Wednesday, August 24, 2016

मोटार सायकल रॅलीत
हेल्मेट घालणे सक्तीचे
नांदेड, दि. 24 :- सार्वजनिक, खाजगी उपक्रम जयंती, वाढदिवस, मिरवणुका इत्यादी कार्यक्रम साजरे करताना मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येते या रॅलीत मोटार सायकल चालकाने हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. यात दोषी आढळल्यास  मोटार  वाहन कायदानुसार संबंधीतावर  दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मोटार वाहन अधिनियम 1989 च्या कलम 129 नुसार सार्वजनिक ठिकाणी मोटार सायकल चालविताना चालकाने हेल्मेट घालणे अनिवार्य असून  पगडी परिधान करणाऱ्या शिख नागरिकास या तरतुदीतून सूट आहे, असेही म्हटले आहे.  
00000


लोकशाही दिनाचे 6 सप्टेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 24 - सामान्य जनतेच्या अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. सोमवार 5 सप्टेंबर 2016 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने मंगळवार 6 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 1 ते 3 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे  लोकशाही  दिन आयोजित  केला असल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिनामध्‍ये अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या  निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्‍वरुपाच्‍या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत असेही आवाहन करण्‍यात आले आहे.  यादिवशी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी हजर राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
अर्जदार यांनी विहित नमुन्‍यात (प्रपत्र 1 अ ते 1 ड) अर्ज करणे आवश्‍यक. तक्रार निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे असावे. अर्जदाराने विहित नमुन्‍यात 15 दिवस आगोदर दोन प्रतीमध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालयात अर्ज पाठविणे आवश्‍यक आहे. तालुकास्‍तरावर अर्ज दिल्‍यानंतर एक महिन्‍यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालय येथील लोकशाही दिनामध्‍ये अर्ज करता येईल. लोकशाही दिनामध्‍ये न्‍यायप्रविष्‍ट प्रकरणे, राजस्‍व/अपील, सेवाविषयक, आस्‍थापना विषयक बाबी, विहित नमुन्‍यात नसलेले, अंतिम उत्‍तर दिलेले आहे किंवा देण्‍यात येणार आहे, निवेदने वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000000
मानवी दिव्यदान : अवयवदान
         अवयवदानाविषयीच्या जनजागृतीसाठीच्या 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत महा-अवयवदान अभियान आयोजित केले आहे. त्यानिमित्त जिल्हयात जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजीत केले जाणार आहेत. त्याअनुषंगाने अवयवदानाबाबत जनजागृतीपर प्रसृत करण्यात आलेला लेख...
       
अनादी काळापासून संपूर्ण जगामध्ये आणि वेगवेगळया धर्मामध्ये दानाला महत्त्व आहे. दान हे समाजातील गरजू किंवा अत्यंत  गरीब  व्यक्तीला दानशूर व्यक्तीकडून दिले जाते. दान म्हणजेच त्यापासून दान देणाऱ्याला आर्थिक फायदा अथवा त्यांची  प्रसिद्धी मिळत नाही. दान देणाऱ्याला मानसिक समाधान मिळते  व निती मुल्यात वृध्दी होते.
        जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टीमध्ये मृत्यू हा आटळ आहे. त्याननंतर  वेगवेगळया जाती धर्मामध्ये वेगवेगळया पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावतात. परंतू देह व त्यातील अवयव हे अमूल्य आहेत. त्यांची अशा पद्धतीने जाळून राख करणे, किंवा जमिनीत माती करून नष्ट करणे, हे ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत समाजात करत आहेत हे कितपत योग्य आहे? यावर समाजाने जागृत होऊन विस्तृत विचार करणे आवश्यक आहे. जर प्रत्येकांनी मृत्यू पूर्वी आपले अवयवदान करण्याची इच्छा असेल तर इच्छा संमती पत्र भरून दयावयाचे आहे. त्यानंतर आपणास एक ओळखपत्र दिले जाईल जे की , आपल्या सोबत 24 तास ठेवणे गरजेचे आहे.
      तसेच आपण दान केलेले अवयव हे फक्त गरजू व प्रतिक्षा यादीवरील रुग्णांना मोफत दिले जातील त्यासाठी शासनाची समिती मार्गदर्शन आणि नियंत्रण करत असते. अवयव दान देणाऱ्याची व तो अवयव घेण्याऱ्याची माहिती म्हणजे, कोणी कोणास अवयव दान दिले याची माहिती गुप्त ठेवली जाते.
       अवयवदान प्रामुख्याने तीन प्रकारे करता येते. जीवंतपणी  आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना आई, भाऊ, बहीण, मुले, पत्नी इत्यादींना. एक किडनी किंवा लिव्हरचा तुकडा अवयवाच्या स्वरुपात दान करु शकतो. “ब्रेन-डेथ” झाल्यावर म्हणजेच मेंदूमृत झाल्यावर, त्यासाठी नेमून दिलेल्या समितीने अतिदक्षता   विभागात असलेल्या रुग्णाचा मेंदूमृत घोषित केल्यावर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती दयावयाची असते. त्यानंतर अशा रुग्णाचे दोन्ही किडनी, डोळे, फुप्फुसे, लिव्हर, स्वादूपिंड, हृदय, कानाचे  पडदे  तसेच  हाडे, त्वचा इत्यादी प्रकारच्या अवयवाचे दान करता येते. त्यामुळे अनेक प्रकारच्या गरजू रुग्णांना एका अवयव दात्याकडून  जीवनदान मिळते व मृत्यू झालेल्या व्यक्तींना अवयवदानाच्या रूपाने, अनेकांत जीवंत असल्याचा समाधान आणि आनंद मिळतो. मृत्यू झाल्यानंतर सहा तासाच्या आत आपण डोळे, त्वचा व हाडे दान करु शकतो. अवयवदान  करताना संमती पत्रात दोन व्यक्तींच्या साक्षीदार म्हणून सह्या आवश्यक आहेत. त्यापैकी एक साक्षीदार हा जवळचा नातेवाईक असणे आवश्यक आहे. आपल्या नातेवाईकाचा किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या शरीरात मृत्यूनंतरही जीवंत राहतो. यासारखी आनंदाची दुसरी बाब जीवनात असूच शकत नाही. त्यामुळे अवयव दान हे महादान आहे. 
                                                           -  डॉ. एच. आर. गुंटूरकर
                             (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक) एम. डी. (मेडीसीन)

000000
हंगामात आतापर्यंत 65.31 टक्के पाऊस  
          नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यात बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 15.91 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 0.99  मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे.  तर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 624.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  65.31 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात बुधवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 1.63 (603.35), मुदखेड- 0.67 (524.35), अर्धापूर- 0.67 (656.99) , भोकर- निरंक (848.00) , उमरी- निरंक (483.26), कंधार- 0.33 (502.31), लोहा- निरंक (621.00), किनवट- 1.43 (733.42), माहूर- निरंक (894.00), हदगाव- 0.29 (766.99), हिमायतनगर- 6.00 (725.65), देगलूर- निरंक (411.68), बिलोली- 2.00 (622.20), धर्माबाद- निरंक (537.36), नायगाव- 1.60  (537.20), मुखेड- 1.29 (517.84) आज  अखेर  पावसाची सरासरी 624.10  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 9985.60) मिलीमीटर आहे.  

000000

Tuesday, August 23, 2016

शिष्यवृत्तीशी आधार क्रमांक जोडण्याचे  
समाज कल्याणचे आवाहन            

             नांदेड दि. 23 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती व शैक्षणिक शूल्क प्रतिपुर्ती योजना सन 2010-11 पासून ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित आहे. या योजनेचा लाभ योग्य विद्यार्थ्यांपर्यत पोहचावा यासाठी विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक संकलीत करून तो योग्य असल्याची तपासून आधारकार्ड क्रमांक त्यांच्या शिष्यवृत्ती / शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती योजनेशी संलग्न करावयाचा आहे. कार्यवाही एक महिन्याचा कार्यक्रम आखून पूर्ण करण्यात यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड यांनी केले आहे.
-- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
‘महाराष्ट्र माझा’ संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा
Ø  निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
Ø   पंधरा, दहा व पाच हजार रुपयांची पारितोषिके
Ø   एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे

मुंबई, दि. 22: महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
            ‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र,स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी  संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन (एचडी) छायाचित्रेdgiprnews01@gmail.com या ई मेल पत्यावर  दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे,ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक वरिष्ठ  सहायक  संचालक  अजय  जाधव  (9702973946), (dloajayjadhav2012@gmail.com),  सहायक   संचालक  सागरकुमार कांबळे (8605312555), (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.
000
महा-अवयवदान अभियान यशस्वी करण्याचा निर्धार
जास्तीत जास्त समंतीपत्र नोंदणीसाठी नागरिकांना आवाहन
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत विविध उपक्रमांचे नियोजन

नांदेड, दि. 23 :- आरोग्य विभागाच्यावतीने 30 ऑगस्ट  ते 1 सप्टेंबर या कालावधीत आयोजित महा-अवयवदान अभियान यशस्वी करण्याचा निर्धार आज जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आला. अवयदानाविषयी जाणीव जागृती करण्यासाठी घरा-घरापर्यंत पोहचण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून दिले.
जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात झालेल्या या बैठकीस आमदार डी. पी. सावंत, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, समितीच्या समन्वयधिकारी तथा डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. कानन येळीकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. विजय कंदेवाड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. जी. एच. गुंटूरकर, पोलीस उपअधीक्षक विश्र्वनाथ नांदेडकर, इंडियन मेडीकल असोसिएशन-नांदेडचे अध्यक्ष डॅा. संजय कदम, रोटरी क्लबच्या डॅा. करूणा पाटील, लायन्स क्लबचे जयेश ठक्कर, डॅा. शाम तेलंग आदींसह विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था आदींचे प्रतिनीधींची उपस्थिती होती.
या तीन दिवसांच्या कालावधीत मानवी अवयवदान व प्रत्योरापण विषयाबाबत व्यापक अशी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगे नांदेड जिल्ह्यात या मोहिमेला जोडूनच 18 ऑगस्ट 2016 पासून मानवी अवयवदान संमत्री पत्र नोंदणीस  सुरवात  करण्यात  आल्याची माहिती, डॅा. कंदेवाड यांनी दिली. या अभियानात आता ऑनलाईन पद्धतीनेही समंतीपत्र भरण्याचीही सुविधा उपलब्ध झाली, असल्याने विविध कार्यालये, मोठ्या आस्थापना आदींना एकत्रित पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याचे सांगण्यात आले
मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता भव्य जनजागरण फेरी काढण्यात येणार आहेत. फेरीत  सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, नर्सीग महाविद्यालय, वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध संघटनाचे सदस्य, स्वयंसेवी संस्था आदींच्या सहभागाबाबत  तसेच त्यांच्यासाठीच्या अनुषांगीक सुविधांबाबत जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. बुधवार 31 ऑगस्ट रोजी विविध महाविद्यालयांच्या समन्वयातून निबंध, रांगोळी आणि वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांतील विजेत्यांना गुरुवार  1 सप्टेंबर रोजी या जनजागृती अभियानाच्या जिल्हास्तरीय समारोप समारंभात पारितोषिकांचे वितरण होणार आहे. यादिवशीही रक्तदान शिबीर, अवयदान नोंदणी शिबीर, तसेच जनजागृती मोहिमेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या घटकांना, संमती पत्र नोंदणीत सर्वाधिक नोंदणी गौरव असा कार्यक्रम होणार आहे.
अवयदानाबाबत कुटुंबा-कुटुंबात चर्चा व्हावी, तरच भविष्यात अवयवदानाचे प्रमाण वाढेल यासाठी रुग्ण कल्याण समित्यांमार्फत, तसेच ग्रामीण भागात पोहचून आणि कौटुंबिक सहभाग वाढावा यासाठी घरा-घरापर्यंत पोहचण्याचे नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले. वरीष्ठ महाविद्यालयांसह, वैद्यकीय तसेच अन्य महाविद्यालये, विद्यापीठ स्तरापर्यंत  पोहचून  युवकांचा सहभाग वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही करण्यात आली. या अभियानात विविध व्यावसायिकांच्या संघटना, संस्था यांचा सहभाग घेण्याची सूचना आमदार श्री. सावंत यांनी केली. महा-अवयवदान अभियानासाठी समंतीपत्र नोंदणीचे उद्दीष्टपुर्तीसाठी माहिती-तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील विविध घटकांचा सहभाग घेण्यात यावे , असे आयुक्त श्री. उन्हाळे यांनी सूचित केले. या तीन दिवसाच्या कालावधीत सहभागी होणाऱ्या विविध घटकांसाठी कार्यक्रमस्थळीही समंतीपत्र नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्याला समंतीपत्र नोंदणीसाठी दिलेल्या उद्दीष्टाहून अधिक नोंदणी करण्याचा निर्धार बैठकीत सर्वच घटकांनी व्यक्त केला. डॅा. कंदेवाड यांनी अभियानाबाबत  सादरीकरण  केले  व आभार मानले.
अवयवदानाचे समंती पत्र कुठे भरता येईल ?
नांदेड शहरात श्री गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-विष्णुपूरी या तीन ठिकाणी शनिवार 27 ऑगस्ट 2016 पर्यंत.
तर आँनलाईन पद्धतीने – www.dmer.org  या संकेतस्थळावर, Organ Donation Campiagn 2016  या ठिकाणी क्लिक केल्यास, समंतीपत्राबाबतचे पृष्ठ उघडते. त्या ठिकाणी सुलभपणे समंतीपत्र भरता येते. याठिकाणी मराठी व इंग्रजीमधूनही समंतीपत्र भरता येते.

0000000

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...