Saturday, July 22, 2017

कर कपात (टीडीएस) बाबत
बचत भवन येथे 26 जुलैला कार्यशाळा  
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन  
नांदेड, दि. 22 :-  वस्तु व सेवाकर अधिनियमांतर्गत कर कपात (टीडीएस) बाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 26 जुलै 2017 रोजी बचत भवन येथे दोन सत्रात सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड विभागाचे राज्यकर सहआयुक्त मा. म. कोकणे यांनी केले आहे.  
नांदेड मुख्यालय व नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर नांदेड वगळता  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कार्यशाळेस वेळेनुसार उपस्थित रहावे, असेही आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) यांना वस्तु व सेवाकर अधिनियम 2017 अंतर्गत नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नोंदणी न करता जे आहरण व संवितरण अधिकारी स्त्रोत ठिकाणी कर कपात (टीडीएस) भरणा करणार नाहीत त्यांना 10 हजार रुपये किंवा कराची रक्कम यापैकी जी जास्त असेल ती दंड लावण्याची तरतुद आहे.
या कायदातील टीडीएसबाबत संबंधी परिपुर्ण माहिती देण्यासाठी राज्यकर उपआयुक्त सौ. रंजना देशमुख या मार्गदर्शन करणार आहेत. सहायक राज्यकर आयुक्त विकास वैद्य व राज्यकर अधिकारी अविनाश चव्हाण हे शंकाचे निरसन करणार आहेत. यावेळी राज्यकर सहआयुक्त व जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...