Thursday, February 1, 2024

 वृत्त क्र.94

शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी

3 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- कृषि विभागामार्फत विविध देशांनी विकसित केलेली शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी केलेला अवलंब त्याद्वारे त्यांचे उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या- त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांचेशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी घेण्यात येणार आहेत. तसेच तेथील संस्थांना भेटी द्वारे शेतकऱ्यांच्या ज्ञान व क्षमता उंचविण्यासाठी राज्य पुरस्कृत योजना २०२३-२४ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे देशातील अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. तरी कागदपत्रांची पुर्तता होत असलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभागाकडे संपर्क करुन विहित प्रपत्रातील अर्जासह व आवश्यक कागदपत्रासह 3 फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन êüजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

विदेश अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील ३४ जिल्हयातून प्रत्येकी ३ नुसार १०२ व राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १८ असे एकूण १२० शेतकरी व ६ अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील निवड प्रक्रिया पुर्ण करुन ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शेतकरी याद्या कृषि आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत.

 

राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलँड, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील कोकण कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरी, नाशिक कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरी, पुणे कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरी, कोल्हापूर कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरी, छत्रपती संभाजी नगर कृषि विभागातून ३ जिल्हयातुन ९ शेतकरी, लातूर कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरी, अमरावती कृषि विभागातून ५ जिल्हयातुन १५ शेतकरी व नागपुर कृषि विभागातून ६ जिल्हयातुन १८शेतकरी असे एकुण १०२ शेतकऱ्यांची विदेशातील अभ्यास दौ-यासाठी निवड केली जाणार आहे.

 

जिल्हयातील ३ शेतकऱ्यांची निवड विदेश अभ्यास दौऱ्यासाठी करावयाची असून शेतकरी निकष पुढील प्रमाणे आहेत.

 

अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, स्वत:च्या नावे चालु कालावधीचा सातबारा, व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वंय घोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र -१), शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल, निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही, सोबत शिधापत्रिका झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब व्याख्यामध्ये पती, पत्नी व १८ वर्षाखालील मुले/मुली), शेतकऱ्यांने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे, शेतकरी किमान बारावी पास असावा. बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे, शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी ६० वर्षापेक्षा जास्त नसावे. (त्यासाठी पारपत्रानुसार वयाची पडताळणी करण्यात येईल), शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानांची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान सहा महिने असावी, शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटंट), अभियंता, कंत्राटदार इ.नसावा, तसेच त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र-१), शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषि विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा, तसेच त्याने स्वतःस्वयं घोषणा पत्रात नमूद करावे (प्रपत्र-१), शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे, कोरोना विषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि विभागास सादर करणे बंधनकारक आहे, अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग ७-१० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारिरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.

 

अनुदान

शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५०

टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख (रुपये एक लाख फक्त) यापैकी कमी असेल ती रक्कम

अनुदान म्हणून देय आहे.

 

शेतकरी निवड कार्यपध्दती


राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सोबत सहपत्रित

केलेल्या प्रपत्र-९ वरील अर्जाप्रमाणे माहिती भरुन संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे

प्रस्ताव सादर करतील. तालुका कृषि अधिकारी यांनी प्रपत्र-६ मध्ये निश्चित केलेल्या कालावधीपर्यंतच प्रस्ताव स्विकारुन प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी व छानणी करुन जे शेतकरी निवडीचे निकष पूर्ण करत आहेत अशा प्रस्तावांनाच प्रपत्र-७ नुसार प्रमाणीत करुन अशा पात्र शेतकयांचे प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे विहीत कालावधीत (प्रपत्र-६) मध्ये सादर करतील. जिल्हास्तरावर हा प्रस्ताव विभागीय कृषि सहसंचालक यांचेकडे सादर करणेकरीता समिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आलेली असून प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा कार्यक्षेत्रातील एक उपविभागीय कृषि अधिकारी सदस्य व जिअकृअ कार्यालतील कृषि उपसंचालक हे सदस्य सचिव असतील.

 

जिल्हास्तरीय समितीस तालुकास्तरावरुन पात्र शेतक-यांचे प्रस्ताव मार्गदर्शक सुचना अटी व शर्तीनुसार तपासणी/छाननी करतील. जे प्रस्ताव पात्र असतील अशा प्रस्तावांची सोडत पध्दतीने सोडत काढून जिल्हयातील जेष्ठता क्रमवारी निश्चित करतील.सोडत पध्दत शेतकऱ्यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय समिती समोर चलचित्रीकरण (व्हिडीओग्राफी) मध्ये होईल. जिल्हास्तरावरील सोडतीनुसार जेष्ठता क्रमवारी निश्चित केलेले प्रस्ताव व यादी विभागीय कृषि सहसंचालक यांचेमार्फत कृषि आयुक्तालयास सादर केले जातील, राज्यस्तरीय समिती जेष्ठता क्रमवारी निश्चित केलेले प्रस्ताव व यादीस अंतिम मान्यता देऊन पुढील कार्यवाही करतील.

00000 

 वृत्त क्र.94

महासंस्कृती महोत्सवात

स्थानिक कलावंताना कला सादर करण्याची संधी

नांदेड (जिमाका) दि. 1 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवाय्यांची माहिती इ. बाबी जनसाम्गन्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्याने शासनाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये 16, 17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये लोककला पोवाडा, भारुड, गोंधळ, वाघ्या मुरळी, भजन, जोगवा इ. लोकसंगीत शास्त्रीय गायन, लोकगीत, जात्यावरील ओव्या, भुलैय्या, गवळण व वादनाचे विविध प्रकार इ.
लोकनृत्य शास्त्रीय नृत्य, आदिवासी नृत्य, लोक उत्सव नृत्य, लावणी, कोळी नृत्य, धनगरी नृत्य व महाराष्ट्र परंपरेवर आधारित समुह नृत्य इ. कला प्रकारांचा समावेश असणार आहे.

या कला प्रकारात पारंगत असणाऱ्या स्थानिक कलावंतांनी 5 व  6 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचा कला प्रस्ताव जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी, पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावेत. या कालावधीत प्राप्त प्रस्ताव समितीद्वारे अंतिम करण्यात येतील. निवडक कलावंताना महासंस्कृती महोत्सवात सादरीकरण करण्यास अनुमती देण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या कलावंतांना समितीने मान्य केलेले एकत्रीत मानधन अदा करण्यात येईल. तथापी सादरीकरणासाठी लागणारे विविध साहित्य, वाद्य व वादक, पोषाख, सराव व इतर सामग्री स्वतः आणावी लागेल. त्यासाठी वेगळयाने निधी दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Wednesday, January 31, 2024

 वृत्त क्र.  93 

जिल्ह्यात स्वस्त दरात वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी वाळू डेपो तयार

 

• ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करुन लाभ घेण्याचे

  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 19 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्‍हयात टप्‍याटप्‍याने वाळू डेपो तयार करण्‍याचे काम सुरु आहे. काही वाळु डेपो कार्यान्‍वीत पण झाले आहेत. या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास 600 रुपये अधिक इतर कर 77 रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन 1 फेब्रुवारी 2024 नुसार वाळू विक्री करण्यात येणार आहे. ज्‍या नागरिकांना वाळुची आवश्‍यकता आहे अशा नागरिकांना नजिकच्‍या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा.

 

सदरील सेतु केंद्रावर पुढील प्रक्रियेनुसार वाळु मागणीसंदर्भात नोंदणी करावी. वाळु डेपोतुन वाळु मागणी करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीवर दररोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्‍येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान 200 ब्रास इतकी रेती बुकींगची मर्यादा निश्‍चीत केली आहे. प्रत्‍येक लाभार्थ्‍याना प्रति महिना 10 ब्रास इतकी वाळु उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू विनामूल्य उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल.

 

त्यासाठी जनतेने वाळू धोरण-2023 च्या अनुषंगाने वाळू बुकींग करण्यासाठी नजिकच्‍या सेतू केंद्राला  भेट द्यावी. सेतू केंद्रधारक यांनी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरील बाजूस SAND BOOKING असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. SAND BOOKING वर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडेल. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर लॉगिन करुन ग्राहकांची आवश्यक ती माहिती भरावी जसे नाव, मोबाईल क्रमांक व स्वत:चा ई-मेल आयडी इत्यादी माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (ओटीपी) टाकून लॉग इन करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपली घर, इमारत, घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा STOCKYARD निवडावा. शेवटी ऑनलाईन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी व संबंधित STOCKYARD वर जाऊन पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी.

 

वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायर पर्यत असणारे टिप्पर, टेम्पो व इतर) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोदणी करण्यात यावी. वाहतुकीचा दर शासनाने निश्चित केल्याप्रमाणे राहील याबाबतची सविस्तर माहिती www.nanded.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच ऑनलाईन संदर्भात तक्रार असल्‍यास Helpline No. of Mahakhanij 020-67800800 या दुरध्‍वनीवर संपर्क करावा. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची  प्रक्रिया पूर्ण करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 92

दिव्यांगांनी सादर केलेल्या नाट्य,

नृत्याविष्कार च्या कलागुणांना रसिकांनी दिली भरभरुन दाद

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धाचे आज कुसुमताई चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते. दिव्यंगत्वावर मात करीत दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्य, नृत्याविष्काराच्या कलागुणांना उपस्थित रसिकांनी भरभरुन दाद दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देवून त्यांच्या कला गुणांचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, नितीन निर्मल, परीक्षक चंद्रकांत अटकळीकर, तारनाथ खरे, दीप्ती उबाळे यांची उपस्थिती होती.

इच्छाशक्तीच्या जोरावर सामान्य माणसापेक्षा उत्कृष्ट करून दाखविण्याचे कौशल्य दिव्यांगात आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. त्यांच्या कडे पाहून मला जगण्याची स्फूर्ती मिळते आळस दूर होवून ऊर्जा मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगाच्या कलागुणांला वाव मिळतो असे प्रतिपादन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. जिल्ह्यातील अंध, मूकबधिर, अस्थीव्यंग तसेच मतिमंद प्रवर्गाच्या 53 विशेष शाळांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी नाट्य, नृत्याविष्कार ने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. बाऱ्हाळीच्या गजराबाई वडगावकर मूकबधिर शाळेच्या विदयार्थ्यांनी जलवा-जलवाचे सादरीकरण केले. ये भगवान कहा हो तुम, गाडी घुंगराची, ललाटी भंडारा ,मेरे राम आये है , शेतकरी गीत, ये वतन-ये वतन, आदिवासी नृत्य तसेच सामाजिक संदेश देणारी बेटी बचाव बेटी पढाओ नाटिका सादर केल्या. तसेच देशभक्ती, धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक नाट्य, नृत्याविष्काराने उपस्थित रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्रभारी वैसाका कुलदीप कलुरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विशेष शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे.

0000





 वृत्त क्र. 92

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत

बोधडी येथे हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव कार्यक्रम

नांदेड (जिमाका) दि. 31 :-

प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024  या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने 30 जानेवारी 2024 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय व किनवट तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय, बोधडी बु. यांच्या संयुक्त विद्यमाने बोधडी बु. येथे हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी उपस्थित गावकरी, महिला व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती पुस्तिका व पॉम्प्लेटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास बोधडी गावचे सरपंच बालाजी भिसे, उपसरपंच, ग्रामसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी व सुमारे 150 ते 200 नागरिकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वितेसाठी मोटार वाहन निरीक्षक गणेश तपकीरे, सहायक मोटार वाहन निरिक्षक केशव जावळे यांनी परिश्रम घेतले.

0000







 वृत्त क्र. 91

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या http://www.syn.mahasamajkalyan.in  संकेतस्थळावर 1 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत  कार्यालयीन वेळेत ऑनलाईन भरावा. भरलेला अर्ज 2 दिवसात अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करावा. प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन महाविद्यालयांच्या प्राचार्यानी सही शिक्क्यासह  7 मार्च 2024 पर्यत  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी खर्चाची बाबीत भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम  51 हजार रूपये एवढी आहे.  नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुज्ञेय रक्कम  आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.  

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी/ अकरावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.  विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. 

विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...