वृत्त क्रमांक 1077
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना शुभारंभाचे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण
नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेबाबत केंद्र शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा शुभारंभ शनिवार 11 ऑक्टोबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी सुब्रमण्यम सभागृह पुसा नवी दिल्ली येथे सकाळी 10.30 वा. होत आहे. नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती मुख्य सभागृह कै. शंकरावजी चव्हाण नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय कार्क्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील कामगिरी करणारे 200 हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले,कृषी कर्जाची उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यांची निवड झालेली आहे.सद्यस्थितीमध्ये राज्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणे, पिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व कडधान्य अभियान या योजनांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार शुभारंभ कार्यक्रम शनिवार 11 ऑक्टोंबर रोजी सर्व जिल्हा मुख्यालय, कृषी विज्ञान केंद्र, सर्व तालुका मुख्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र, सर्व प्राथमिक सहकारी कृषि पतपुरवठा पतसंस्था (PACS), सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.
यामध्ये लोकप्रतिनिधी, कृषि व संलग्न विभागातील अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञ, कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी, नैसर्गिक शेती करीत असलेले शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment