Monday, July 24, 2017

चुकीच्या सवयीला दूर करुन
आरोग्याबाबत जागरुक रहावे  
- जिल्हाधिकारी डोंगरे 
नांदेड, दि. 24 :- निरोगी जीवनासाठी युवकांनी चुकीच्या सवयीला दूर करुन आरोग्याबाबत अधीक जागरुक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  
एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. सुहास बेंद्रीकर, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे पर्यवेक्षक प्रवीण गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, एचआयव्ही मुक्त समाजासाठी एचआयव्ही / एड्सवरील विविध प्रश्नांवर ग्रामीण भागातही जनजागृती करणे आवश्यक आहे. एचआयव्हीबद्दलचे गैरसमज दुर करुन एचआयव्हीबाधीत नागरिकांना व त्यांच्या पाल्यांना भेदभावाची वागणूक देऊ नका. एचआयव्हीग्रस्त लहान बाळांना सकस आहार देण्यासाठी सेवाभावी संस्था, आरोग्य विभागाकडून अधीक प्रयत्न व्हावेत. विविध शासकीय योजनेचा एचआयव्हीग्रस्त नागरिकांना लाभ मिळून देण्यासाठी प्रशासनाबरोबर सेवाभावी संस्थानी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी एचआयव्ही / एड्सबाबत विविध प्रश्न व उपायांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस एचआयव्हीबाधितांसाठी काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. 

000000

Sunday, July 23, 2017

किनवट नगरपरिषद निवडणूक
प्रभाग रचना, आरक्षण निश्चितीवर   
आक्षेप, हरकती, सूचना 31 जुलै पर्यंत मागविल्या
नांदेड, दि. 23 :- किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2017 च्‍या प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत ज्‍या कोणत्‍याही व्‍यक्‍तींचे आक्षेप / हरकती / सूचना असतील ते त्‍यांनी कारणासह मुख्‍याधिकारी, नगरपरिषद किनवट यांचेकडे सोमवार 24 ते 31 जुलै 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी सादर करावे. त्यानंतर आलेले आक्षेप / हरकती / सूचना विचारात घेतल्‍या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्‍या माहितीसाठी किनवट नगरपरिषद कार्यालय किनवट येथे पाहण्‍यासाठी उपलब्‍ध आहेत. सदस्‍य पदाच्‍या आरक्षणाची प्रसिध्‍दी नगरपरिषद क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्‍यात आली आहे. तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आले आहे.  
नांदेड जिल्‍हयातील नगरपरिषद किनवटच्‍या 2017 मध्‍ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्‍य निवडणूक आयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य यांनी ठरवून दिलेल्‍या आरक्षणाचे प्रमाणानूसार, किनवट नगरपरिक्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जाती (स्‍त्री), अनुसूचित जमाती (स्‍त्री), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्‍त्री), आणि सर्वसाधारण स्‍त्रीयांसाठी दिनांक 20 जुलै 2017 रोजी आरक्षण निश्चित करण्‍यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.   

00000

Saturday, July 22, 2017

पुरवठा निरीक्षक परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
            नांदेड, दि. 22 :- अन्न नागरी विभाग अमरावती व नागपूर विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रविवार 23 जुलै 2017 रोजी नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील दोन परीक्षा  केंद्रात दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  लागू  केल्याचे   जिल्हादंडाधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे. 
या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दुपारी 1 ते सायं. 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. 

000000
क्रीडा योजनेसाठी अर्ज करण्यास  
31 जुलै पर्यंत मुदतवाढ
             नांदेड, दि. 22 :- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने सन 2017-18 या वर्षात सामाजिक सेवा शिबीर घेणे, ग्रामीण व नागरी भागातील स्वयंसेवी युवक मंडळाना आर्थिक सहाय्य (सर्वसाधारण, विशेष घटक, आदिवासी) योजना  व क्रीडांगण विकास योजना (विशेष घटक, आदिवासी व ओटीएसपी) या योजनांचे अर्ज करण्यासाठी सोमवार 31 जुलै 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
             या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्षात कार्यालयीन वेळेत वाटप व स्विकारले जाणार आहेत. अर्जाची मागणी करताना संस्थेचे दोन्ही नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत सादर करावी. जिल्ह्यातील विविध क्रीडा मंडळे, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, ग्रामपंचायत व स्थानीक स्वराज्य संस्था, एनजीओ समिती पदाधिकाऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.

0000000
रास्तभाव धान्य दुकानात
ऑगस्ट महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 22 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने ऑगस्ट 2017 साठी नियमित नियतन साखर प्रति व्‍यक्‍ती एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. ऑगस्ट 2017 महिन्‍यात जिल्‍हयासाठी 781.73 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.   
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड व लोहा- 64.68 , हदगाव- 68, किनवट- 153.5, भोकर- 37.5, बिलोली- 56.5, देगलूर- 49.5, मुखेड- 67, कंधार- 43.5, लोहा- 35.5, अर्धापूर- 15, हिमायतनगर- 33, माहूर- 65.5, उमरी- 28.5, धर्माबाद-25.5, नायगाव- 49.5, मुदखेड- 16.5. याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

0000000
कर कपात (टीडीएस) बाबत
बचत भवन येथे 26 जुलैला कार्यशाळा  
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन  
नांदेड, दि. 22 :-  वस्तु व सेवाकर अधिनियमांतर्गत कर कपात (टीडीएस) बाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 26 जुलै 2017 रोजी बचत भवन येथे दोन सत्रात सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.  
नांदेड मुख्यालय व नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर नांदेड वगळता  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कार्यशाळेस वेळेनुसार उपस्थित रहावे, असेही आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) यांना वस्तु व सेवाकर अधिनियम 2017 अंतर्गत नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नोंदणी न करता जे आहरण व संवितरण अधिकारी स्त्रोत ठिकाणी कर कपात (टीडीएस) भरणा करणार नाहीत त्यांना 10 हजार रुपये किंवा कराची रक्कम यापैकी जी जास्त असेल ती दंड लावण्याची तरतुद आहे.
या कायदातील टीडीएसबाबत संबंधी परिपुर्ण माहिती देण्यासाठी राज्यकर उपआयुक्त सौ. रंजना देशमुख या मार्गदर्शन करणार आहेत. सहायक राज्यकर आयुक्त विकास वैद्य व राज्यकर अधिकारी अविनाश चव्हाण हे शंकाचे निरसन करणार आहेत. यावेळी राज्यकर सहआयुक्त व जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

0000000
जिल्हा उद्योग केंद्राच्या सभांचे
28 जुलै रोजी आयोजन
           नांदेड, दि. 22 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुर्नजीवन जिल्हास्तरीय समिती सभा शुक्रवार 28 जुलै 2017 रोजी सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली नायगाव तालुक्यातील मे. इंडिया मेगा ॲग्रो अनाज लि. डी-3 एमआयडीसी कृष्णुर येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.     

000000

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...