Friday, October 10, 2025

 वृत्त क्रमांक  1077

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना शुभारंभाचे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेबाबत केंद्र शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा शुभारंभ शनिवार 11 ऑक्टोबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी सुब्रमण्यम सभागृह  पुसा नवी दिल्ली येथे  सकाळी 10.30 वा. होत आहे. नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती मुख्य सभागृह कै. शंकरावजी चव्हाण नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

जिल्हास्तरीय कार्क्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील कामगिरी करणारे 200 हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले,कृषी कर्जाची उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्र राज्यातील  नांदेड जिल्ह्यांची निवड झालेली आहे.सद्यस्थितीमध्ये राज्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणे, पिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व कडधान्य अभियान या योजनांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार शुभारंभ कार्यक्रम शनिवार 11 ऑक्टोंबर रोजी  सर्व जिल्हा मुख्यालय, कृषी विज्ञान केंद्र, सर्व तालुका मुख्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र, सर्व प्राथमिक सहकारी कृषि पतपुरवठा पतसंस्था (PACS), सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. 

यामध्ये लोकप्रतिनिधी, कृषि व संलग्न विभागातील  अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञ, कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी, नैसर्गिक शेती करीत असलेले शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक  1076

रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटीवर बुधवार 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान-कडधान्य-गहू, हरभरा, पौष्टिक तृणधान्य-रब्बी ज्वारी, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया-करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषि विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेंतर्गत-ज्वारी या घटकांतर्गत रब्बी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी हरभरा 1 हजार 900 हेक्टर, गहू 280 हेक्टर, ज्वारी 2 हजार 510 हेक्टर व  करडई 1 हजार 169 हेक्टर क्षेत्रावर पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 

यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाणांचे बियाणे, खते व एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा अनुदान तत्त्वावर केला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या गटांना एकत्रितपणे शेतीतील उत्कृष्ट पद्धती आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळते. तसेच गटांची निवड 'पहिले येईल त्याला पहिले प्राधान्य' या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकरी गटांनी विहित मुदतीत तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट, संस्था सदस्याकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे दि. 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer /AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकरी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थाना अर्ज करता येईल. 

0000

वृत्त क्रमांक  1075

नांदेड जिल्ह्यात 5 हजार 146 क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्षांक 

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्ये, पौष्टिक तृणधान्ये पिके अंतर्गत 5 हजार 146 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. 

हरभरा पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 5 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 2160 क्विंटल व 10 वर्षा वरील वाणांकरिता 2181 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे.  

रब्बी ज्वारीच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 3 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 100 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 260 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे. 

गहू पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 2 हजार रुपये प्रति क्विंटल वं 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 298 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 147 क्विंटल लक्षांक प्राप्त आहे. 

प्रमाणित बियाणे वितरण या घटकातंर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. वैयक्तिक शेतकरी यांनी संबंधित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ/राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड/ कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड यासंस्थेच्या अधिकृत वितरकांमार्फत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वांवर लाभार्थी निवड करण्यात येत आहे. त्यासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी (Agristack), आधार कार्ड, ७/१२ उतारा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. 

अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच शेतक-यांनी उत्स्फूर्तपणे याबाबीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक  1074

औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- नागरिकांनी खोकला झाल्यावर कफ सिरपची खरेदी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे. 

मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये खोकल्याच्या औषधाचे सेवनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे 3 ऑक्टोबर 2025 व राज्याचे औषध नियंत्रक यांचे 7 ऑक्टोबर 2025 रोजी परिपत्रकानुसार रजिस्टर्ड प्रॅक्ट्रीशनर यांच्या चिठ्ठीवरच औषधांची विक्री करावी अशा सूचना औषध व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 मध्ये सुध्दा औषधांची विक्री नियंत्रित असावी व शेडयूल एच औषधे ही डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसारच रूग्णांना विक्री करावी, असे कायद्यास अभिप्रेत आहे. 

सर्व औषध विक्रेत्यांनी खोकल्याची औषध रजिस्टर्ड प्रॅक्ट्रीशनर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये याची दक्षता घेण्यात यावी. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 अंतर्गत कारवाई घेण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी.  

00000

Thursday, October 9, 2025

 वृत्त क्रमांक  1073

अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,  येथे उत्साहात आयोजन

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर : देशाच्या युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, अजीत पवार आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री  मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

राज्यातील ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमधून या अभ्यासक्रमांची एकाच वेळी सुरुवात करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विश्वकर्मा श्री मारोती पांचाळ आणि श्री सिताराम जहांगीड यांच्या हस्ते आठ अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आयएमसी सदस्य  हर्षद शहा, रामनाथ तप्तेवार, धीरज बिडवे, प्रेमानंद शिंदे,  सहायक आयुक्त  राजपाल कोल्हे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  आर. बी. गणविर, तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकपर भाषणात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  गणविर यांनी अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे प्राचार्य  सचिन सुर्यवंशी यांनी  राज्यसभा सदस्य व माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण यांनी दिलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. आपल्या संदेशात श्री चव्हाण यांनी म्हटले  की, “या अभ्यासक्रमांमुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला बळ मिळेल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डी. ए. पोतदार यांनी केले, तर आभार गटनिदेशक विकास भोसीकर यांनी मानले. कार्यक्रमात संस्था कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांसह सुमारे १५०० जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

—



 वृत्त क्रमांक  1072

प्रत्येकाला आपल्या मराठी बोली भाषेचा अभिमान वाटला पाहिजे - डॉ. पृथ्वीराज तौर

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर : “प्रत्येकाला आपल्या मराठी बोली भाषेचा अभिमान वाटला पाहिजे,” असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भाषा विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने  विविध उपक्रम व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. पुढे बोलताना डॉ. पृथ्वीराज तौर यांनी  विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये भाषेच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “स्पर्धा परीक्षांसाठी शब्दांची निवड आणि भाषेचा अचूक वापर केल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ होते.”

कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील उपयोग आणि तिची अभिव्यक्ती यावर आपले विचार व्यक्त केले. 

मराठी भाषा व तिच्या साहित्यसंपदेचे प्रदर्शन नांदेड जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीत आयोजित करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती प्रतीक्षा तालंगकर यांनी “मराठी भाषा अभिजात कशी ठरली” यावर सविस्तर विवेचन केले.

ज्येष्ठ साहित्यिक बापू दासरी यांनी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि लेखनशैलीतील भूमिका यावर विचार मांडले. त्यांनी रोजनिशी लेखनाचे महत्त्व अधोरेखित करत, भाषा प्रगल्भतेकडे नेणारा मार्ग म्हणून त्याचे उदाहरण दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी आभार मानले. या प्रसंगी  विकास बिरादरी, विधिज्ञ पिंपरखेडे, ज्येष्ठ लेखक लक्ष्मण संगेवार, श्रीमती प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, बाळू पावडे, उत्तम घोरपडे, राजीव पाटील, रघु श्रीरामवार यांच्यासह वाचक, अभ्यासक, विद्यार्थी व विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

---





 वृत्त क्रमांक  1071

पेन्शन अदालत मंगळवारी 

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर : शासनाच्या सूचनेनुसार माहे ऑक्टोबर २०२५ मधील दुसऱ्या मंगळवारी, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पेन्शन अदालात आयोजित करण्यात आली आहे.

सदर अदालातासाठी अधिकारी व कर्मचारी  यांनी सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत हजर राहावे. नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त  अधिकारी व कर्मचार्‍यांनी पेन्शन संबंधित अडचणी, तक्रारी व मागण्या सदर दिवशी हजर राहून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...