतिहासिक व सांख्यिकी माहितीसह जिल्ह्यांच्या माहितीचाही या ग्रंथात समावेश केलेला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेला हा संदर्भ ग्रंथ अभ्यासक, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व नागरीकांना उपयुक्त ठरणार आहे, असे अशोक शिनगारे यांनी सांगितले.  
या संदर्भ ग्रंथात महाराष्ट्राची भुमी आणि लोक, शासनाचे विभाग, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्ट्राची परंपरा, राज्यातील जिल्हे, गत वर्षातील राज्य शासनाच्या संदर्भात महत्वाच्या घडमोडी, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्ट्र विधीमंडळ सदस्य, संसद सदस्य, दृष्टीक्षेपात महाराष्ट्र, आदी महितीचा समावेश आहे. या ग्रंथाची किंमत 300 रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे हा ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहे.   
00000


Monday, September 11, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 11 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 12 सप्टेंबर 2017 रोजी पेन्‍शन अदालत आयोजीत करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्‍त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अडचणी निवारण्‍यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्‍यात आले आहे.

000000
राज्य निवडणूक आयुक्त
जे. एस. सहारिया यांचा दौरा
नांदेड दि. 11 :- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया हे नांदेड येथे येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 13 सप्टेंबर 2017 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड येथे आगमन. सकाळी 11 वा. नांदेड येथे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व नोडल ऑफीसर, निवडणूक अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व आयकर अधिकारी यांच्या समवेत बैठक. ग्रामपंचायत निवडणुक आढावा बैठक. नांदेड येथे मुक्काम. गुरुवार 14 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.50 वा. नांदेड येथुन वाशिमकडे प्रयाण करतील.

00000
ग्रामपंचायत मतदान, मतमोजणी
केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड दि. 11 :-  किनवट तालुक्यातील जरुरी, भिमपूरी / सिरमेटी, मारेगाव वरचे, पिंपरफोडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने मतदानाच्या दिवशी शनिवार 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान केंद्र परिसरात व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 25 सप्टेंबर रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.   
 या ग्रामपंचायतीच्या मतदान व मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. किनवट तालुक्यातील जरुरी, भिमपूरी/सिरमेटी, मारेगाव वरचे, पिंपरफोडी या ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत शनिवार 23 सप्टेंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत सोमवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

00000
ग्रामपंचायत मतदानासाठी
स्थानिक सुट्टी जाहीर  
नांदेड दि. 11 :- किनवट तालुक्यातील भिमपूर / सिरमेटी, जरुर, मारेगाव (व), पिपरफोडी येथील ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक व रिक्त पदाच्या पोट निवडणुकीसाठी शनिवार 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी या मर्यादीत क्षेत्रापुरती शनिवार 23 सप्टेंबर 2017 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

0000
शिल्पनिदेशक पदासाठी
18 सप्टेंबर रोजी मुलाखत
नांदेड दि. 11 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे शिल्प कारागीर योजनेंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर तत्वाभ्यास (थेअरी) व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी भरावयाची आहे. इच्छुक पात्र उमेदवारानी मुलाखतीसाठी मुळ व छायांकीत कागदपत्रासह सोमवार 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.  
जोडारी, कातारी, घर्षक, मशिनिष्ट, साचेकार, वेल्डर, एम्प्लायबिलिटी स्किल्स, कटींग ॲन्ड सुईग, मेसन, टीडीएम, वायरमन, गणित निदेशक, ड्राफ्टसमन (सिव्हील / मेकॅनिक), यांत्रिक मोटार गाडी (एमएमव्ही), ट्रॅक्टर मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅ., आर्किटेक्चरल असिस्टंट या व्यवसायासाठी उमेदवार हा मेकॅनिकल, इलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रीकल, सिव्हील अभियांत्रिकी मधील किमान द्वितीय श्रेणीमध्ये पदवी किंवा पदविका उत्तीर्ण आसावा. त्यानंतरचा एक, दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व त्यानंतरचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच शिल्पनिदेशक एम्प्लायबिलिटी स्किल्स या पदासाठी एमबीए, बीबीए ही पदवी असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000

Saturday, September 9, 2017

राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध प्रकरणात  
5 कोटी 10 लाख 79 हजार रुपयांची तडजोड ;
773 प्रकरणे सामोपचाराने निकाली
नांदेड दि. 10 :-  राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यात विविध प्रकरणात 5 कोटी 10 लाख 79 हजार 309 रुपये इतक्या रकमेबाबत तडजोड झाली असुन 773 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली आहेत. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., मोटार वाहन अपघात, भुसंपादन, आदी तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय,विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणाच्या दाखल पूर्व प्रकरणांचा समावेश होता.
            राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश  एस. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, वकील, न्यायालयीन व्यवस्थापक, पॅनल सदस्य, विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे त्यात्या न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, अॅड. मिलिंद एकताटे, उपाध्यक्ष अॅड.  जगजीन भेदे, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भुसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी, तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. त्याबद्दल जिल्हा न्यायाधीश एस.पी. कुलकर्णी यांनी लोकन्यायालय यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे यांनी यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
000000

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...