Wednesday, May 20, 2026

वृत्त क्रमांक 

आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या - जिल्हाधिकारी कर्डिले

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विभाग प्रमुखांसमवेत बैठक

नांदेड, दि. 20 मे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आज सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 8 मतदान केंद्रांवर 18जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 

दुष्काळ, पाणीटंचाई, नैसर्गिक आपत्ती यासारखी परिस्थिती वगळता आचारसंहिता कालावधीत विविध योजनांच्या शासकीय व नवीन जाहिराती देता येणार नाहीत. तसेच नवीन मान्यता, शासकीय कामांचे उद्घाटने करता येणार नाहीत. ग्रामसभेसह कोणत्याही कार्यालयात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती राजकीय बैठका घेण्यासही मनाई आहे. मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही काम या कालावधीत करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही योजना किंवा राजकीय व्यक्तींची छायाचित्रे ठेवू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना केले. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी यावेळी दिली. मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी, तसेच मतदारांवर कोणताही प्रभाव पडणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी प्रास्ताविकात निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांचे सदस्य मतदार राहणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

याबैठकीपुर्वी निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत मतदान प्रक्रिया, प्रचारासंदर्भातील नियम, परवानग्या तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. 

00000



No comments:

Post a Comment

#खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन #नांदेड