Friday, November 3, 2017

पीओएस मशिनद्वारे खत विक्रीस सुरुवात 
नांदेड दि. 2:- दिनांक 01 नोव्हेंबर 2017 पासून खत खरेदी ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात जिल्हयातील 617 खत विक्रेत्यांना पॉईट ऑफ सेल (पीओएस) मशीन देण्यात आल्या असून खत खरेदी करताना शेतकऱ्याच्या बोटाचा ठसा घेऊन आधारकार्ड नंबर नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्याने बिलाची रक्कम अदा करुन खत खरेदी करायचे आहे. त्यानंतर ही नोंद पीओएस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय सर्व्हरवर नोंद होणार आहे. त्यानुसारच खतांवर देण्यात येणारे अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्यांना देण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा दुरुपयोग टाळता येणार असून राज्यात 01 नोव्हेंबर 2017 पासून या पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला आहे.
जिल्हयात 609 e-Pos मशिन कार्यान्वीत झालेली असून त्यापैकी 567 मशिन द्वारे आरंभिचा खत साठा नोंद करण्यात आलेली आहे. नोंद करण्यात आलेल्या मशिनवर एकूण 13264 मे.टन खत साठा शिल्लक दर्शविण्यात आलेला आहे. एकूण 76 टक्के e-Pos मशिन द्वारे खत विक्री चालू आहे.
रासायनिक खतांवर केंद्र शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा दुरुपयोग टाळावा तसेच शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ व्हावा, यासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. किरकोळ खत विक्रेत्यांना तसेच कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पध्दतीने खताची विक्री करताना किंवा शेतकऱ्याने खत खरेदी करताना शेतकऱ्याला आधारकार्ड असणे आवश्यक आहे. कारण पीओएस मशिनवर संबंधीत शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा घेऊन त्याचा आधारकार्ड नंबर नोंद करायचा आहे. त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्याला खताची विक्री होणार आहे.नंतर त्या शेतकऱ्याने खताच्या खरेदीची रक्कम अदा करायची आहे. रासायनिक खत विक्री करीता थेट लाभ हस्तांतरण (DBT) दि.01 नोव्हेंबर 2017 पासून राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी नांदेड, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे अध्यक्षतेखाली  रासायनिक खत उत्पादक प्रतिनिधी, खत विक्रेते यांच्या वेळोवेळी  बैठका घेऊन आढावा घेण्यात आला.   
            नांदेड जिल्हयात दिनांक 31 ऑक्टोबर, 2017 अखेर एकूण 617 e-Pos मशिन मशिनचे वाटप विक्रेत्यांना करण्यात आले असून त्यापैकी 567 e-Pos मशिन कार्यरत झाले रासायनिक खताचा साठा नोंदविण्यात आला आहे. e-Pos मशिन मशिनवर दि.31 ऑक्टोबर, 2017 रोजी सायंकाळ पर्यंत एकूण 13264 मे.टन रासायनिक खताचा साठा नोंदविण्यात आला. अतिरिक्त 428 e-Pos मशिनची मागणी नोंदविण्यात आली होती त्यापैकी 200 e-Pos मशिनचा पुरवठा लवकरच जिल्हयास होणार आहे.  या प्रकल्पाचे नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे तसेच तालुका पंचायत समितीचे सर्व कृषि अधिकारी यांच्या मार्फत मागील 3 दिवासापासून खत विक्रेत्याकडील साठा e-Pos मशिन मध्ये नोंदविण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात आले होते.
तरी शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड दर्शवून रासायनिक खताची खरेदी करावी तसेच हा प्रकल्प जिल्हयात यशस्वीरित्या राबविला जाईल या बाबत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

**** 
चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत
नांदेडचा पारस यादव हा आयकॉन ठरला
नांदेड दि. 2:- नांदेड येथे संपन्न झालेल्या चौथ्या मास्टर्स राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करित नांदेडचा जलतरण पट्टू पारस यादव याने 50 मी. फ्रिस्टाईल याबाबीचे अंतर 27 पूर्ण करुन सुवर्ण पदक प्राप्त केले . व 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये 37 सेकंदात अंतर पूर्ण करुन दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत कमीत कमी वेळ नोंदवून राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पारस यादव हा आयकॉन ठरला.
तसेच यापूर्वीच्या तिसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धा हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत दोन सुवर्ण प्राप्त केले. सद्यस्थितीत श्री. पारस गंगालाल यादव हे एम.फील पूर्ण करीत आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी , जिल्हा क्रिडा अधिकारी गंगालाल यादव , जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष अरुण (बापू) किनगांवकर यांनी त्यांच्या यशाबद्दल सत्कार केला . यावेळी क्रीडा अधिकारी एम. जे. सोनकांबळे , वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, आनंद सुरेकर आदि उपस्थित होते.

***  
निवृत्तीवेतन धारक / कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांना आवाहन  
 --- जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गगड
नांदेड दि. 2:- नांदेड जिल्ह्यातील राज्य शासनाचे सर्व निवृत्ती व वेतनधारक व कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, त्यांनी हयाती बाबतचे प्रमाणपत्र व स्वाक्षरी विहीत मुदतीत आपले निवृत्तीवेतन बँक खाते ज्या बँकेत आहे. तेथे स्वाक्षरी करावी.
विहीत मुदत दिनांक 1 नोव्हेंबर, 2017 ते दिनांक 15 डिसेंबर, 2017 या कालावधीत हयात नोंद यादी बँकेत उपलब्ध आहे. हयात प्रमाणपत्राची संबंधित रकान्यात स्वाक्षरी / अंगठा करावा. सदरील कालावधीत हयत प्रमाणपत्रा नोंद न केल्यास आपले निवृत्तीवेतन पुढील कालावधी पासून बंद करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी , नांदेड यांनी कळविले आहे.   

**** 

Tuesday, October 31, 2017

माल 12 टक्क्यापर्यंत ओलावा असलेला, काडी कचरा विरहीत, स्वच्छ,
एफएक्यु दर्जा असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा
 ---- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन


नांदेड दि. 31 :- नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर आणण्यासाठी भ्रमणध्वनीवर संदेश मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आपला माल 12 टक्क्यापर्यंत ओलावा असलेला , काडी कचरा विरहीत , स्वच्छ , एफएक्यु दर्जाचा असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा , असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे मूग-उडिद व सोयाबीन केंद्रे सुरु करण्यासंदर्भात आयोजित बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाचे आधाभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हमी भावाने मुग-उडिद खरेदी करिता देगलूर, धर्माबाद, बिलोली येथे केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत.
तसेच सोयाबीनकरिता नांदेड , लोहा , देगलूर, धर्माबाद, बिलोली , हदगाव , मुखेड, भोकर व उमरी येथे केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. खरेदी केंद्रावर माल विक्री करण्याकरिता ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. तसेच शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणीकरिता सोबत सातबाराचा उतारा 2017-2018 चा पिकपेऱ्याची नोंद असलेला आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत (झेरॉक्स) प्रत आणावी.
            या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा मोर्केटिंग अधिकारी श्री. दांड, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, नांदेड तालुका उपनिबंधक पी. ए. साठे, कापूस पणन महासंघाचे उपव्यवस्थ्ज्ञापक एस. जी. हनवते तसेच सर्व सहाय्यक निबंधक, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव आदि. विविध विभागाचे विभाग प्रमुखांची या बैठकीस उपस्थिती होती.     

****  
जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सत्कार  

नांदेड दि. 31 :- जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी दिनांक 31 ऑक्टोबर, 2017 रोजी नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून शाल येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात करण्यात आला. 
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी , अप्पर कोषागार अधिकारी निलकंट पांचगे , जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांच्यासह अधिकारी , कर्मचारी  आदिंची यावेळी उपस्थिती होते.  

****     
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्हाधिकारी डोंगरे
यांच्या हस्ते प्रारंभ विविध घटकांचा सहभाग  
नांदेड दि. 31 :- विविधतेतील एकतेचा मंत्र घेवून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शहरात एकता दौड संपन्न झाली. या दौडमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उत्साहात सहभागी झाले. महात्मा गांधी पुतळा परिसर वजिराबाद ते जुना मोंढा टॉवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये सुरेख वेशभूषेतील विद्यार्थी, अग्निशमन व पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.   
एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर एकता दौडचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 
दौडमध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. घुले, जिल्हा नियोजन अधिकारी सरेश थोरात, जिल्हा क्रिडा अधिकारी गंगालाल यादव,  प्रवीस साले, दिलीप ठाकूर, प्रा. नंदू कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदि सहभागी होते.
तसेच पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते वजिराबाद मार्केट रस्ता, महावीर चौक, जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.  
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात दौडमध्ये सहभागी पथके, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी  एकतेच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा व दक्षता जनजागृती दिनानिमित्त शपथ दिली. दौडमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

****  

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...